सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गजानन महाराज शेगाव
Written By
Last Updated : गुरूवार, 10 नोव्हेंबर 2022 (07:53 IST)

देव नांदतो मंदिरात; मठात पर स्पंदतो हृदयात..

gajanan maharaj
पुण्याहून सुटलेली गाडी अखेर शेगावला आली. साहेब खाली उतरले; बाईपण उतरल्या..! 
"आलं एकदाचं तुझं शेगांव "साहेब पुटपुटले व म्हणाले; "आता हे आपल्या बरोबरचे सामान कोण नेणार? रहायची काय सोय होणार ? गर्दी किती आहे पाहिलंस? तरी मी म्हणत होतो. मला यायचचं नव्हतं...
या बाबाच्या पायात सगळं वाया घालवलं..!"
 
"आता पुरे करा की! " त्या म्हणाल्या. 
तितक्यात एक वयस्कर गृहस्थ मुंडासे बांधलेला धांवत धावत आला..
" जी; सामान न्यायचंय? " 
साहेब त्याला वरपासून खालपर्यंत निरखत राहिले..! 
 
बाईच म्हणाल्या "न्यायचंय. पण गर्दी दिसतेय. कुठं रहायचं ठरलं नाहीए 
आणि कोण तुम्ही नेणार? " 
"हां " साहेब संशयानं अजूनही पहात होते.
बाईंना म्हणाले "कोण कुणास ठाऊक माहिती नाहीए. तू लागलीस बोलायला " 
"जी.....मी बराबर घेऊन जातो बगा ..छान रहायची सोय बी व्हईल " 
"मग घे सामान? " बाई म्हणाल्या.
"घे सामान काय? कोण रे तू? आणि नेणार कुठं? नाही त्या ठिकाणी नेशील आणि आम्हाला सामानाला मुकावं लागेल " साहेब म्हणाले....
 
तो वयस्कर गृहस्थ हसला ; " माजं नाव गजू ..म्या कशापाई फसवेन? फसलेत तर समदेच हो देवा; कुनी शहाना न्हाई आणि मग म्याच मारग दाखवतो..! चलातर " असं म्हणत त्यानं सामान डोक्यावर घेतलंही.
बाईं साहेबांना हळूच म्हणाल्या "आता गप्प बसा..किती गर्दी आहे. सोय झाल्याशी मतलब. " 
एका छानशा घरापाशी सामान नेऊन त्या गजू नी त्यांची व्यवस्थित सोय लावली.. साहेब लंगडत होते हे त्यानं पाहिलं होतं. सोय लागताच त्यानं विचारलं "पायाला काय झाल जी ? " 
"2 वर्षापूर्वी अॅक्सिडेंट झालेला. हाडाचा चुरा झाला. .ऑपरेशन झालं होतं. पण पाय अधू झाला." बाई म्हणाल्या.
गजू साहेबाच्या पाया नजिक बसला.....त्याच्या डोळ्यात करुणा दाटली..! "गजानन  बाबाची कृपा म्हनून आलायसा न्हवं " तो म्हणाला.
 
ते ऐकून साहेब ऊसळले " कसले बाबा कसलं काय?  माझा विश्वास नाहीए. हिच्यासाठी आलोय इथं..मी तर कधीही यापूर्वी आलो नाही. हिनं अखेरची शपथ घातली म्हणून आलो. मला असल्या बाबावर विश्वास नाही ....! 
जा बाई आता दर्शन करुन ये मी जरा पडतो.....कटकट आहे ..!" 
 
"जा तुम्ही बाई मी थांबतो हतंच......साहेब तुमचा पाय मालिशनं बरा करतो " गजू म्हणला.
"नको रे आहे ते बिघडवशील " साहेब म्हणले.
" मी येते जाऊन. "बाई म्हणाल्या व गेल्या. 
गजूनं साहेबांचा पाय हाती घेतला.....जसा पाय चोळत गेला.....तसं साहेबांना निद्रा लागली..थोड्यावेळानं जाग आली तेव्हा खूप बरं वाटत होतं..त्यांनी पाहिलं. ऊशापाशी गजू होता..!! सहज पायाकडं लक्ष गेलं. काहीतरी पानं बांधून पट्टी बांधलेली. 
 
साहेब क्षीण आवाजात म्हणले "अरे गजू; पाणी हवंय जरा देतोस का? " त्यानं लगबगीनं पाणी आणलं. आधार देत स्वत: पाणी पाजलं .." बरं वाटेल बगा आता तुमाला. लै प्रवास जाला नं म्हनून. गजू  म्हणाला " 
"बरं वाटतंय ;चहा मिळाला तर बरं होईल ..,
"हां आन्तो नं ..!" म्हणत गडबडीनं गेला. चहा आणला. पुन्हा आधार देत चहा पाजला..
साहेबांनी त्याच्याकडं प्रेमानं पाहिलं व म्हणाले ;."गजू ;  एक सांगू तुझ्यातच देव आहे आणि हाच देव खरा...आणि लोक मुर्खासारखे मंदिर ;मठाचं स्तोम माजवतात..कुठले बूवा अन कुठले बाबा. " 
"बराबर आहे ;गजू म्हणाला "; त्यो नांदतो मंदिरात; मठात पर स्पंदतो हृदयात..!" 
यांवर साहेब हसले म्हणले.;"भोळा आहेस; तू इतकं केलंस......तोच देव." 
 
"आदी संशाव घेतलात" गजू म्हणाला.
साहेब लगेच ऊत्तरले;" "तसं वागावं लागतं. फसवणूक होते 
" गजू हसला " बराबर हाय मानूस हरघडी फसतो. त्याला ऊमगत न्हाई. समोर असूनबी ..; तो ऊठत म्हणाला "; बरं जाऊ का? झालं जी काम माजं " साहेबानं त्याचे हात पकडले "का चाललास? बस की थोडा"
तो म्हणला " हाय म्या हतंच कायमचा.. पर न्हाई अजून कुनीतरी आल्येलं असल न्हवं. त्याचं बघायला हवं " 
अन् हे बोलून गजू वळाला आणि दिसेनासा झाला..
 
बाई घाईघाईनं वर आल्या "अहो गजू कुठंय? " 
साहेब म्हणले "गेला तो " बाई तिथंच कोसळल्या..रडायला लागल्या ..साहेबांना कळेना ते उठले. पायातील कळ गेलेली..आश्चर्य वाटलं. तिला सावरत विचारलं "काय झालं?काही चोरीला बीरीला गेलं का ? 
" बाईंनी पाहिलं "काय विचारता हे..हो गेलंय चोरीला..मिच चोरीला गेलीय ......मी मठात गेले. तिथं नमस्कार केला अन् बाबांच्या मुखवट्यात गजूचीच मुर्ती.......
 
साहेब मटकन खाली बसले. सगळं आठवलं त्याचे बोल- म्या हाय हतंच कायमचा ..समोर असूनबी वळकत न्हाई ..आपण बोललो.."तुझ्यात देव आहे मठात ;मंदिरात नाही " तो ऊत्तरला "मठात मंदिरात नांदतो;हृदयात स्पंदतो "..साहेबांच्या नास्तिकतेचा वज्रलेप कोसळला..देव असाच भेटत असतो पण अहं च्या योगाने कळत नाही आणि दिसतही नाही..म्हणूनच नास्तिकता वर्चस्व गाजवते...ह्या विचारांत गजूचा चेहरा आठवला.एकदम गजू हे नावही वीजेसमान चमकून गेलं..अरे बाबा म्हणाले होते मी गेलो ऐसे मानू नका कदा मजलागी विसरू नका मी आहे एथेच गजानन माझीच मूर्ती हल्ली तुमच्या वर्‍हाड प्रांती हे जाणवताच साहेबांचा बांध फुटला...डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. अंत:करणापासून त्यांनी हांक मारली "बाबा sss!! " माझे बाबा माझे बाबा...माझे बाबा गजानन बाबा
 
!!जय गजानन!!

-सोशल मीडिया