शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: सोमवार, 14 जून 2021 (22:06 IST)

मराठा आरक्षण: अजित पवार - शाहू महाराज छत्रपती यांच्या भेटीचा अर्थ काय?

स्वाती पाटील
"मराठा समाज स्वतः सक्षम झाला पाहिजे, मराठा समाज स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे हे सगळ्यांत महत्त्वाचं आहे," असं वक्तव्य शाहू महाराज छत्रपती यांनी अजित पवार भेटीनंतर केले.
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक होताना दिसत आहे. त्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती येत्या 16 जूनपासून मूक आंदोलन करणार आहेत. याची सुरुवात कोल्हापुरातून होणार आहे.
 
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहू महाराज छत्रपती यांची 'न्यू पॅलेस' इथं भेट घेतली आणि नव्या चर्चांना उधाण आले.
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज (14 जून) कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नवा राजवाडा इथं शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. ही भेट नियोजित नसल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, एकीकडे मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शाहू महाराजांची भेट घेतल्यानं अनेक तर्क-वितर्क लढवले जातायेत.
या भेटीनंतर शाहू महाराजांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, "मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. राज्य सरकारच्या हातात असलेल्या गोष्टी वर लक्ष देऊन त्या पूर्ण करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे."
 
"राज्य सरकारकडून समाजाच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात यावर पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्य सरकारने त्यांच्या अखत्यारितील सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ सक्षम करावे, निधी द्यावा. या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे," असं शाहू महाराजांनी सांगितलं.
 
शाहू महाराज पुढे असंही म्हणाले की, "मराठा आरक्षण बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास व्हायला हवा. तो निकाल सर्वांनी समजून घेतला पाहिजे. याबाबत केंद्र सरकारने लक्ष दिले तर आणि त्यांना या विषयात तेवढा रस असेल तर घटनात्मक बदल करून पुढचं पाऊल टाकायला हवं."
 
येत्या 16 जून पासून खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणाबाबत मूक आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. याबाबत विचारलं असता आंदोलनाबाबत चर्चा झाली नसल्याचे शाहू महाराज यांनी सांगितले.
"सुप्रीम कोर्ट निकालाचा अभ्यास करायला हवा. तो निकाल समजून घेतला पाहिजे. केंद्र शासनाने लक्ष दिलं तर आणि त्यांना या विषयात रस असला तर घटनात्मक बदल करून घेण्याकडे लक्ष द्यायला हवं. राज्य सरकार याबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे शक्य असेल ते केले पाहिजे. जे करता येईल ते करायला पाहिजे. संभाजीराजे यांच्या आंदोलनावर चर्चा नाही," असं शाहू महाराज म्हणाले.
 
या भेटीचा अर्थ शोधण्याचा बीबीसी मराठीनं प्रयत्न केला. यासाठी आम्ही राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकारांशी बातचीत केली.
 
"सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकारची कोंडी झालेली आहे, शाहू महाराज आणि अजित पवार यांची आजची भेट ही कोंडी फोडण्याचा दृष्टीनं एक प्रयत्न आहे," असं सकाळचे संपादक श्रीराम पवार यांना वाटतं.
 
ते पुढे म्हणाले, "मराठा आरक्षणाबाबत कोणीतरी बोलाव जे सरकारच्या पथ्यावर पडेल याची सरकार वाट पहात असेल अशी परिस्थिती आहे. आरक्षण हा लगेच सुटणारा प्रश्न नाही, असे संकेत आहे ज्याचा संबंध केंद्र सरकारशी आहे. त्यामुळे शाहू महाराज आणि अजित पवार भेट सरकार साठी दिलासादायक आहे."
 
"शाहू महाराज यांच्याबद्दल समाजात आदर आहे. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेलं मत महत्त्वाचे असून त्याचा फायदा राज्य सरकारला होऊ शकतो," असं सांगतानाच श्रीराम पवार म्हणतात, "शाहू महाराजांच्या वक्तव्यामुळे आरक्षणाव्यतिरिक्त समाजाचे इतर महत्त्वाचे प्रश्न समोर येत आहेत."
 
"आरक्षण लगेच मिळण्याची शक्यता नाही हे सगळ्यांच्या लक्षात येईल. नवा आयोग नेमून आकडेवारी गोळा करणं आरक्षणाला कायद्याच्या चौकटीत बसवणं याला वेळ लागू शकतो तो वर समाजाच्या इतर मागण्यांवर चर्चा सुरू होईल हा सर्वांत मोठा फायदा होईल," असं श्रीराम पवार यांना वाटतं.
"सारथी संस्थेला निधी, निवड होऊनही नियुक्त्या न मिळणं, अण्णासाहेब पाटील महामंडळ निधीची मर्यादा वाढवणे, यासारख्या मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्या तर त्याचा फायदा समाजाला त्वरित मिळू शकतो," असं श्रीराम पवार म्हणतात.
 
"या सर्व गोष्टी समाज आणि सरकार या दोन्हींच्या दृष्टीने सकारात्मक आहेत त्यामुळे आरक्षणाची मागणी कायम ठेवून साचलेले प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने चर्चा होणं हे राज्य सरकार आणि मराठा समाज दोन्हींच्या दृष्टीने सकारात्मक आहे. ते पुढे असं ही सांगतात की, यासोबतच सरकारला आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की या मागण्यांबाबत केंद्र सरकारकडे बोट दाखवता येणार नाही," असंही श्रीराम पवारांना वाटतं.
 
"मराठा आरक्षण मुद्द्यावर संभाजीराजे मोर्चा, आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यांची भूमिका ही राज्य सरकारच्या विरोधात असल्याचं चित्र आहे. अशा वेळी शाहू महाराज आणि अजित पवार यांची भेट होणं हा संभाजीराजेंना शह आहे," असं राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांना वाटतं.
 
त्याचं कारण सांगताना विजय चोरमारे म्हणाले, "संभाजीराजे यांची आजवरची वैचारिक भूमिका ही भाजपसाठी सोयीचं राजकारण करण्याची ठरली आहे. फुले-शाहू-आंबेडकर भूमिकेशी संभाजीराजे ठाम वाटत नाही. याउलट शाहू महाराज यांनी सुरुवातीच्या काळात शिवसेनेशी केलेली जवळीक वगळता, त्यानंतर त्यांची राजकीय भूमिका ही तटस्थ राहिली आहे."
 
मात्र, "शाहू महाराजांनी कायम पुरोगामी विचारांची भूमिका मांडली आहे. शाहू महाराज ठाम भूमिका घेतात त्यामुळे या परिस्थितीत सरकारसाठी ही भेट सकारात्मक आहे," असं चोरमारे यांना वाटतं.
 
"मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या प्रयत्नांची माहिती शाहू महाराजांना देणे हे येत्या काळात महत्त्वाचं ठरू शकतं. येणाऱ्या काळात मराठा आरक्षणाच्या निर्णायक लढाईत शाहू महाराजांच्या मताला मोठं महत्त्व असू शकतं. त्यामुळे शाहू महाराज आणि अजित पवार यांची भेट ही संभाजीराजे यांच्या भूमिकेला छेद देण्याचा भाग असू शकतो," असं चोरमारे यांना वाटतं.