सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

कबीर सिंह: शाहीद कपूरचा हा सिनेमा लोकांना एवढा का आवडतोय?

- दिव्या आर्य
'कबीर सिंह' हा सिनेमा प्रेमकहाणी नाही. ही एका माणसाच्या वेडाची गोष्ट आहे. कबीर सिंहचं हे वेड किळसवाणं आहे आणि या सिनेमात त्याचं उदात्तीकरण करण्यात आलंय.
 
हा असा पुरुष आहे ज्याला त्याचं प्रेम मिळू शकलं नाही, म्हणून रस्त्यातल्या कोणत्याही अनोळखी मुलीसोबत त्याला शरीरसंबंध ठेवायचे आहेत. आणि मुलीने नकार दिल्यास तो चाकूचा धाक दाखवत तिला कपडे उतरवायला सांगतो.
 
या आधी त्याने आपल्या प्रेयसीसोबत 450 वेळा सेक्स केलेला आहे. पण आता ती त्याच्याबरोबर नसल्याने तो स्वतःला शांत करण्यासाठी स्वतःच्या पँटमध्ये बर्फ टाकतो.
 
आणि त्याच्या या 'मदार्नगी'चं सिनेमागृहांमध्ये हशा-टाळ्यांनी कौतुक होतं.
 
तेलुगू फिल्म 'अर्जुन रेड्डी'चा हा रिमेक आहे. ही एका अशा मुलाची गोष्ट आहे, ज्याच्या प्रेयसीच्या कुटुंबाचा त्यांच्या नात्याला विरोध आहे. म्हणूत ते तिचं लग्न जबरदस्तीने दुसऱ्या कुणाशीतरी लावून देतात.
 
यानंतर वियोगात असलेला कबीर सिंह वेडा होतो. सुरुवातीपासूनच महिलांना आपली मालमत्ता समजणाऱ्या या पात्राची मनोवृत्तीच ही आहे की 'जर ती माझी होऊ शकली नाही तर कुणाचीच होऊ शकत नाही'.
 
ही प्रेयसी कायम सलवार-कमीज आणि ओढणी घेऊन असते. आणि तिने गळाही झाकावा, अशी त्याची मागणी असते.
 
ती फक्त त्याचीच आहे, हे स्पष्ट करण्यासाठी तो आख्ख्या कॉलेजला धमकावतो. होळीच्या दिवशी त्यानेच तिला सर्वांत आधी रंग लावावा, याची तजवीज करण्यात येते.
 
हा माणूस तिला हेही सांगतो की तिचं स्वतःचं काहीही अस्तित्त्वं नाही आणि अख्खं कॉलेजला हेच माहितीये की ती "सिर्फ कबीर की बंदी" आहे.
 
सर्रास दारू पिणं, सिगरेटचे झुरके घेणं आणि दिल्लीसारख्या 'अनऑर्थोडॉक्स' म्हणजे खुल्या विचारांच्या शहरामध्ये लग्नाआधी सर्रास सेक्स करणं, या सगळ्या फसव्या गोष्टी आहेत.
 
पण या चित्रपटात काहीही प्रगत, खुल्या विचारसरणीचं किंवा नवीन नाही. या फिल्मच्या हिरोला काहीही करून प्रेयसीला स्वतःच्या नियंत्रणात ठेवायचंय. आणि जर त्याच्या मनाजोगं झालं नाही की तो रागीट स्वभावाचं कारण देत तो आक्रस्ताळेपणा करतो.
 
तो वडिलांशी उद्धटपणे वागतो, मित्र आणि ते करत असलेलं काम क्षुल्लक असल्याचं भासवतो, कॉलेजच्या डीनचा अपमान करतो, आजीवर ओरडतो आणि घरात काम करणाऱ्या बाईकडून काचेचा ग्लास फुटल्यावर तिला चार मजले पायऱ्या वर-खाली करायला लावतो.
 
स्पष्ट शब्दांत सांगायचं झालं तर कबीर सिंहचं पात्र खरंतर एक गुंड आहे. प्रेम मिळवायची जिद्द आणि ते मिळाल्याने झालेलं दुःख ही फक्त कारणं आहेत. आणि ही कारणं वापरून हे पात्र करत असलेल्या सर्व गोष्टी योग्य ठरवण्यात येतात. त्याला हिरो बनवण्यात येतं.
 
हिंदी सिनेमाच्या हिरोला सात खून माफ असतात. या पात्राच्या व्यक्तिमत्त्वातले दोष हे दोष नसून परिस्थितीमुळे त्याला कराव्या लागलेल्या गोष्टी असल्याचं भासवण्यात येतं.
 
कबीर सिंहचा अनावर होणारा राग, अद्वातद्वा बोलणं, प्रेयसीसोबत गैरव्यवहार करणं, मित्रं, कुटुंब, त्याच्यासोबत काम करणारे, त्याच्या कॉलेजचे डीन आणि त्याची प्रेयसी - सगळेच त्याला माफ करतात.
 
मग हा सिनेमा पाहणाऱ्यांनी त्याला माफ का करू नये?
 
बाईला आपल्या हातात ठेवणारा 'पुरुषी' हिरो गेली अनेक दशकं लोकांना आवडत आलाय. अशा फिल्म्स कोट्यवधींची कमाई करतात. आणि या अविचारी गोष्टी योग्य असल्याचं ठरवलं जातं.
 
कबीर सिंह दारुडा झाला तरी त्याचे मित्र त्याची साथ सोडत नाहीत. एक मित्र तर त्याच्या या दुःखावर उतारा म्हणून त्याला आपली बहीण देऊ करतो.
 
"माझ्या बहिणीला तुझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे, पण तरीही तिला तू खूप आवडतोस. तू लग्न करशील का तिच्याशी?" एका महिलेमुळे झालेल्या दुःखातून सावरण्यासाठी दुसरीचा बळी.
 
एक असा दारुडा उद्धट माणूस जो प्रेमात ठेच लागल्याचं कारण सांगत कोणत्याही मुलीशी शरीरसंबंध ठेवतो, असा माणूस आवडणारी बहीण.
 
पुन्हा एकदा या फिल्ममधून प्रेमाच्या नावाखाली हिंसेचं समर्थन केलं जातं. सिनेमा हॉलमध्ये टाळ्या आणि शिट्ट्यांनी हिरोचं कौतुक होतं.
 
पण मुलींना कोणते हिरो आवडतात? असे नक्कीच नाहीत. सिनेमाचं जग अगदी कितीही काल्पनिक असलं तरी त्यातही असा माणूस माझ्यासाठी हिरो असू शकत नाही.
 
जो माझ्यावर प्रेम करेल, पण माझं अस्तित्त्वं नाकारेल, मला काबूत ठेवण्याचा प्रयत्न करणारा, माझा दृष्टिकोन समजून न घेणारा, त्याची पर्वाच नसणारा माणूस माझा हिरो असूच शकत नाही.
 
सगळं करूनही ती मिळाली नाही तर घृणास्पद गोष्टी तो करणार. पण चित्रपटात या सगळ्यासाठी त्याला नाही तर त्याच्या प्रेयसीला जबाबदार ठरवण्यात येणार.
 
सगळ्या समस्यांचं मूळ तिला ठरवण्यात येतं. कबीर सिंहचा राग, दारुडेपणा, आत्महत्येचा प्रयत्न करणं, या सगळ्यासाठी प्रेयसीला दोषी ठरवलं जातं.
 
त्या प्रेयसीचं आयुष्य, तिचं एकटेपणं यावर चर्चा होवो किंवा न होवो, पण शेवटच्या प्रसंगात ती अचानक कबीर सिंहला सगळ्या गोष्टींसाठी माफ करते आणि तो हिरो बनतो.
 
प्रेमासारख्या सुंदर नात्यामध्ये हिंसेला स्थान नाही. नात्यात बरोबरी आणि आत्मसन्मान मिळण्यासाठी महिला अनेक दशकांपासून लढा देत आहेत.
 
पण त्या विषयीचे विचार सुधारणार कसे?
 
याची सुरुवात तुमच्यापासूनच होणार. ही फिल्म बॉक्स ऑफिसवर यशस्वी होत असल्याचा जल्लोष होत असतानाच मी हे लिहिणार, तुम्ही वाचणार आणि हे सगळं समजून घेऊन या गोष्टी नाकाराल, अशी अपेक्षा आहे.