शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By वेबदुनिया|

गणगौर व्रत

गणगौर व्रत हे उत्तर भारतात गुढी पाडव्याच्याच काळात साजरे केले जाते. हे व्रत चैत्र शुक्ल तृतीयेला करतात. होळीच्या दुसर्‍या दिवसापासून ज्या नवविवाहिता रोज गणगौर पूजतात त्या चैत्र शुक्ल द्वितियेच्या दिवशी नदी वा तलावावर जाऊन आपल्या गणगौरीला पाणी पाजतात. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी त्यांचे विसर्जन केले जाते. या व्रताने पतीची कृपा आपल्यावर रहाते आणि कुमारिकांना चांगला पती मिळतो, यासाठी केले जाते. 

याच दिवशी शंकराने पार्वतीला आणि पार्वतीने समस्त स्त्री जातीला सौभाग्य बहाल केले होते. सुवासिनी हे व्रत घेण्यापूर्वी गौरीची स्थापना करतात व त्यांचे पूजन करतात. त्यानंतर गौरीची कथा सांगितली जाते. मग गौरीला लावलेले कुंकू सुवासिनी आपल्या भांगात भरतात. या काळात स्त्रिया केवळ एकदाच जेवण करतात. गणगौरीचा प्रसाद पुरूषांसाठी वर्ज्य असतो.

गणगौर व्रतासंदर्भात एक पौराणिक कथा आहे. एकदा शंकर व पार्वती नारदांसमवेत भ्रमण करत होते. या काळात ते एका गावात पोहोचले. प्रत्यक्ष शिव आणि शक्ती आलेत, हे पाहून गावातल्या स्त्रिया हरखल्या. त्यांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली. त्यासाठी विविध पक्वान्ने बनवायला घेतली. उच्चकुलीन स्त्रियांना स्वागताचा मोठा घाट घातला होता. त्यामुळे त्यांना उशीर झाला. पण खालच्या वर्गातील स्त्रियांनी फक्त हळद आणि अक्षता घेऊन शंकर व पार्वतीची पूजा केली. त्यामुळे खूष झालेल्या पार्वतीने सौभाग्याचा रस त्यांच्यावर शिंपडला. या महिलांना अखंड सौभाग्याचे वरदान मिळाले. त्यानंतर विविध पक्वान्ने घेऊन उच्चकुलीन स्त्रिया गेल्या. पण त्यांना उशीर झाला होता. त्यावेळी शंकराने पार्वतीला विचारले, तू तर तुझ्याकडचा सगळा सौभाग्यरस आधी आलेल्या स्त्रियांवर शिंपडलास आता यांचे काय करणार? त्यावर पार्वतीने आपले बोट कापून त्यातून निघणारे रक्त सौभाग्यरस म्हणून त्या महिलांच्या अंगावर शिंपडले. ज्या महिलांच्या अंगावर जसे थेंब पडले तसे सौभाग्य त्यांना प्राप्त झाले.