1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

फेसबुकच्या फ्री बेसिक्स सुविधेला चाप

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने फेसबुकच्या मोफत इंटरनेट सेवेला झटका दिला आहे. ‘फ्री बेसिक्स’ लागू करण्यासाठी फेसबुकने रिलायन्सशी करार केला होता. मात्र ‘ट्राय’ने रिलायन्सला पत्र लिहून ‘फ्री बेसिक्स’ला व्यावसायिक रूप देण्यास नकार दिला. ट्रायच्या निर्णयाचा आदर करतो, असं रिलायन्सने म्हटलं आहे. तर मोफत इंटरनेट सेवा कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे. 
 
भारतात इंटरनेट पॅक महागल्यामुळे फेसबुक यूजर्सना ‘फ्री बेसिक्स’ ही सुविधा देऊ इच्छित आहे. मात्र ‘फ्री बेसिक्स’ हे नेट न्यूट्रॅलिटीच्या मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन करत असल्याचा आरोप होत आहे. एकाच कंपनीच्या हितासाठी ही सुविधा का, असा सवाल टीकाकारांनी केला आहे. दुसरीकडे 36 देशांत ‘फ्री बेसिक्स’ सुविधा असल्यामुळे जगभरातील दीड करोड लोक इंटरनेट वापरत असल्याचं फेसबुकने म्हटलं आहे. रिलायन्सने फेब्रुवारीपासून ‘फ्री बेसिक्स’ सुविधा देण्यास सुरुवात केली होती. नोव्हेंबरपर्यंत बहुतेक यूजर्स ही सुविधा वापरत होते. मात्र रिलायन्सवर अनेकांनी टीकाही केली होती. फेसबुकने ‘फ्री बेसिक्स’साठी एक मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत फेसबुक यूजर्सना ‘ट्राय’ला एक ई-मेल लिहिण्यास सांगितला जात आहे. त्याचं नोटिफिकेशन फेसबुक यूजर्सना आपोआप येतं. जो ई-मेल ट्रायला पाठवण्यास सांगणारं नोटिफिकेशन येतं, त्याचा मसुदाही तयार आहे. फक्त एक क्लिक करून फेसबुक यूजर्स ट्रायला मेल पाठवू शकतो. 
 
महत्त्वाचं म्हणजे फ्री बेसिक्सच्या मसुद्यात फेसबुकच्याच internet.org अभियानांतर्गत असलेल्या वादग्रस्त मुद्दे सांगितलेले नाहीत. त्यामुळेच सोशल मीडियावर याबाबत वाद-विवाद रंगले आहेत. फेसबुकने पहिल्यांदा ही सेवा internet.org च्या नावे सुरू केली होती. मात्र ‘नेट न्यूट्रॅलिटी’वरून बरेच दिवस वाद रंगला. मात्र त्यानंतर फेसबुकने Free Basics इंटरनेट नावाने पुन्हा लाँच केलं.