शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Updated : शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 (09:27 IST)

देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्या यात्रा सुरू असताना विरोधकांचं काय सुरूय?

श्रीकांत बंगाळे
एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा मराठवाड्यात सुरू आहे. या यात्रांच्या माध्यमातून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. पण, या परिस्थितीत विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं काय सुरू आहे?
 
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची धांदल उडाली आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई नोंदवतात.
 
ते सांगतात, "काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्यात सरकार येणार नाही, असा विश्वास असल्यामुळे पक्षातील नेते पक्ष सोडून जात आहे. भाजप सत्तेत येणार हे सगळ्यांनीच इतकं गृहीत धरलं आहे की, लढाई येण्याअगोदरच विरोधी पक्षानं शस्त्रं खाली ठेवलीयेत, असं दिसतं."
 
"खरं तर विरोधी पक्षानं आता फडणवीस सरकारनं काय केलं काय नाही, हे ठसठशीतपणे जनतेसमोर घेऊन जायला हवं. आघाडी सरकारच्या काळात सिंचन घोटाळा तत्कालीन विरोधी पक्ष भाजपनं निवडणूक प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला होता, पण या सरकारचं असं एखादं अपयश राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं जनतेसमोर आणलं नाही.
 
"याशिवाय फडणवीस सरकारनं काय केलं नाही, जे आम्ही करून दाखवू, असंही विरोधकांनी सांगितलं नाही. मुख्यमंत्री जसं आकडेवारी देऊन स्वत:चं मत मांडतात, तसं प्रभावीपणे विरोधी पक्षात कुणी करताना दिसत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सध्या पूर्ण धांदल उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं यात्रा काढायचा निर्णय घेतला आहे. पण, पक्षातील नेते पक्ष सोडून जात असल्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर प्रश्न निर्माण झाला आहे," असं देसाई पुढे सांगतात.
 
उशिराचं शहाणपण?
काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक अनुभवी नेते बाहेर पडत असल्यामुळे या पक्षांवर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न निर्माण झाल्याचं राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर सांगतात.
 
त्यांच्या मते, "लोकसभेच्या निकालानंतर राज्यातील विरोधी पक्ष आटोपशीर झाला आहे. केंद्रात मोदींना स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राज्यातही देवेंद्र फडणवीस यांना मतं मिळतील, असं चित्रं निर्माण झालं आहे. विरोधी पक्षातले नेते ज्यांना वर्षानुवर्षं पक्षानं उर्जा दिली, तेच आज पक्षातून बाहेर पडत आहेत. घरचेच नेते बाहेर पडत आहेत, म्हटल्यावर पक्षावर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे."
 
त्या पुढे सांगतात, "आता उशीरा का होईना राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली यात्रा काढायचा निर्णय घेतला आहे. उदयनराजे भोसले आणि अमोल कोल्हे यांना या यात्रेसाठी प्रमुख म्हणून नेमण्यात आलं आहे. सरकारला प्रत्युत्तर म्हणून प्रमुख नेते सोडून या दोघांवर पक्षानं ही जबाबदारी सोपावली आहे, यावरून पक्षातल्या प्रमुख नेत्यांवर जनतेचा विश्वास कमी झाला आहे का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे."
 
'आम्ही सरकारचं अपयश सांगितलं, पण...'
भाजप-शिवसेनेनं यात्रेच्या माध्यमातून प्रचार सुरू केला आहे, राष्ट्रवादीची काय करत आहे, यावर पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक सांगतात, "भाजप-शिवसेनेनं त्यांचा प्रचार सुरू केला आहे, ते त्यांच्या पद्धतीनं प्रचार करत आहेत. आम्ही आमच्या पद्धतीनं प्रचार करू. सध्या राज्यात पाऊस पडत आहे. पाऊस ओसरला की, प्रचार सुरू करू."
 
"राज्य सरकारमधल्या दोन डझन नेत्यांनी केलेला भ्रष्टाचार आम्ही समोर आणला, पण मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना क्लीन चीट दिली आहे. असं असलं तरी प्रचार सुरू झाल्यानंतर या सरकारच्या अपयशाची यादी आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत," मलिक यांनी पुढे सांगितलं.
 
पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांबद्दल मलिक सांगतात, "जे नेते पक्ष सोडून जात आहेत, त्यांच्या जागी आम्ही पर्याय निर्माण करू आणि आमचं काम सुरू ठेवू."
 
काँग्रेसचा युवकांसाठीचा जाहीरनामा तयार
"राज्यात दुष्काळ पडला आहे, 10 लाख कामगारांना नोकरी गमवावी लागली आहे, अशी परिस्थिती असताना मुख्यमंत्री यात्रा काढत आहेत. चुकीच्या वेळी त्यांनी ही यात्रा काढली आहे. राज्य अडचणीत असताना ते यात्रेवर निघाले आहेत," असं मत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केलं.
 
पक्षाच्या प्रचाराच्या रणनीतीविषयी त्यांनी सांगितलं की, "आजच आम्ही युवक काँग्रेसच्या वतीनं युवकांचा जाहीरनामा जाहीर करण्यासाठी एका कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. 'वेक अप महाराष्ट्र- उद्यासाठी आत्ता', असं या कार्यक्रमाचं नाव आहे. युवकांना स्वत:चं भविष्य घडवण्यासाठी आणि भारताचं भविष्य घडवण्यासाठी आता जागं होणं गरजेचं आहे, असं आम्ही सांगत आहोत."
 
"जे लोक पक्ष सोडून जात आहेत, त्यांच्या या कृतीबद्दल मला आनंद वाटतो. कारण जुने गेल्याशिवाय नवीन लोकांना संधी मिळणार नाही. तरूण राजकारण्यांच्या दृष्टीनं ही चांगली बाब असेल, तर जुन्यांना पक्ष सोडून जाऊ द्या, काही हरकत नाही," तांबे पुढे सांगतात.
 
"राज्यात पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचंच सरकार सत्तेवर येणार आहे. भाजप आणि सेनेच्या कारभाराला जनता कंटाळली आहे, जनता या सरकारला पायउतार करणार आहे," असंही त्यांनी म्हटलं.