सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 22 फेब्रुवारी 2024 (12:59 IST)

मूत्रावर कर आकाराला जायचा असा देश तुम्हाला माहिती आहे का?

रोमन सम्राट वेस्पासियन यांनी एकदा त्यांचा मुलगा टायटसच्या नाकाजवळ एक सोन्याचं नाणं नेलं आणि "यातून दुर्गंध येत आहे का?" असं विचारलं.
 
टायटसनं त्यावर नाही असं उत्तर दिलं.त्यावर "दुर्गंध नाण्यातून नव्हे तर मूत्रामुळं (त्यावर लावलेला कर) येत आहे," असं वेस्पासियननं म्हटलं. रोमन इतिहासकार सुएटोनियस यांनी वेस्पासियन आणि त्यांचा मुलगा टायटस फ्लेवियस यांच्यातील चर्चेचं हे वर्णन केलं आहे.ही चर्चा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची असावी, असा त्यांचा अंदाज आहे. टायटसनं तेव्हा मूत्र व्यापारावर त्यांचे वडील वेस्पासियन यांनी लावलेला कर हा 'घृणास्पद' असल्याचं म्हटलं होतं. जॅस सुएटोनियस यांना रोममधील पहिल्या 12 सीझर्सची आत्मचरित्र लिहिण्यासाठी ओळखलं जातं. रोमन साम्राज्याशी जवळीक असल्यानं त्यांनी रोमनच्या शाही कुटुंबाबाबत बरंच लिखाण केलं, असं म्हटलं जातं.
 
प्राचीन रोमन साम्राज्यात मूत्र ही एक मौल्यवान वस्तू होती. सार्वजनिक शौचालयं आणि रहिवासी भागांमधून त्याचं संकलन केलं जात होतं. त्याचा वापर टूथपेस्ट तयार करण्यासाठीचा कच्चा माल म्हणून केला जात होता.
त्यावर 'व्हेक्टिगल यूरिन' नावाचा कर लावण्यात आलेला होता. वेस्पासियन यांच्याशिवाय नीरोनंही मूत्र खरेदी-विक्रीवर हा विशेष कर आकारला होता. मूत्र संकलन आणि त्याचा वापर या दोन्हीवर पहिल्या शतकामध्ये पाचवे रोमन सम्राट नीरो (ज्यांच्या शासनकाळात रोम जळालं होतं) यांनी हा कर लावला होता. पण नंतर तो रद्द करण्यात आला. लोकांनी याला विरोध केल्यानं तो रद्द केल्याचं सांगितलं जातं. ईसवीसन 69 मध्ये त्यांचे उत्तराधिकारी रोमन सम्राट वेस्पासियन यांनी पुन्हा एकदा हा कर आकारला होता.
 
मूत्र मौल्यवान कसं बनलं?
ओएफ रॉबिन्सन यांनी 'अॅनशियंट रोम : सिटी प्लानिंग अँड अॅडमिनिस्ट्रेशन' नावाचं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकानुसार रोममध्ये 144 सार्वजनिक शौचालयं होती. "या सार्वजनिक मूत्रालयांमध्ये बादल्या ठेवलेल्या असायच्या. त्यांना 'डोलिया कार्टा' म्हटलं जायचं. त्यात मूत्र गोळा केलं जात होतं. हे काम करण्यास उशीर झाल्यास अधिकाऱ्यांसाठी शिक्षेची तरतूदही करण्यात आलेली होती," असं त्यांनी लिहिलं आहे. सायन्स इश्यूजमध्ये लिखाण करणारे मोही कुमार यांच्या मते, "मूत्र हा युरियाचा मुख्य स्त्रोत आहे. ते नायट्रोजन आणि हाइड्रोजन यांचं संयुग आहे. दीर्घकाळापर्यंत साठवून ठेवलं तर युरिया अमोनियामध्ये परावर्तित होतं." आजच्या काळात काच, स्टील, तेलाचे डाग अशा अनेक गोष्टी स्वच्छ करण्यासाठी वापर करण्यात येणाऱ्या द्रव पदार्थांमध्ये अमोनियाचा समावेश होतो. मोही कुमार यांच्या मते, अमोनिया पाण्यात कास्टिकसारखं काम करतं. त्यामुळं प्राण्यांची कातडी नरम किंवा टॅन (रंग बदलणे) करण्यासाठी मूत्राचा वापर केला जातो.
 
गुरांची कातडी मूत्रात भिजवल्यामुळं चर्मकारांना कातडीवरून केस आणि मांसाचे तुकडे काढणं सोपं झालं. "काही प्रमाणात अॅसिड असलेली घाण आणि तेलाचे डाग अमोनियाचा वापर करून स्वच्छ करता येतात. मूत्रामुळं कापड अधिक शुभ्र होतं आणि त्याचे रंगही अधिक खुलून दिसू लागतात," असं ते लिहितात. "मूत्र निर्जंतूक होऊन त्याचं अमोनियात रुपांतर होईपर्यंत ते बादल्यांमध्ये भरून ठेवलं जात होतं," असं ओएफ रॉबिन्सन यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे.
 
मूत्राचा वापर आणि धोबी
प्राचीन रोममधील लोक अमोनिया असल्यामुळं स्वतःच्या मूत्राचा वापर दात चमकावण्यासाठी माऊथवॉशसारखा करत होते. निकोलस सोकिक यांनी व्हँकुव्हर सनमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात तसं लिहिलं आहे. पण रोमन सैन्य आणि रोमन कलाकृतींवर संशोधन करणारे डॉ. माइक बिशप यांच्या मते, "सगळेच रोमन असं करत नव्हते." तसंच कॅटुलस नावाच्या एका कवीनं त्याच्या कवितेत या कृत्यासाठी एका व्यक्तीची खिल्लीही उडवली होती. इतिहासकार आणि मॅरिस्ट कॉलेजमधील तत्वज्ञानाचे प्राध्यापक जोशुआ जे. मार्क यांनीही याबाबत उल्लेख केला आहे. प्राचीन रोममध्ये धोबी (त्यांना फुलर म्हटलं जायचं) कपडे स्वच्छ करण्यासाठी आणि चमकावण्यासाठी नैसर्गिक ब्लिचिंग एजंट म्हणून मानव आणि जनावरांच्या मुत्राचा वापर करायचे.
 
या कामासाठी त्यांच्याकडं हीन भावनेनं पाहिलं जात होतं, असंही त्यांनी लिहिलं होतं. पण त्यावेळी असे अनेक धोबी होते ज्यांनी या कामातून भरपूर पैसा आणि यशही मिळवलं होतं. प्राचीन रोमबाबत संशोधन करणारे इतिहासकार बीके हार्वे यांच्या मते, "काम करताना मूत्राचा वापर करत असल्यानं धोबींकडं हीन भावनेनं पाहिलं जात होतं. पण त्याचवेळी ते रोममधील सर्वाधिक पगार घेणारे किंवा सर्वाधिक कमाई करणारे होते." "अनेक धोबी हे ऐशोरामात राहायचे. कामगारांना चांगला पगार द्यायचे. मूत्र त्यांच्यासाठी एवढं मौल्यवान असायचं की, त्याच्या खरेदीविक्रीवर कर लावला जात होता," असं ते लिहितात. रोमन नागरिक घरी अंघोळ करत नव्हते. तसंच ते कपडेही घरी धुवत नव्हते. त्यांचे कपडे धुण्यासाठी धोब्याकडं जायचे. प्राध्यापक जोशुआ यांच्या मते, इजिप्त आणि युनानमध्येही धोबींबाबतचे पुरावे आढळतात.
 
"धोबी सार्वजनिक शौचालयांतून शक्य तेवढं मूत्र गोळा करायचे. ते एका मोठ्या भांड्यात गोळा करायचे. त्यात कपडे भिजवायचे. काही लोकांना ते घासायला किंवा त्यावर चालत त्याला रगडायला सांगितलं जायचं. आजच्या आधुनिक वॉशिंग मशीनमध्ये ज्याप्रकारे कपडे धुतले जातात, तशाच प्रकारे प्रेशरचा वापर करून घाण आणि डाग हटवले जात होते," असंही त्यांनी लिहिलं आहे. "कपडे धुण्याची ही पद्धत बऱ्याच काळापासून चलनात होती. रोमन साम्राज्याचं पतन झाल्यानंतरही लोक याच पद्धतीनं कपड्यांची धुलाई करायचे. साबणानं मूत्राची जागा घेईपर्यंत ते सुरू होतं." सायमन व्हर्निज आणि सारा बेस्ट यांनी या विषयावर एक शोधनिबंध लिहिला आहे. त्यांनी मूत्र हे 'द्रवरुपी सोनं' असल्याचं म्हटलं. तसंच याचा वापर "चामडं नरम करण्यासाठी आणि कपडे तसंच लोकर रंगवण्यासाठी केला जात होता," असंही म्हटलं आहे. "1850 च्या दशकापर्यंत कपड्यांना रंग देणं आणि स्वच्छतेसाठी मूत्र हे अमोनियाचा मौल्यवान स्त्रोत होतं," असंही त्यांनी लिहिलं.
 
मूत्रावरील कर
रोमन सम्राट नीरो यांनी मूत्रावरील कर रद्द केला. पण त्यांचे उत्तराधिकारी वेस्पासियन यांनी पुन्हा कर आकारला.
इतिहास आणि पुरातत्व अभ्यास करणारे कर्ट रिडमॅन लिहितात की, लोकांनी याचा विरोध केला. त्यामुळं नीरो यांनी लवकरच मूत्र विक्रीवरील कर हटवला. सॅम्युअल मचॉक्स यांच्या मते, नीरो यांनी त्यांच्या धोरणांद्वारे संपूर्ण साम्राज्याला दिवाळखोरीत ढकललं. सिनेटनं नीरो हे लोकांचे शत्रू असल्याचं जाहीर केलं. त्यामुळं त्यांनी आत्महत्या केली आणि रोमध्ये गृहयुद्ध सुरू झालं. याच राजकीय अराजकतेमध्ये वेस्पासियनचा उदय झाला. ते लोकांचे सेवक होते आणि आर्थिक जबाबदारी आणि लष्करी मोहिमांसाठी प्रसिद्ध होते. वेस्पासियन जेव्हा सम्राट बनले तव्हा त्यांना शाही तिजोरी रिकामी असल्याचं समजलं.कर्ट रिडमॅन यांच्या मते, त्यांच्या शासनकाळाच्या एका दशकामध्ये ते रोमच्या आर्थिक व्यवस्थेत सुधारणा आणण्यात यशस्वी ठरले. कराद्वारे मिळणारा महसूल तिप्पट करण्याची गरज असल्यामुळं नीरो यांच्याप्रमाणं मूत्रकर रद्द केला नाही, असं वेस्पासियन म्हणाले होते.
 
जे लोक या कराच्या विरोधात होते, तेच मूत्राद्वारे कमाईही करत होते. या लोकांमध्ये चमडा कामगार, कापड कामगाल आणि धोब्याचे कामगार यांचा समावेश होता. त्यांनी सार्वजनिक शौचालयाचं नाव बदलून वेस्पासियन ठेवलं. वेस्पासियननंतरही सार्वजनिक शौचालयांला इटलीमध्ये 'वेस्पासियानो' आणि फ्रान्समध्ये 'वेस्पासियन' म्हटलं जात होतं.ईसवीसन 79 मध्ये वेस्पासियन यांचा मृत्यू झाला. त्यावेळी रोम हे समृद्ध राष्ट्र बनलं होतं. आजही त्यांचे 'पेकुनिया नॉन ओलेट' हे शब्द इटालियन भाषेत पैशाचं महत्त्वं वर्णन करण्यासाठी वापरले जातात. याचा अर्थ "पैशातून कधीच दुर्गंध येत नाही", असा होतो. त्यामागचा मतितार्थ म्हणजे पैसे कुठल्या माध्यमातून येतात, याला महत्त्वं नसतं, असा होतो.
 
Published By- Dhanashri Naik