शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मार्च 2024 (04:27 IST)

प्रतीक्षा मांडवीची : कहाणी तिच्या प्रेमाची..आस्थेची, श्रद्धेची...

खंडकाव्य लिहिणे, तेही एका पौराणिक व्यक्तीरेषेच्या अव्यक्त भावनांना वाचा देणारे म्हणजे शिवधनुष्य पेलण्याएवढे अवघड कार्य होय, ते कवयित्रीने लीलया पार पाडले आहे‌.
 
रामायणातील अल्पचर्चित किंबहुना अचर्चित, काहीशी दुर्लक्षित व्यक्तीरेषा म्हणजे भरताची पत्नी मांडवी. राम, जानकी, लक्ष्मण वनवासाला गेल्यानंतर, भरताने नंदीग्रामी वास्तव्य करून केलेला अयोध्येचा राज्य कारभार, त्याचे भातृप्रेम, त्याग सर्व विदित आहे परंतु त्याच्या पत्नीने, मांडवीने सोसलेल्या यातना, राजमहालात राहून भोगलेले सन्यस्थ, व्रतस्थ जीवन, तिचे पतिप्रेम, कर्तव्यभावना यांच्याविषयी फार कमी लिहिले गेले आहे‌.
 
एकूण दहा सर्गात मांडवीचे मन, तिची कर्तव्यपरायणता, तिचा त्याग आणि तिने केलेली अखंड प्रतीक्षा...
 
कहाणी तिच्या प्रेमाची..आस्थेची, श्रद्धेची...
 
सगळंच कवयित्रीने सुसंबद्ध काव्यपंक्तींमधून व्यक्त केले आहे‌. मांडवीच्या भावविश्वाला जणू जिवंत केले आहे. 
 
एकूण दहा सर्गांचे हे अभ्यासपूर्ण खंडकाव्य वाचतांना कवयित्रीने मांडवीच्या व्यक्तीरेषेत केलेला परकाया प्रवेशही जाणवल्या शिवाय रहात नाही.
 
मला भावलेल्या काही पंक्ती लिहिण्याचा मोह आवरणे मात्र शक्य नाही‌.म्हणून हा लेखन प्रपंच.
 
कैकेयीला समजवतांना मांडवी म्हणते,
" आनंदाच्या समयी असला सोडून द्या हट्ट वृथा ।
नक्कीच माते श्रीरामांना होईल राज्याभिषेक आता ।।
लक्ष्मण,भरत,शतृघ्न देतील पहा त्यांना साथ । 
कधीच नाही सोडणार ते एकमेकांचा हात ।।"
 
तिला भातृप्रेम, त्यांची निष्ठा पूर्णपणे ठाऊक होती‌. ती कैकेलीला अडविण्याचा प्रयत्नही करते. तरी देखील भरत आजोळाहून परत आल्यावर तिला त्याचेकडूनही कटू शब्द ऐकावे लागतात.
"का रडतेस आता, तुझ्या सम्मुख घडला अनर्थ,
नाही थांबविले रामाला, उगा रडण्याला काय अर्थ?"
 
भरताला कुटीमधे दुरून पाहणाऱ्या मांडवीची मांडवीची मनोदशा वर्णवितांना कवयित्री म्हणते,
"ग्रीष्म ऋतूची संध्या शीतल, पुष्पवेलींचा होई दरवळ,
झुल्यावरती झुलू लागली, मनी विचारांची वर्दळ.।।
फिरता फिरता थबकली ती,पर्णकुटीत भरत दिसला.
एकटक बघू लागली, ध्यानमग्न तो होता बैसला.।।"
 
आणखीन काही ओळी, तिची व्याकूळता दर्शवणाऱ्या...
"बागेतून ती फुले वेची, कोमल फुले, कोमल हात,
पती चरणांवर वाहे स्पर्शुनी, राहो अशीच कायम साथ.।।
दोघांच्याही प्रेमळ नजरा, दोघे तो क्षण करती साजरा,
क्षणभराचा सहवास अनोखा, देऊन जाई स्पर्श लाजरा.।।"
 
असे अनेक प्रसंग अतिशय भावूकतेने, मांडवीच्या भावविश्वाच्या बगिच्यातून निवडून आणलेले, सुंदर काव्यपंक्तींमध्ये गुंफलेले दिसून येतात.
 
चौदा वर्षांचा वनवास‌ पूर्ण करून राम अयोध्येत परत येणार म्हटल्यावर या तापसीच्या व्रताचीही सांगता होण्याची चिन्हं दिसू लागतात. 
 
ते वर्णवितांना कवयित्री म्हणते,
" लाल लालिमा घेऊन आली पुन्हा सकाळ हसरी,
प्राचीने क्षितिजावरती उधळल्या केसर रंग सरी. ।।
सलज्जित त्या सुंदर ललना, नूतन वस्त्रे लेवूनिया,
सडा शिंपूनी पवित्र धरणी पुन्हा रेखिती रांगोळ्या ।।"
 
किती सुंदर वर्णन...मिलनाचे!
महाराजा दशरथांची उणीव सगळ्यांनाच जाणवते. ते व्यक्त करतांना कवयित्री म्हणते,
"मंगल हा दिन, सुमंगल आसन, श्रीरामाचे हास्य गोजिरे,
प्रजा जमली राजमहाली, चित्र आज दिसे साजिरे ।।
अयोध्येसही भासत होती, दु:खाची ऐसी छाया,
दशरथ महाराज नाही आता हा दैवी क्षण बघाया.।।"
अशी अनेक उदाहरणे मी या खंडकाव्यातील देऊ शकते, परंतु मला वाटते हे संपूर्ण काव्य प्रत्येक काव्य रसिकाने वाचावे, 
 
त्यातील आशयघनता, रसाळ शब्द, उत्कृष्ट दर्जाचे यमक, सुयोग्य रुपक अलंकार, काव्यार्द्रता, त्यातून स्पष्ट होणारा भाव, प्रत्येक ओळीला असणारी विशिष्ट लय व सर्वात महत्वाचे म्हणजे संपूर्ण काव्याची( दहा सर्ग) प्रभावकारक मांडणी हे सगळेच वाचकास खिळवून ठेवणारे आहेत.
 
पुस्तकाचे नाव: प्रतीक्षा मांडवीची
काव्य प्रकार: खंडकाव्य 
( एकूण सर्ग: दहा)
कवयित्री: सुषमा ठाकूर, भोपाळ, मध्यप्रदेश.
प्रकाशक: Shopizen.in
समीक्षण: सौ. सुषमा राम वडाळकर, बडोदे.