शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (08:12 IST)

राज्यात बुधवारी १४८५ नवीन रुग्णांचे निदान

राज्यात बुधवारी २ हजार ५३६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख ४३ हजार ३४२ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५३ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरल्यात जमा आहे. कारण, दररोज आढणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून, करोनामधून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. 
 
 राज्यात बुधवारी १४८५ नवीन रुग्णांचे निदान झाले. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,०६,५३६ झाली आहे. राज्यात एकूण १९,४८०ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आज ३८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. 
 
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,२२,०२,८११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,०६,५३६ (१०.६२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ७२ हजार ६०० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९३३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यातील लसीकरणाचा वेग घसरला
दिवाळीच्या तोंडावर राज्यात जागोजागी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत असून करोनाच्या नियमांचे पालनही नागरिकांकडून होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर पहिली लस मात्रा घेतलेल्या सुमारे ७५ लाख लोकांनी मुदत उलटूनही दुसरी लस मात्रा घेतलेली नाही. यातील गंभीर बाब म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात लसीकरणाचा वेगही घसरला आहे. महाराष्ट्रात आजघडीला ९ कोटी ६२ लाख ८३ हजार ५५१ लोकांचे लसीकरण झाले असले तरी गेल्या महिन्याच्या तुलनेत दैनंदिन लसीकरणाचा वेग मंदावला आहे. गेल्या महिन्यात साधारणपणे आठ लाख ते दहा लाख दररोजचे लसीकरण होत होते. परिणामी सप्टेंबर महिन्यात राज्यात २ कोटी २८ लाख लोकांनी लस मात्रा घेतल्या होत्या तर ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत केवळ दीड कोटी नागरिकांनीच लस मात्रा घेतल्या आहेत.