शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 22 ऑगस्ट 2020 (17:14 IST)

गजानन महाराजांनी भक्तांना दिलेला शेवटचा संदेश

गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत... त्यांचा जन्म कधी झाला हे माहित नाही परंतु 20 वर्षांचे एक तरुण म्हणून शेगाव येथे त्याचे प्रथम परिचित स्वरूप फेब्रुवारी 1878 रोजी आहे. सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात अशी त्यांची देहचर्या होती. पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व तिला छापी गुंडाळलेली असे..
 
महाराजांना झुणका भाकरीसोबतच शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर अतिशय आवडत असे.  गरीबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. म्हणूनच आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वान्नांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात.
 
आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे शेगांवात व्यतीत केला असला तरी कारणपरत्वे महाराजांची भ्रमंती अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागांतल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे. गजानन महाराजांनीही त्यांच्या अवतार कार्यात अनेक चमत्कार केले.
 
जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतारसमाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे, त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. आणि भगवंताला म्हणाले की तुझ्या आज्ञेनें आजवर भूमिवर भ्रमण करुन जे जे भाविक नर होते त्यांचे मनोरथ पूर्ण केले. आता अवतार-कार्य संपलें म्हणून पुंडलीक वरदा विठठले आता जायाची आज्ञा असावी. त्यांनी देवाकडे भाद्रपद मासीं वैकुंठासी जाण्याची इच्छा दर्शवली. समर्थांनी विठ्ठलाला ऐसी विनवणी केली आणि डोळ्यात हरीच्या विरहामुळे अश्रु वाहू लागले.
 
गणेश चतुर्थीच्या दिवशीं महाराजांनी अवघ्यांना भक्तांना बोलावून म्हणले की गणेशपुराणांत अशी कथा ग्रथित आहे की चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा, त्याची पूजा-अर्चा करुन नैवेद्य दाखवावा आणि दुसर्‍या दिवशी विसर्जन करावे. गीता शास्त्राप्रमाणे देखील शरीर वस्त्रापरी बदलण्याचे निर्धार आहे. बाळाभाऊला गादीवर बसवून ते म्हणाले की मी गेलो ऐसे मानूं नका, भक्तींत अंतर करुं नका, मजलागीं विसरुं नका. मी येथेच आहे असे म्हणत योगाद्वारे रोधिला असे प्राण, दिला मस्तकीं ठेवून, त्या महात्म्या पुरुषाने.
 
शके अठराशें बत्तीस साधारण नाम संवत्सरास भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवारीं प्रहर दिवसाला, प्राण रोधिता शब्द केला.... ’जय गजानन’ ऐसा भला आणि सच्चिदानंदी लीन झाला.
 
समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले, "आम्ही आहोत येथे स्थित | तुम्हा सांभाळण्याप्रति सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||"
 
लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती.
 
असे म्हणाले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविला.
 
महाराजांचे भक्त समाधीच्या मिरवणुकीत सहभागी झाले. लोकांनी शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून मिरवणूक पहाटे मंदिरात आली; तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला.
 
त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा, अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला, "जय गजानना |ज्ञानांबरीच्या नारायणा | अविनाशरुपा आनंदघना | परात्परा जगत्पते ||" आणि शिळा लावून समाधीची जागा बंद केली.
 
८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली.