शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

अन्न- संस्कार

आयुर्वेदानुसार अन्नातील उपयुक्त आवश्यक चवी..
मधुर, तिक्त, कषाय, लवण इ मुख्य
भोजन बनवणारी व वाढणारी व्यक्ती..
•आप्त- स्वकीय आपुलकी प्रेम जिव्हाळा असलेली
•तृप्त- प्रसन्न स्वतः नेहमी आनंदी असणारी
•युक्त - भोजनशास्त्र व वाढप कलेत कौशल्य असणारी व मायेने परिपूर्ण
•मुक्त - षड्रिपूंपासून दूर, निरोगी, स्वस्थ शरीर व मनाची अशी असावी..
 
अन्नपदार्थांचे प्रकार..
भक्ष्य, भोज, लेह्य, चोष्य..
दातांनी चावून, जिभेने चाटून, ओठांनी ओढून व चाखून गिळून घेण्याचे पदार्थ असावेत..
 
भोजन ताट-पान वाढण्याची व अन्नग्रहणाची शास्त्रोक्त पद्धत..
• शुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ वाढावे..
• त्याच्या डावीकडे लिंबू व क्रमाने चटणी कोशिंबीर-सलाड-रायते पैकी एक (ऋतूनुसार उपलब्ध पदार्थांचे), 
• तळण- भजी, सांडगे, पापड, कुरडई इ( सणवारी ऋतूनुसार) इतके वाढावे..
• सामान्यतः उजव्या हाताने जेवतात; त्यामुळे जे पदार्थ कमी खायचे ते तोंडी लावण्याचे चाटून खायचे पदार्थ डावीकडे वाढावेत. स्वाभाविकता मनुष्य उजव्या हाताने खाताना डावीकडचे पदार्थ कमी खातो.
• याचवेळी भोजनमंत्र सुरू करावा. येथपर्यंत आम्लयुक्त आंबट व तुरट पदार्थामुळे जिव्हेवरची लाळ सुटायला प्रारंभ होतो. ज्यामुळे अन्न पचनास सुलभता येते. मोठ्याने भोजनमंत्र म्हटल्याने त्या आघाताने टाळू व कंठातील ग्रंथी स्रवायला लागतात. मुखातून चावून बारीक झालेल्या अन्नाच्या तुकडे यामुळे अन्ननलिकेत सहज ढकलले जातात.
• यानंतर भोजनकर्त्याच्या समोर ताटाच्या मध्यभागी खालच्या बाजूस जड पदार्थ (चपाती पोळी भाकरी इ) वाढावा. 
• उपवास सोडायला बसलो असू तर प्रथम तिथेच वरणभात वाढावा. जो सहजपाच्य आहे आणि कर्बोदके व प्रथिने दोन्ही पुरवतो.
• उजवीकडे मुख्य सुकी व रस्साभाजी वाढावी. जी सर्वात जास्त ग्रहण करायचे व्यंजन आहे. यात तेल मसाले कमी असावेत व मूळ स्वभावात स्वाद असावा.
• वर मिठाच्या उजवीकडे आमटी (द्रव) व मध्ये गोड पदार्थ (जर सणाचे जेवण असेल तर) वाढावेत. हे भाजीच्या बरोबरीच्या प्रमाणात घ्यावेत. अशा पदार्थांमुळे कर्ब प्रथिने स्निग्ध खनिजे इ व जीवनसत्त्वयुक्त अन्नाची गरज पूर्ण होते.
• डावीकडे (इतर अन्नापेक्षा कमी प्यावे म्हणून) पेल्यात पाऊण भरेल एवढेच पाणी शेवटी वाढावे. या क्रमाने वाढल्याने एक चक्र पूर्ण होते.
• येथपर्यंत भोजन मंत्र संपला पाहिजे. तोपर्यंत अन्ननलिकेतून खाली जठर आतडे यकृतापर्यंत संदेश पोचतो की त्यांनी क्रियाशील व्हायचे आहे. ते ग्रहणासाठी तयार राहतात.
• यानंतर जेवणार्‍याने चित्राहुती घालावी. (या क्रियेत व वैश्वदेव इ मध्ये सृष्टीच्या कल्याणाची कामना असते. याविषयी नंतर सविस्तर पाहू.)
• मग अन्न ग्रहण करण्यास आरंभ करावा.
• पहिला घास घेऊन चावून चोथा करून अन्ननलिकेकडे ढकलावा व दुसरा घास घ्यावा. तो आनंदाने मनःपूर्वक चावून रसना तृप्त होईपर्यंत पहिला घास चावला जाऊन तो जठरात साचतो. तिथून नंतर आतड्यातून खाली रस व मल विभक्त होवून सरकतो.
• अशी भोजनप्रक्रिया ही शरीर व मनोविज्ञान शास्त्र अनुकूल असून मानवी देह व मनास फलदायी आहे. या प्रक्रियेत केवळ शाकाहारच वेळेच्या नियोजनात बसतो. मांसाहाराला गरजेची आंतर्यंत्रणा मानवी शरीरात नसल्याने तो निषिध्द समजला आहे.
• भोजन पूर्ण करताना पुन्हा धन्यवादाचा मंत्र म्हणून तृप्त मनाने आपोष्णी - तीन वेळा आचमन करून आजूबाजूला पडलेले खरकटे स्वतः गोळा करावे व भोजनास बसलेल्या सर्वानी एकत्र (वडिलधारी मंडळींच्या आधी उठून त्यांचे ताट स्वतः उचलावे) उठावे.
• ताटातील उष्टेखरकटे शक्यतो स्वतः योग्य त्या जागी ठेवून ताटात पाणी घालून विसळून ठेवावे.
• जेवताना शक्यतो अन्नगप्पाच व्हाव्यात. ही भोजन सभ्यता आहे.
 
भोजन मंत्र
प्रारंभी
ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सहवीर्यं करवावहै । तेजस्वि नावधीतमस्तु । मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।। 
 
अंती
हरिर्दाता हरिर्भोक्ता हरिरन्नं प्रजापतिः | हरिः सर्वशरीरस्थो भुङ्क्ते भोजयते हरिः |
 
• याव्यतिरिक्त पंगतीत वाढप यंत्रणेस वेळ लागतो म्हणून देव देश धर्मस्तुतिचा गजर करावा. अन्नप्रमाण वय व्यवसाय ऋतु बल इ विचार करुन घ्यावे.
 
आसन
• ऋतूनुसार मऊ बैठक असावी
• मांडी घालून बसावे. यामुळे रक्तपुरवठा उदराकडे आवश्यक तितका सरकतो व चयापचय योग्यरित्या घडते.
• शक्यतो हातांच्या बोटांनी ग्रहण करावे. कारण ओठ जिव्हा बोटे यांचे तापमान एकसमान असल्याने आंतर्व्यवस्थेला उचित संदेश पोचतो व लाळ ग्रंथी नेमून दिलेले कार्य न बिचकता करतात.