गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By

मनात असंख्य प्रश्न उभे करणारी, “शिखंडी: स्त्री देहापलीकडे”

‘शिखंडी: स्त्री देहा पलीकडे’ नुकतीच ही कादंबरी वाचनात आली. डॉ. सध्या टिकेकर द्वारे अनुवादित ही कादंबरी माझ्यातल्या वाचकाला एका वेगळ्याच विश्वात घेवून गेली! 
 
‘महाभारत’ माझ्या साठी नेहमीच कुतूहलाचा विषय! आज आपण ‘गूगल’ करतांना कसे एका लिंकवरून दुसऱ्या लिंक वर आपोआप जातो आणि प्रत्येक लिंक  आपल्याला एक नवीन माहिती देते, ज्याला आपण ‘नेट सर्फिंग’ म्हणतो, तसेच काहीसे महाभारताचे आहे! एका पात्रामधून दुसरे पात्र, त्यातून तिसरे…असे असंख्य पात्र आणि प्रत्येकाची एक वेगळीच अचंबित करणारी कालजयी कथा! 
 
मूळ लेखिका सुश्री शरद सिंह यांच्या मते, “महाभारतात इतिहास आणि युद्धकथा तर आहेतच, मनोविज्ञान आणि विज्ञानाचे चमत्कृत करणारे ज्ञान देखील आहे. प्रक्षेपास्त्र, टेस्ट ट्यूब बेबी आणि शल्यचिकित्सेनं लिंग परिवर्तन याचे देखील दाखले महाभारतात मिळतात. यातील वैज्ञानिक ज्ञानामुळे महाभारताचं महत्व विश्वव्यापी झालं असून यातील लेखबद्ध विविध स्वरूपांचा अभ्यास अमेरिकेची अंतराळ अनुसंधान एजन्सी नासाकडूनही केला गेला आहे आणि सातत्याने केला जात आहे.”
 
त्या पुढे सांगतात, “ज्ञानाबद्दल बोलायचं झालं तर महाभारत हा ग्रंथ लौकिक, अलौकिक आणि पारलौकिक ज्ञानाचा महासागर असून श्रीमद्भगवद्गीतेसारखा मौल्यवान ग्रंथ च महासागराची देणगी आहे. या आद्य ग्रंथात म्हणजेच श्रीमद्भगवद्गीतेत वनमूल्यांना जाणून घेण्याची ठाम सूत्रं समाविष्ट आहेत. आधुनिक बाजारवादी तील मॅनेजमेंट गुरु देखील यशासाठी श्रीमद्भगवतगीतेतील श्लोकांचा आधार घेतात”
एवढी सुरुवात पुरेशी असते एका वाचकाला आकृष्ट करण्यासाठी! खरंतर मी महाभारतातील अनेक पात्रांवर सखोल अभ्यास केला आहे, कृष्ण, कर्ण, गांधारी, कुंती, द्रौपदी, अश्वत्थामा….पण शिखंडी बद्दल कधीच वाचले नव्हते!
 
महाभारतातील एक उपेक्षित वंचित पात्र म्हणजे शिखंडी. स्त्रीच्या अस्तित्वाबद्दल लढणारे स्वाभिमानी पात्र म्हणजे शिखंडी! स्त्रीने जर मनात आणले तर कोणालाही पराजित करू शकते हे ठामपणे सांगणारे पात्र म्हणजे शिखंडी आणि एकदा प्रण केले की ते पूर्ण करण्यासाठी कल्पने पलीकडे कष्ट सोसणारे व आजन्म संघर्ष करणारे पात्र म्हणजे शिखंडी.
 
नुकतीच शॉपिजन द्वारे ही कादंबरी प्रकाशित करण्यात आली‌.  मी कादंबरी वाचायला घेतली आणि थांबलेच नाही! एवढा प्रवाह…आणि वाहवत नेणारे कथानक! वेगवेगळ्या लहान-लहान कथा एका मध्ये एक सुरेख रीत्या विणलेल्या! काही आधी ऐकून होत्या, काही नवीन होत्या..
 
शिखंडी एक पात्र जे खूप काही विचार करायला भाग पाडते. शिखंडीची कथा व व्यथा वाचून असं वाटतं की आजही फार काही बदललेले नाही! 
 
“स्वयंवरस्थळातून पळवून आणलेल्या राजकन्यांचा स्वीकार करणारा, नियोगानं जन्मास येणाऱ्या संततीस मान्यता देणारा समाज, अविवाहित मातृत्वास मात्र सतत दूषणं देण्याइतका का कठोर होता याचं उत्तर शोधणं फार कठीण आहे.” पान ८३
 
स्त्री मनातील कोमल भावना, तिच्या इच्छा, तिच्या आकांक्षा आजही पायाखाली तुडवल्या जातात! आणि समाज! समाज तर तेव्हा सुद्धा स्त्रिला दोष देवून मोकळा झाला आणि आजही तेच करत आहे! आणि सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे एक दुसऱ्या स्त्रीला दोषी ठरवते! 
 
रामायणात जसे एकही पात्र चूक किंवा वाईट नव्हतं तसेच महाभारतात एकही पात्र बरोबर किंवा अचूक नव्हतं. सर्वांनी चुका केल्याच! तो धर्मवीर युधिष्ठिर असो की दिलेले वचन आमरण पाळणारा भीष्म असो! 
कादंबरी वाचल्यानंतर मला शिखंडीला सुद्धा काही प्रश्न विचारावेसे वाटले.. 
 
कादंबरीत एका ठिकाणी द्रौपदीबद्दल विचार करताना तो म्हणतो, “द्रोपदी तू देखील आपल्या सीमा ओलांडल्यास. का केलंस तू असं?” 
शिखंडीच्या मते द्रौपदीने महारथी कर्णाला त्याची योग्यता सिद्ध करण्याची संधी द्यायला हवी होती. पण मी म्हणते स्वयंवर होतं ना? मग स्वयंवर म्हणजे स्त्री इच्छा! नाही आवडत एखादा व्यक्ती बघता क्षणीच, आणि नं आवडण्याचे काही कारण नसते. मग नसेल आवडला द्रौपदीला कर्ण..आणि काहीबाही कारण सांगून दिला तिने नकार आणि जेव्हा स्वतः कर्णाने सुद्धा तिच्या इच्छेस मान दिला, तर मग शिखंडीच्या स्त्री हृदयाने असा प्रश्न का विचारला? 
 
बरं एवढेच नव्हे तर पुढे हे ही म्हटले, “की एक राजप्रासाद तुझ्या कटाक्षाने शापित झाला” 
पण समजा, जर द्रौपदीने दुर्योधनाचा अपमान केला नसता तर महाभारत युद्ध झाले नसते का? लाक्ष्यागृहात पांडवांना भस्म करण्याचे कट तर कौरवांनी आधीच रचले होते, तेव्हा तर द्रौपदी पांडवांच्या आयुष्यात सुद्धा नव्हती आली! द्रौपदीने अपमान केला नसता तरी युद्ध तर विधिलिखित होतेच! द्रौपदीने केलेला अपमान फक्त एक निमित्त होते…आणि अपराधाबद्दल शिक्षा देण्यात यावी, ‘वस्त्रहरण’ ही शिक्षा नसून एक अक्षम्य अपराध आहे. अपराधाच्या बदल्यात अपराध! हा कुठला न्याय?
 
शिखंडीने कौरवांसोबत संबंध कटु होण्यासाठी, आणखी तर आणखी महाभारत युद्धासाठी द्रौपदीला कारणीभूत ठरवले!
तसेच स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करण्यासाठी त्याने भीष्माला दोषी ठरवले आणि त्याचा सर्वनाश करण्यासाठी वचनबद्ध झाला आणि माझ्या मनात पुन्हा उभा राहिला की एखादा माणूस जो आपल्यासाठी अनोळखी आहे तो आपल्या सोबत अनावधानाने वाईट वागतो आणि दुसरा माणूस ज्याला आपण ओळखतो, विश्वास करतो तो जाणूनबुजून आपल्यासोबत वाईट वागतो तर जास्त मोठा गुन्हेगार कोण? भीष्म की शाल्वराज?? शिखंडीने भीष्माचा नाश करण्यासाठी प्रण केला अन् यश देखील मिळवले पण शाल्वराजाला सोडून दिले! का?  तो तर जास्त अपराधी होता…!
 
असो….. महाभारतातील प्रत्येक पात्र अप्रत्याशित व विचार क्षमतेच्या पलीकडे आहे आणि म्हणूनच प्रत्येक पात्र अतिशय रोचक आहे. विचारशक्तीला आह्वान देणारे आहे! काय योग्य काय अयोग्य याचा सारासार विचार करण्याची संधी म्हणजे ‘महाभारत’.
 
“शिखंडी: स्त्री देहापलीकडे” वाचताना असे असंख्य प्रश्न आपल्या मनात उभे राहतात! आणि वाचून मनात प्रश्न उभे करण्याची ताकद असणे हेच लेखनाचे यश असते. लेखन आपल्याला खिळवून ठेवते आणि कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे सुरवातीपासून शेवटपर्यंत असं कुठेच वाटत नाही की कादंबरी अनुवादित आहे..! हे एका अनुवादकाचे खरे यश आहे! अनुवाद करतांना डॉ. संध्या टिकेकर पूर्णपणे पात्रासोबत समरस झाल्या आहेत. अनुवाद करताना लेखकाच्या आत्म्यातील भाव जाणून घेणे अत्यावश्यक असते नाहीतर तो अनुवाद यशस्वी होत नाही, वाचकांच्या मनापर्यंत पोहचत नाही आणि लेखकाचा किंवा अनुवादाचा उद्देश साध्य होत नाही. पण इथे डॉ. संध्या टिकेकर यांनी हे सर्व उद्देश यशस्वीपणे साध्य केले आहे. अतिशय सुंदर अनुवाद झाला आहे. दर्जेदार व प्रवाही भाषा असल्याने अबाधित वाचन होते. मूळ हिंदीतील विचार मराठीत सुद्धा तेवढ्याच ताकदीने मांडले आहेत. उदाहरणार्थ,
*मानव कायमच स्वप्न आणि यथार्थ यांच्या कुठेतरी मध्ये जगत असतो. यथार्थ असह्य झालं की तो स्वप्नांच्या दिशेनं धावत सुटतो आणि स्वप्न भंगलं की त्यास यथार्थ स्वीकारावं लागतं. मानवी जीवन खरंच विचित्र आहे. समोर पाणी दिसत असूनही सतत ताहानलेलं.” पान १३१.
 
समाजातील दलित आणि शोषित स्त्रियांच्या हक्कासाठी सतत आपले मुद्दे रोखठोक मांडणाऱ्या मूळ लेखिका सुश्री शरद सिंह यांची “शिखंडी: स्त्री देह से परे” ही वेगळ्या विषयावर असलेली रोचक व वैचारिक कादंबरी मराठी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे अतिशय स्तुत्य कार्य डॉ. संध्या टिकेकर यांनी केले आहे. खरंतर मराठी वाचकांनी त्यांचे आभार मानले पाहिजेत.
 
ऐतिहासिक किंवा काहीतरी वेगळं वाचण्याची आवड असलेल्या प्रत्येक मराठी वाचकाने वाचावी अशी ही कादंबरी, “शिखंडी: स्त्री देहापलिकडे” 
अवश्य वाचा!
 
पुस्तकाचे नाव- शिखंडी: स्त्री देहापलिकडे 
मूळ लेखिका- सुश्री शरद सिंह
अनुवाद- डॉ. संध्या टिकेकर
प्रकाशक- शॉपिज़न 
किंमत: २३९/-
 
© ऋचा दीपक कर्पे