1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

लोकसभा निवडणूक 2019 : मतदानाची शाई का पुसता येत नाही?

जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या महोत्सवाला सुरुवात झाली आहे. आज देशभरात चौथ्या टप्प्यातलं मतदान होत आहे. महाराष्ट्रात 17 जागांवर मतदान होत आहे.
 
या दरम्यान, मतदान करताना एक प्रश्न सतत आपल्याला येतो. तो म्हणजे आपलं मत किती सुरक्षित आहे? आपल्या नावे दुसरं कुणी मत देणार नाही ना? ही भीती दूर करण्यासाठी मत देताना निवडणूक अधिकारी आपल्या बोटाला निळी शाई लावतात.
 
निळ्या शाईमुळं त्या व्यक्तीनं मत दिलं की नाही हे कळतं. ही शाई शोधण्याचं सगळं श्रेय भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना जातं. मत दिल्यानंतर अनेकजण शाई लावलेल्या बोटासहित सेल्फी फोटो काढून सोशल मीडियावर टाकत असतात. तर काहीजणांना मत दिल्यवर ही शाई कशी काढता येईल याविषयीही कुतुहल निर्माण होतं.
 
ही शाई कुठं बनवली जाते?
ही शाई दक्षिण भारतातल्या एक कंपनीत तयार केली जाते. म्हैसूर पेंट अँड वार्निश लिमिटेड (MVPL) असं या कंपनीचं नाव आहे. 1937साली या कंपनीची स्थापना झाली. म्हैसूर प्रांताचे त्यावेळचे महाराज नलवाडी कृष्णराजा वाडियार यांनी या कंपनीची सुरुवात केली होती.
 
कंपनी ही शाई घाऊक बाजारात विकत नाही. MVPLद्वारे सरकार आणि निवडणुकीत सहभागी झालेल्या संस्थांनाच ही शाई विकली जाते. तशी ही कंपनी अनेक पेंट तयार करते. पण निवडणुकीतल्या शाईसाठी ही कंपनी प्रसिद्ध आहे. निवडणुकीची शाई किंवा edible ink म्हणून या शाईला ओळखलं जातं. 1962पासून या शाईचा वापर केला जात आहे. ही शाई इतर देशातही निर्यात केली जात आहे.
 
मतदानाची शाई का पुसता येत नाही?
या शाईत सिल्व्हर नायट्रेट या रसायनाचा वापर केला जातो. त्यामुळे ही शाई कमीत कमी 72 तासापर्यंत पुसली जात नाही. सिल्व्हर नायट्रेटचा पाण्याशी संपर्कात आला की त्याचा रंग काळा होतो आणि तो पुसला जात नाही. तसंच त्याचा संपर्क हा आपल्या शरिरातल्या क्षाराशी आल्यावर त्याचं सिल्वर क्लोराइडमध्ये रुपांतर होतं.
 
सिल्वर क्लोराइड पाण्यात विरघळत नाही. ते बोटाला चिटकून राहतं. ते साबणानंही निघत नाही. बोटाच्या पेशी जशा जुन्या होत जातात तसं तसं ही शाई निघू लागते. ही शाई 40 सेकंदाच्या आत सुकून जाते. त्याची प्रक्रिया इतकी जलद होते की एका सेकंदात त्याची छाप सोडून जाते. याच कारणांमुळं ही शाई बोटावरून काढता येत नाही.
 
दरम्यान एका विशिष्ट केमिकलचा वापर करून ही शाई काढता येते असा काहीजण दावा करत आहेत. पण यामागे काही ठोस पुरावा मिळालेला नाही. 1962पासून वापरल्या जाणाऱ्या शाईला अजून पर्यंत निवडणूक आयोगानं पर्याय शोधलेला नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ही शाई तिचं काम चोखपणे पार पडत आहे,हे दिसून येतं.