शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : शनिवार, 15 डिसेंबर 2018 (12:54 IST)

सफर युरोपची

मार्च ते ऑक्टोबर हा काळ युरोपची सहल करण्यास अनुकूल काळ आहे. युरोप हा आकाराने मोठा खंड नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील फक्त 2 टक्के भूभाग युरोपच्या वाट्याला आला आहे. याच लहानशा पृष्ठभागावर आयफेल टॉवर, लिनिंग टॉवर ऑफ पिसा, कलोन कॅथेड्रल, कलोम्सियम, अ‍ॅटोमियम, लंडन आय अशी आश्चर्ये काळाच्या प्रवाहात निर्माण झाली.
 
नेदरलँडच्या ट्युलिप गार्डनपासून ते आल्पसच्या हिमाच्छादित शिखरापर्यंत अनेक आकर्षणांनी युरोप जगभरातील पर्यटकांना खुणावत असतो. कुणाला संगीतकार मोझार्टची जन्मभूमी बघायची असते तर कुणाला व्हेनिसच गोंडोलातील रोमँटिक जलसफर करायची असते. कुणाला टॉवर ऑफ लंडनमधला कोहिनूर हिरा पाहायचा असतो तर कुणाला मनेकन पीसचा पुतळा बघायचा असतो. कुणाला बर्लिनमधले ब्रॅडेनबर्ग गेट बघायचे असते तर कुणाला बोहमियन क्रिस्टल्स खरेदी करायचे असतात तर कुणाला टॉप ऑफ द युरोप गाठायचा असतो.
 
विदेशातील बर्फाच्छादित भ्रमंतीसाठी पर्यटकांची पहिली पसंती ही स्वित्झर्लंडलाच असते. बर्फ म्हणजे स्वित्झर्लंड आणि स्वित्झर्लंड म्हणजेच बर्फ हे जणू समीकरणच झाले आहे. त्याबरोबर स्तिमित   करणार्‍या पर्वतरांगा, झगमगती बर्फाच्छादित हिमशिखरे, एखाद्या चित्राप्रमाणे भासणारी येथील सुरेख शहरे, स्वच्छ आरसपानी तळी आणि असं बरंच काही डोळे भरभरून पाहण्याजोगं स्वित्झर्लंडमध्ये आहे. म्हणूनच हजारो पर्यटकांचं विशेष आवडतं आणि उत्तम डेस्टिनेशन अशी स्वित्झर्लंडची ख्याती आहे. 10 हजार फूट उंचीवरील माऊंट टिटलीस हे ठिकाण गिर्यारोहकांचा स्वर्ग म्हणून ओळखले जाते.

प्रत्येकाच्या मनात युरोपची कल्पना वेगळी आहे. कोणाला स्वित्झर्लंडमधील हिमाच्छादित शिखरं आवडतात तर कोणाला रोममधील भव्य कलोसियम आवडतं. युरोपच्या आठवणीनं डोळ्यासमोर ट्युलिपची रंगीबेरंगी फुलं नाचतात. लंडन आयमधून घेतलेलं लंडनचं हवाई दर्शन आठवतं. खरोखर प्रत्येकाच्या  स्वप्नातला युरोप वेगळाच असतो.
 
विलोभनीय युरोपचे अतुलनीय दर्शन घडविणार्‍या सहली म्हणजे सहलीची स्वप्नपूर्ती होय. अशा सहली म्हणजे आपुलकी आणि परिपूर्ण सेवा यांचा अनोखा संगम. युरोपातील अप्रतिम सौंदर्याविष्कार पाहून मन प्रसन्न होते.
 
म.अ. खाडिलकर