1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑक्टोबर 2019 (11:14 IST)

अफगाणिस्तानमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट, 62 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानात शुक्रवारी नमाजादरम्यान मशिदीत बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 62 जणांचा मृत्यू झाला.
 
स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, नांगरहार प्रांतातल्या मशिदीत शुक्रवारी नमाजादरम्यान बॉम्बस्फोट झाला. स्फोटामुळं मशिदीचं छप्पर कोसळलं. त्यामुळं अनेक लोक जखमी झाले.
 
संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार, जुलै ते सप्टेंबर दरम्यान किमान 1,174 नागरिकांचा मृत्यू झाला. जुलै 2019 महिना तर गेल्या दशकभरातील सर्वांत 'रक्तरंजित महिना' गणला गेला.
 
यंदा ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानात झालेल्या हिंसेमुळं प्रभावित झालेल्या लोकांचं बीबीसीनं सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणानुसार, हिंसेत मृत्यूमुखी पडणारी प्रत्येक पाचवी व्यक्ती सर्वसामान्य नागरिक आहे.
 
नांगरहार प्रांताच्या गव्हर्नरचे प्रवक्ते अताउल्लाह खोग्यानी यांनी बीबीसीला सांगितलं, बॉम्बस्फोटात 62 जणांचा मृत्यू झाला असून, 36 जण जखमी झाले आहेत. हे सर्वजण शुक्रवारच्या नमाजासाठी मशिदीत आले होते.
 
हस्का मिना जिल्ह्यातल्या मशिदीत हा बॉम्बस्फोट झाला. हा जिल्हा नांगरहारची राजधानी जलालाबादहून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे.
 
बॉम्बस्फोटाच्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मशिदीचं छप्पर कोसळण्याआधी मोठ्या स्फोटाचा आवाज आला.
 
अफगाणिस्तानातल्या टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, या घटनेत अनेक स्फोटकांचा वापर केला गेला होता.
 
स्थानिक पोलीस अधिकारी तेजाब खान यांनी सांगितलं की, "मी मौलवींचा आवाज ऐकत होतो, तेवढ्यात अचानक एक स्फोट झाला आणि त्यांचा आवाज थांबला."