दुर्गा खोटे वाढदिवस स्पेशल: भारतीय चित्रपटसृष्टीतील एक श्रेष्ठ अभिनेत्री
मराठी रंगभूमीवरील व भारतीय चित्रपटसृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ रोजी मुंबईत एका संपन्न कुटुंबात झाला. दुर्गा यांना लहानपणी बानू असे म्हणत होते. त्यांना दोन बहिणी होत्या. एका बहिणीचे नाव इंदू व दुसऱ्या बहिणीचे नाव शालू असे होते. दुर्गाबाई यांच्या वडिलांचे पूर्ण नाव पांडुरंग शामराव लाड असे होते. दुर्गाबाई यांच्या आईचे नाव मंजुळाबाई असे होते. दुर्गाबाई यांचे वडील मुंबई येथे येऊन सॉलिसिटर झाले. दुर्गाबाईंचे वडील प्रेमळ होते व त्यांची विचारसरणी उदार होती.
कॅथेड्रल या शाळेत दुर्गा यांचा प्रवेश झाला. तेथील सर्व शिक्षक युरोपिअन होते. तेथे बास्केटबॉल या खेळाच्या त्या लीडरही होत्या. खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, इंग्रजी नाटके, कला, वक्तृत्व यांमध्ये त्या आघाडीवर होत्या. त्यांना शालेय वयापासून अभिनयात रस होता. पुढील शिक्षणाकरिता त्यांनी सेंट झेवियर्स महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला मात्र त्याचवेळी विवाह झाल्याने त्या शिक्षण पूर्ण करू शकल्या नाहीत. दुर्गाबाईंचे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषांवर प्रभुत्व होते.
त्यावेळी चित्रपटांमध्ये सहसा स्त्रिया काम करत नसत अशात फरेबी जाल या मूक चित्रपटात त्यांना पहिल्यांदा छोटीशी भूमिका मिळाली आणि समाजातील काही लोकांची टीकाही सहन करावी लागली. नंतर व्ही. शांताराम दिग्दर्शित अयोध्येचा राजा (१९३१) या पहिल्याच बोलपटात प्रमुख भूमिकांपैकी राणी तारामतीची भूमिका यांनी केली होती. हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता आणि मुख्य म्हणजे यातील गाणी त्यांनी स्वत: गायली होती. त्यातील गाणी त्या वेळी खूप लोकप्रिय झाली. नंतर भरत मिलाप (इ.स. १९४२) चित्रपटात कैकेयी, तर मुघल-ए-आझम (इ.स. १९६०) चित्रपटात जोधाबाई, इत्यादी यांनी रंगवलेल्या भूमिका देखील विशेष गाजल्या.
दुर्गाबाईंचा मराठी रंगभूमीशीही जवळीक संबंध होता. त्यांनी मराठी नाटकांतून भूमिका साकारल्या त्यापैकी बेचाळीसचे आंदोलन, भाऊबंदकी, वैजयंती, पतंगाची दोरी, शोभेचा पंखा, कौंतेय, कीचकवध, संशयकल्लोळ, खडाष्टक, इतर तर त्यापैकी काही नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते.
सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी मराठी व हिंदी भाषांतील अनेक चित्रपट व नाटकांतून भूमिका केल्या. इ.स. १९६८ साली पद्मश्री पुरस्कार, तर इ.स. १९८३ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले. त्यांना पद्मश्रीचा बहुमानही लाभला आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे अलिबाग येथे निधन झाले.