1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Updated : मंगळवार, 16 मे 2023 (14:29 IST)

प्रबुद्ध व सकारात्मक विचारांचे प्रस्तुतीकरण: नजर

ऋचा कर्पे या हरहुन्नरी साहित्यिकेचे हे तिसरे पुस्तक. कालच दुपारी कुरिअरने आलं. जरा चाळून बघावं म्हणून उघडलं मलपृष्ठावरील ऋचाचे विचार वाचून मग मुखपृष्ठ पाहिले. आकाशी निळ्या रंगाने मन नकळतच प्रसन्न झाले. आणि त्यावरील उत्तम चित्र बघितले व पुन्हा एकदा बघण्याची इच्छा झाली. अथांग आकाश, त्याच्यात दिसणारे सुंदर इंद्रधनुष्य , टेकडीवरील हिरवळ, त्यावर डौलात उभे असलेले हिरवेगार झाड, तर दुसऱ्या बाजूला उभा असलेला खडकाचा भला मोठा सुळका , इतस्थत: फिरत असलेले ढग, मधून वाहणारा निळसर पांढऱ्या पाण्याचा प्रचंड प्रमाणात वाहणारा झोत आणि त्यातून मार्ग काढणारी एकटी नाव व त्यात बसलेला नावाडी हे दृश्य अतिशय सुंदर तऱ्हेने चित्रित केलेले वाटले व पुन्हा पुन्हा बघत रहावेसे वाटले.
 
मुखपृष्ठ उलटल्यावर ऋचाच्या रश्मी ताईचा शांत व सुंदर फोटो आणि ऋचाच्या मनोगतात जाणवणारी तिच्या विषयीची प्रचंड ओढ व प्रेम या सर्वच गोष्टींनी नकळत काळजात घर केलं.
 
प्रस्तावना वाचली. मनोगत वाचलं. व आपल्या आई-बाबांकडून प्रेरणा घेऊन ऋचाने लिहिलेल्या या पुस्तकाचे पहिले पान उघडले.
 
१. लाल फुलांच्या फांदीवर -
या लेखात जाणवली ती म्हणजे ऋचाची नजर, जी बघते आहे हिरव्यागार वेलीवरील लाल चुटूक फुलांचे सौंदर्य, त्यांचे ताजेपण, त्यांचे चमकणे तसेच त्या फुलांमध्ये मधु प्राशन करणाऱ्या अगदी छोट्या छोट्या चकचकीत काळया रंगाच्या, पंख फडफडवून इकडे तिकडे उडणाऱ्या चिमण्या, त्यांचा चिवचिवाट.... आणि नकळतच जणू त्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान.... दिलेली सकारात्मकतेची भावना, कायम आनंदी राहण्याचा विचार.... सर्व सर्व विचारांचा संगम या छोट्याशा लेखात दिसला. व नकळतच मन अधिक सकारात्मक बनत गेलं.
 
२. आषाढाशी हितगुज
या लेखातही अशीच सकारात्मकतेची भावना ऋचाने सर्वांच्या मनात रुजवली आहे. आषाढ महिना हा मुख्य विषय घेऊन त्यायोगे अनेक गोष्टी अनेक भावना अतिशय सुंदर शब्दात व्यक्त केल्या आहेत.
 
३. प्रेम म्हणजे प्रेम असतं
हा लेख ऋचाने उत्कृष्टतेच्या चरम सीमेवर नेला आहे. प्रेम म्हणजे फक्त स्त्री पुरुष यातील प्रेम नसून फार फार विस्तृत अर्थ त्यात आहे, असे सांगून धरणीचे आकाशावर ,फुलाचे फुलपाखरावर, कमळाचे भ्रमरावर , चातक पक्षाचे पावसाच्या थेंबावर , ढगांचे इंद्रधनूवर, कवीचे कवितेवर इत्यादी उदाहरणे देऊन तिने हेच सांगितले आहे की प्रेम हाच जीवनाचा स्थायीभाव असतो. प्रेम कधीही कोणीही कोणावरही करावे. आई आणि वडिलांच्या प्रेमाचे प्रमाण देण्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नसते. आपल्या कुटुंबासाठी त्यांनी तन-मन-धन एक केलेले असते. हे सांगून ती शेवटी म्हणते की जग सुंदर आहे भरभरून जगा मन भरून गाणी गा कविता करा आणि या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा.
 
४.संक्रांत वही वजह नई
या लेखात ऋचाने आपण साजरा करत असलेला प्रत्येक क्षण कसा शास्त्रीय आधारावर तर्कशुद्ध आहे हे सांगितलं आहे. आणि अगदी खरं आहे ,संक्रांतीच्या वेळेच्या हवामानानुसार आणि शरीराच्या गरजेनुसार आवश्यक ते अन्न तिळ,गूळ, दाणे ,भाज्या इत्यादीच्या रूपात मिळावे म्हणून तिळाचे लाडू, गुळाच्या पोळ्या, हलवा , तऱ्हेतऱ्हेच्या भाज्या इत्यादी खाणे हे आरोग्यास आवश्यक असते . दिवस मोठा होत चालल्याने हळदीकुंकू सारखी आयोजने ज्यायोगे सर्वांची भेट होते, इत्यादी गोष्टी साठी आवश्यक तो विचार करून हे सण निर्माण केले गेले आहेत हे सांगतानाच तिने आपल्या पूर्वजांचाही विचार करून त्यांचीही दिनचर्या सांगितली आहे आणि म्हणून मोबाईलवर एकमेकांना शुभेच्छा देण्यापेक्षा खराखुरा सण साजरा करा, गच्चीवर जा पतंग उडवा यासारख्या सुंदर सूचनांनी तिन्ही हा लेख संपवला आहे. यातील प्रत्येक गोष्ट मनाला अगदी पूर्णतः पटलेली आहे. म्हणजे फक्त सत्य कथन नाही तर ते समोरच्याला पूर्ण पटावं अशा भाषेत तिने लिहिलेला हा लेख आहे.
 
५. शुभं करोति कल्याणम
या लेखातही ऋचाने पहिल्यापासून चालत आलेल्या परंपरेचा खरा अर्थ समजावून सांगितला आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी लॉजिक असल्याचा पुरावा दिला आहे . खास म्हणजे प्रत्येक लेखाच्या शेवटी जाणवते ती सकारात्मकता. प्रत्येक लेख आपल्याला सकारात्मकतेकडेच घेऊन जातो. दीप पूजा का करतो आपण? कारण की नैराश्येच्या काळोखातून मनाला उभारणी मिळते, मनावर नियंत्रण ठेवून दृढ संकल्पचा उजेड पसरवण्यासाठी, अज्ञानाचा ,संभ्रमाचा अंधार नाहीसा करण्यासाठी, मनाचा डलनेस कमी करण्यासाठी आणि मनाची भीती दूर करण्यासाठी अशा विविध कारणासाठी आपण दीप पूजा करतो. हे तिने खूप चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे.
 
६. कृष्ण समजलाच कुठे आपल्याला
या लेखात एका वेगळ्याच अंगाने कृष्णाचा विचार करून लेखनाला अंतर्बाह्य सुंदरता प्राप्त झाली आहे. श्रीकृष्ण म्हणजे कोण हे सांगताना ऋचा ने कृष्णाची अनेक रूपे विशद केली आहेत. आणि कृष्ण आपल्याला खरा कसा आहे ते कळलेच नाही ,हे सांगितलं आहे. कृष्ण हा लोभस बाळ, नटखट श्याम, लोणी हातात घेऊन रंगणारा कान्हा, झाडाच्या फांदीवर बसलेला गोपाळ, राधेचा प्रियकर द्रौपदीचा सखा हे सांगत असतानाच कृष्णाचे विराट रूप आणि त्याने अर्जुनास दिलेले मानसिक बळ हेही ऋचाने विस्तृतरित्या सांगितले आहे. व लेखाच्या शेवटी हेही विशद केले आहे की आज गरज आहे ती दृष्टिकोन बदलण्याची आणि श्रीकृष्णाला नव्याने समजून घेण्याची...
अतिशय आल्हाददायक लेख आणि पुन्हा सकारात्मकतेकडे घेऊन जाणारा...
 
७. भारत माता की जय
या लेखातही ऋचाने देश प्रेमाचे महत्त्व फार सुंदर शब्दात सांगितले आहे. देशभक्त कोण कोण असू शकतो हे ही तिने खूप छान अधोरेखित केले आहे आणि त्यामुळे तिचा हा लेख वाचून झाल्यावर मी सुद्धा काही विचार न करता जोरात म्हटले भारत माता की जय.....
 
८.चव
हा ऋचा चा लेख खरोखर अगदी चमचमीत आणि चविष्ट झाला आहे. तिच्या निपुणगे आजींच्या हातच्या पदार्थांचे रसभरीत वर्णन करून आणि तिने शाळेच्या मधल्या सुट्टीत खाल्लेल्या तिखट जाळ पाणीपुरी वगैरे पदार्थांचे तोंडास पाणी सुटवणारे वर्णन तिने या लेखात केले आहे. तिच्या लेखनावरून अजून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे तिचे सर्वांशी असलेले निर्मळ आणि सहज संबंध, आपुलकी, प्रेम ,आदर आणि आत्मीयता. ऋचा, तू कायम अशीच रहा ही इच्छा.
 
९. हसू डोळ्यातून सांडलं
या अप्रतिम लेखातून प्रामुख्याने जाणवतं ते ऋचाच संवेदनशील ,प्रेमळ आणि निसर्गात रमलेल मन. लिहायची पद्धतही इतकी चांगली आहे की आपण वाचायला कधी सुरुवात करतो आणि लेख कधी संपतो हे कळतही नाही. ऋचा, नवीन घर पांढऱ्या शुभ्र भिंती ,रंगाचा दरवळणारा सुंदर वास , काळी माती ,पावसाचे थेंब, मृदंगंध, हिरवीगार झाडे ,पारिजातक रातराणीची फुले ,सुंदर पक्षी, फुलपाखरे पक्षांचे घरटे ,पिल्लांचे येणे सर्व सर्व गोष्टींचे वर्णन फार सुंदर केले आहेस तू.तुझ्या लेखनातील अशा मनोवेधक प्रगतीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा.
 
१०. या, पुन्हा गाऊया
या लेखाद्वारे ऋचाने भुलाबाई किंवा पश्चिम महाराष्ट्रात ज्याला भोंडला म्हणतात किंवा हादगा म्हणतात या सणाबद्दल खूप सुंदर आठवणींच्या रूपाने आपले विचार मांडले आहेत. वाचत असताना नकळत मी ही माझ्या बालपणात गेले होते. बालपण मुंबईतील असल्याने आम्ही भोंडला असंच म्हणायचो. मलाही आठवतं आहे एका पाटावर हत्तीच चित्र काढलेल असायचं, त्या भोवती फेर धरून भोंडल्याची अनेक गाणी ऐकलेली, म्हटलेली आहेत. ऐलोमा , पैलोमा गणेश देवा, माझा खेळ मांडिला करी तुझी सेवा... या गीताने प्रारंभ व्हायचा... डब्यामध्ये न सांगितलेला प्रसाद म्हणजेच त्याला आम्ही खिरापत म्हणायचो, तो असायचा इत्यादी आठवणी माझ्याही जाग्या झाल्या. ऋचाने तिच्या बालपणाबरोबरच माझ्याही बालपणात मला जायला खूप मदत केली... नक्कीच आवडला हा लेख.
 
११. केव्हा तरी पहाटे
सध्या पहाट म्हटली की जो गडबड, गोंधळ, चिडचिड, धूर ,बेचैनी, घाम आणि लहानपणी आजोळी दिसलेली पहाट... भूपाळी ऐकताना आलेली जाग, चिमण्या, फुलपाखरू, देवघर, धूपदीप, गंध, फुले, उदबत्ती, स्वयंपाक ,खाद्यपदार्थांचा सुवास अशी ती जादुई पहाट दोन्हीतील अंतर ऋचाने आपल्या शैलीने अतिशय सुंदर वर्णिले आहे.
 
१२. गारवा
या काव्यमय लेखात ऋचाने फार सुंदर कवितेचे मनमोहक वर्णन केलेले आहे. ते वाचता वाचता आपण कधी त्याच्याशी एकरूप होतो ते आपल्यालाही कळत नाही... खूप सुंदर निसर्ग वर्णन या लेखात वाचायला मिळते आणि मनाला थंडावा देऊन जाते...
 
१३. राधेय....माझ्या भावना
या लेखात रणजित देसाई यांच्या राधेय या कादंबरी वरील आपले विचार संवेदनशील ऋचाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहेत... माझ्या स्मरणातून बऱ्याचशा गोष्टी नाहीशा झाल्या आहेत त्यात या कादंबरीचे अंशही. पण ऋचाच्या या लेखाच्या वाचनानंतर मनाने निश्चय केला पुन्हा एकदा वाचूया ....राधेय.
 
१४. व्हाट्स इन युअर माईंड
पूर्ण सकारात्मकता दर्शविणारा हा लेख ऋचाच्या लेखणीतून साकारला आहे. सुरुवातीच्या फेसबुकच्या उल्लेखाने प्रारंभ ही अतिशय वेधक असा झाला आहे. आणि जाणवतं ते हेच की कोणत्याही कारणाने मनाला निराशा, उदासीनता येऊ देऊ नका. विचार फक्त आजचा करा. मन शांत व प्रफुल्लित ठेवा . आणि हे लक्षात ठेवा की जरी रात्र येते तरी त्यानंतर दिवसही येतो. वा!! ऋचा, वा !! जियो हजारो साल..
 
१५. बाप्पा काय म्हणतात
प्रत्येकाने विचार करावा व यातून काहीतरी शिकवण घ्यावी असा हा लेख. गणपती बाप्पा ने गोड शब्दात केलेली कान उघडणी... एका बोधकथेसारखा हा लेख सुंदर झाला आहे.
 
१६. टेक्नो फ्रेंडली होणे काळाची गरज
खरोखर आजच्या काळात टेक्नो फ्रेंडली होणं हे अतिशय जरुरी आहे हे विशद करणारा हा माहिती पूर्ण लेख. आणि यातील शब्दनशब्द खरा आहे. तांत्रिक शिक्षण आता कंपल्सरी झाल आहे. आधीच्या काळात ते तसं नव्हतं. योगायोगाने मी मात्र पोस्ट ग्रॅज्युएशनच कम्प्युटर्स प्रोग्रामिंग सिस्टम एनालिसिस अंड एप्लीकेशनस मध्ये केल्याने पाया पक्का झाला असल्याने आज संगणक चालविण्यात किंवा मोबाईल ची कार्यपद्धती समजण्यास वेळ लागत नाही. पण यापुढील पिढीतील सर्वांनाच तंत्रज्ञान घेणे अनिवार्य असल्याने असे अडथळे येणार नाहीत असे वाटते. लेख विविध उदाहरणंमुळे निश्चितच पठनीय झाला आहे.
 
१७. मन आणि मस्तिष्क प्रदूषण
हवेतील ,वातावरणातील प्रदूषणाबरोबरच मनातील विचार संस्कार हे चांगले असले पाहिजेत, विकासाकडे नेणारे असले पाहिजेत ,विनाशाकडे नको असे सांगणारा हा एक सुंदरसा लेख.
 
१८. माझे जगणे राहून गेले
जीवन कसे जगावे हे सांगणारा शिकवणारा हा एक अत्युत्तम लेख. अंतर्बाह्य सकारात्मकता देणारा. जीवनाचा प्रत्येक क्षण कसा उपभोगावा, निसर्गातील सौंदर्य कसे टिपत जावे आणि अनेक गोष्टी ऋचाने तिच्या अफाट, अचाट दृष्टिकोनातून सांगितल्या आहेत. आणि आपल्यालाही पटते की "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे..."
 
तर एकंदर पहिल्या लेखापासून ते अठराव्या लेखापर्यंत नजर सरसर फिरत गेली ,आणि बुद्धी व मन दोन्ही , प्रत्येक गोष्ट रिचवत गेले प्रत्येक विचार पटत गेला आणि सकारात्मकतेने ओथंबून गेलेले मन ऋचाच्या या प्रतिभाशाली व सुंदर विचारांनी स्तिमित झाले व भरून आले.
असेच वैविध्यपूर्ण व उच्च दर्जाचे साहित्यिक लेखन नेहमीच करत जा या शुभेच्छा देऊन मी ऋचाला शुभेच्छांबरोबरच खूप खूप प्रेम देत आहे.
 
 
सुषमा ठाकूर.
 
पुस्तकाचे नाव: नजर
प्रकाशन : शॉपिजन
किंमत: 150/- (शॉपिजन वर) 
ॲमेझॉन, फ्लिपकार्ट व शॉपिजन वर उपलब्ध!