बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 27 मार्च 2024 (13:27 IST)

प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लढणार, मनोज जरांगेंच्या पाठिंब्यासाठी वंचितचं आवाहन

prakash ambedkar
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी अकोला येथे बुधवारी (27 मार्च) पत्रकार परिषद घेतली.
यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची भूमिका मांडली. महाविकास आघाडीसोबत वंचित राहणार की नाही, यावर मात्र आंबेडकर यांनी स्पष्ट वक्तव्य केलं नाही.पण घराणेशाही पोसण्यासाठी वंचितचा वापर झाल्याचं टीका आंबेडकर यांनी केली.यावरून त्यांनी मविआ सोबतच्या आघाडीची शक्यता मावळल्याचे संकेत दिले आहेत.
बुधवारी (27 मार्च) घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी वंचितची पहिली यादी जाहीर केली.

त्यामध्ये त्यांनी विदर्भातील आठ उमेदवारांची नावे जाहीर केली.तर रामटेकचा उमेदवार बुधवारी दुपारी चार वाजता घोषित केला जाणार आहे.याशिवाय नागपूर आणि कोल्हापूरच्या काँग्रेस उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीने आधीच पाठिंबा जाहीर केला आहे.गेल्या 70 वर्षांत ओबीसी समाजातील खासदाराचं संसदेतील प्रमाण फार कमी दिसून आलं आहे. म्हणून आम्ही त्यांना जास्तीत उमेदवारी देण्याची घोषणा आंबेडकर यांनी दिली.तसंच मुस्लीम, जैन आणि गरीब मराठा समजातील उमेदवारांनाही तिकीट दिलं जाईल असंही त्यांनी जाहीर केलं आहे.
 
वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी
भंडारा - गोंदिया : संजय गजानंद केवट
गडचिरोली-चिमूर : हितेश पांडुरंग मडवी
चंद्रपूर : राजेश वार्लुजी बेल्ले
बुलढाणा : वसंत राजाराम मगर
अकोल : प्रकाश आंबेडकर
अमरावती : प्राजक्ता तार्केश्वर पिल्लेवन
वर्धा : प्रा. राजेंद्र साळुंके
यवतमाळ - वाशिम : खेमसिंग प्रतापराव पवार

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
मुस्लीम आणि ओबीसी समाजाला उमेदवारी दिली जात नव्हती. त्यांना वंचित उमेदवारी देणार.
जैन समाजातील लोकांनाही उमेदवारी दिली जाणार.
गरीब समाजातील लोकांना जास्तीत उमेदवारी दिली जाणार.
मनोज जरांगे पाटील यांचा आम्हाला पाठिंबा मिळणार आहे. त्यांच्यासोबत आमची सामाजिक आघाडी असेल.
वंचितचा उपयोग परिवारवादाला पोसण्यासाठी केला जात होता.
शेतकऱ्यांसाठी MSPचा काय व्हावा, यासाठी वंचित प्रयत्न करणार.
शेतीआधारीत उद्योग वाढावा. जेणेकरून नोकऱ्या आणि ग्रामीण भागात उद्योजक तयार होतील.
महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागेचा फॉर्म्युला ठरत नसल्याने ते अजून एकत्र आले नसल्याचं सांगितलं जात आहे.
2019साली महाविकास आघाडी आणि वंचित एकत्र न आल्याने बऱ्याच ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेला मोठा फटका बसला होता.
वंचितच्या भूमिकेमुळे भाजपचे महाराष्ट्रात आठ ते नऊ अतिरिक्त खासदार निवडून आले, असं सांगितलं जातं.
यंदाही हे पक्ष एकत्र आले नाही तर तीच भीती व्यक्त केली जात आहे.
पण ज्याठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट,) शिवसेना (ठाकरे गट) पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत तिथे मात्र आंबेडकर यांनी अजून तरी वंचितचे उमेदवार जाहीर केले नाहीयेत.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेनंतर कांग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी वंचितच्या जागा वाटपावर प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांना पाच जागा देण्याची प्रस्ताव दिला होता देशात हुकुमशाही पद्धतीचे राज्य आहे. त्या विरोधात आपण एकत्र लढले पाहिजे. प्रकाश आंबेडकर यांचा उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय भाजपला अप्रत्यक्ष फायदा पोहोचवणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसोबत येण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा विचार करावा.
 
Published By- Priya Dixit