सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (22:27 IST)

हवेचं इंजेक्शन देऊन नर्सने केली 4 रुग्णांची हत्या

टेक्सासमधील एका नर्सला चार रुग्णांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. हृदय शस्त्रक्रियेनंतर या नर्सनं रुग्णांना हवा भरलेलं इंजेक्शन दिल्यानं त्यांचा मृत्यू झाला होता.

सुनावणीदरम्यान 37 वर्षीय आरोपी विल्यम डेव्हिस या पुरुष नर्सला ज्युरीनं मंगळवारी हत्येप्रकरणी दोषी ठरवलं. या व्यक्तीला आता मृत्यूदंड ठोठावला जाण्याची शक्यता आहे.
 
जून 2017 ते जानेवारी 2018 या दरम्यानच्या कालखंडात विल्यम यांनी 7 जणांना लक्ष्य केलं होतं, असा आरोप वकिलांनी केला.
 
ज्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना ज्युरीच्या निर्णयामुळं काही दिलासा मिळेल अशी आशा क्रिस्टस मदर हॉस्पिटलनं व्यक्त केली. याचठिकाणी विल्यम्स यांनी या रुग्णाच्या हत्या केल्या होत्या.
 
या रुग्णालयात 47 ते 74 वयोगटातील पुरुषांचा झटका आल्यासारखी लक्षणं जाणवल्यानंतर मेंदूमध्ये इजा पोहोचल्यामुळं मृत्यू झाला होता. हवा भरलेलं इंजेक्शन त्यांच्या धमण्यांमध्ये दिल्यानं हे घडलं होतं.
 
डेव्हीस यांनी हत्या केलेल्या रुग्णांची प्रकृती शस्त्रक्रियेनंतर वेगानं सुधारत होती. मात्र, अचानक त्यांची प्रकृती एवढ्या वेगानं कशी खराब झाली, हे डॉक्टरांच्याही लक्षात आलं नाही, असं कोर्टाला सांगण्यात आलं.
 
मात्र, डॉक्टरांनी जेव्हा सीटी स्कॅनद्वारे तपासले तेव्हा रुग्णाच्या मेंदूमध्ये हवा आढळल्यानं यात काहीतरी गैरप्रकार असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
 
डल्लास येथील पल्मोनोलॉजिस्ट डॉ. विल्यम यारब्रोग यांनी, अनेक दशकांच्या वैद्यकीय सेवेत असा प्रकार पाहिला नसल्याचं ज्युरीला सांगितलं.
सुनावणी दरम्यान कोर्टामध्ये व्हीडिओ फुटेज दाखवण्यात आलं. त्यात आरोपी डेव्हीस रुग्णाच्या खोलीत जाताना दिसत आहे. त्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत त्या रुग्णाच्या हार्ट मॉनिटरचा अलार्म ऐकू आला. काही वेळानं या रुग्णाचा मृत्यू झाला.
 
डेव्हीस यांचे वकील फिलिप हेस यांनी त्यांच्या अशिलाच्या चुकीमुळं मृत्यू झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे नसल्याचं सुनावणीदरम्यान सांगितलं. रुग्णालयाच्या शस्त्रक्रियेतील गंभीर चुकांवर पांघरून घालण्यासाठी डेव्हीस यांना बळीचा बकरा बनवलं जात असल्याचं, त्यानी म्हटलं.
 
हॉस्पिटल ही जणू सिरियल किलरच्या लपण्यासाठी योग्य जागा असल्याचं, यातून दिसतं असं टेक्सासमधील स्मिथ कौंटीचे डिस्ट्रीक्ट अॅटर्नी (प्रमुख सरकारी वकील) जॅकब पटमन म्हणाले.
 
डेव्हीस यांना लोकांची हत्या करण्यात आनंद मिळतो, त्यामुळं त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी वकील ज्युरीकडे करत आहेत.
 
डेव्हीस हे 8.75 दशलक्ष डॉलरच्या बेल बाँडवर (जामीनावर) स्मिथ कौंटी येथील तुरुंगात कोठडीत राहतील.