शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 21 सप्टेंबर 2017 (17:50 IST)

‘कलाकार’ आपल्या पोटा ऐवजी आपल्या 'कलात्मक' चेतनेच्या प्रकाशाने प्रदीप्त असतात!

प्रत्येक प्राण्याला ब्रम्हांडात जगण्यासाठी 'भोजनाची' आवश्यकता असते मग ती माती असो, पाणी असो,  वनस्पती, मांस वा अन्य धातू ज्याने शरीर निरोगी राहील, पोट भरेल आणि प्राणी जीवन्त राहील. प्रकृतीने सर्व प्राणिमात्रांसाठी मुबलक प्रमाणात संसाधने उपलब्ध करून दिली आहेत. मनुष्य सोडून सर्व प्राणी आपले भरण-पोषण प्रकृती अनुसार करतात किंवा मनुष्याद्वारे स्थापित व्यवस्थे अनुसार करतात. हो, मनुष्याच्या जीवन व्यवहारासाठी अर्थार्जनाची आवश्यकता असते. मनुष्य सभ्य आहे, ‘व्यवस्थेने’ सभ्यतेचा निर्माण करून सत्ता कायम केली. प्रत्येक व्यवस्थेतील जीवन शैलीची सूत्र वेगवेगळी आहेत किंवा आपण असं म्हणू शकतो की, सरकारने कायदे व्यवस्था बनवून प्रत्येक वेळी 'रोजगार' या शब्दाच्या सप्तरंगी छत्री खाली मोहाचे जाळे पसरवले आहे.

प्रत्येक व्यवस्था आणि सत्तेचे हे प्रशासकीय हातखंड आणि सूत्रं आहेत.  जसजसा मनुष्य ‘सभ्य’ होत चालला आहे,तसतसा इतर प्राण्यांच्या तुलनेत त्याच्या पोटाचा घेर वाढत चालला आहे. जो जितका मोठा, जितका विकसित, जितका आधुनिक ,जितका हुकूमशाहा तेवढे त्याचे पोट वाढत जाते. जगातील सर्वात पुरातन लोकशाही अमेरिके पासून जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतापर्यंत!

याचे कारण पोटाचा आकार नव्हे तर गरजे ऐवजी 'भ्रष्टाचाराला' "विकास" समजण्याचा 'भ्रम'आहे. वैज्ञानिक युग, विज्ञान पद्धती आणि विज्ञानातून निर्माण झालेल्या तंत्रज्ञानाचा व्यवसाय आणि व्यापार, नफेखोरी, खरेदी-विक्री च्या वर्चस्ववादी युगातील ही अवधारणा आहे.

संपूर्ण पृथ्वी ही निसर्गाची आहे हे विकसित मानवाला स्वीकार्य नाही. संपूर्ण पृथ्वी ही त्याचीच आहे हाच विकसित मानवाचा मंत्र आहे, म्हणूनच गरजांना अनिवार्य लोभाचे रूप देऊन चोवीस तास हजारो चॅनल विश्वभरात नफ्यासाठी संपूर्ण विश्वातील संसाधनांना लूटत आहेत.

अशा वेळेस काही जण ऐश करत आहेत आणि उर्वरित काहीजण प्रत्येक क्षणाला त्यांचे पोट भरण्यासाठी दारोदार फिरत आहेत.... तरीही मनुष्य स्वतःला मोठ्या स्वाभिमानाने सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणवून घेतो आणि प्रकृती त्याच्यावर हसते, असो....

आदम काळापासून आजच्या 'वैज्ञानिक सभ्यते' च्या काळापर्यंत , मनुष्याला जीवन जगण्यासाठी शारीरिक शक्तीचा उपयोग करावा लागतो. उत्क्रांती काळात पायी चालणे, चाक आणि पंख या प्रत्येक शोध काळात मानवी शरीराच्या शारीरिक श्रमाची आर्थिक कमाईमध्ये फार महत्वाची भूमिका आहे. आदम काळात "शारीरिक बळ" सर्वश्रेष्ठ होते . ज्याची जेवढी ताकद, त्याची तेवढी संपत्ती. बुद्धिमत्तेच्या विकासाने "शारीरिक बळाला" अर्थ निर्मितीच्या सर्वात खालच्या पायरीवर फेकले. 

आज जो मनुष्य केवळ शारीरिक श्रमावर आपली उपजीविका चालवतोय, तो या सभ्य आणि सुशिक्षित समाजाच्या वेशी बाहेर गेला आहे, जे शारीरिक श्रमासोबत थोड्या कौशल्याचा वापर करतात त्यांची परिस्थिती आणखी चांगली...जे केवळ लैंगिक व्यवहाराचा उपयोग करतात त्यांची अवस्था चांगली आणि खराब दोन्ही... आणि जे बुद्धीचा उपयोग करतात ते समाजातील वरच्या स्तरावर गणले जातात. म्हणजेच मनुष्याच्या या प्रवासात अर्थ उपार्जनाचे चार स्तर आहेत. 1. शारीरिक श्रम आणि कौशल्य 2. भाव अभिव्यक्ती आणि कौशल्य 3. लैंगिक व्यवहार 4. चेतना, बुद्धी आणि विचार! 

कला आणि कलाकाराची अर्थ निर्मिती कशी असावी? कला "चेतना" आहे, विद्रोही आहे,मानवाला माणूस म्हणून घडवण्याचं आणि माणूसपण टिकवण्याचं माध्यम आहे. या विश्वात अशा अनेक व्यवस्था आहेत ज्या कलेचा आणि कलाकाराचा आपल्या दरबारात आपल्या सत्तेच्या प्रसार- प्रचारासाठी उपयोग करतात, आजही अनेक ठिकाणी हे होताना दिसते, ही व्यवस्था या कलाकारांना भोग आणि विलासाचे सर्व संसाधन उपलब्ध करून देते.

आजच्या काळात ग्रांट, अनुदान हे यासाठी अत्यंत उपयुक्त शब्द आहेत. खरे पाहता, "कला आणि कलाकार" विद्रोही असतात म्हणूनच सत्तेशी त्यांचा संघर्ष असतो, जन संपर्कातील कार्यकर्ते असल्या कारणाने, असे कलाकार, लोकांमध्ये राहून लोकांप्रमाणे आपली उपजीविका चालवतात आणि दडपशाही सत्तेच्या विविध यातना सहन करतात, मग त्या सरकारी असो वा सामाजिक!

भौतिक विकास, हाव, सत्ता आणि प्रसिद्धीच्या चकचकाटाने कलाकारांना संभ्रमित केले आहे. सत्तेने एका सुनियोजित षडयंत्राखाली 'कलेला' "पोट भरण्याचं एक साधन" इतकंच मर्यादित केलं आहे आणि कलाकारांना पोट भरणारी गर्दी. सत्तेने हे यासाठी केलं आहे, जेणेकरून सत्ता जनतेचं शोषण करत राहील आणि त्यांना प्रश्न विचारणारे कलाकार, जनतेला जागरूक करणारे कलाकार, कलेला "चेतनेचे" सर्वतोपरीने माध्यम मानणारे कलाकार निर्माणच होऊ नये... 

असे करून सत्ता आपल्या विरुद्ध होणाऱ्या विद्रोहाला दाबते. कला आणि कलाकारांच्या अशा गर्दीचा निर्माण करते जे सत्तेच्या तुकड्यांवर जगतील! ही सत्ता अशा समाजाचा निर्माण करते, जिथे कला आणि कलाकाराला केवळ नाचण्या गाणाऱ्या तुच्छ तुकड्यांच्या रुपात पाहिलं जातं किंवा उपभोग्यांच्या "भोग्यात्मक" स्वरूपात पाहिलं जातं. 
आणि अशात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे शिक्षित असूनही अशिक्षित असा प्रसिद्धी-पिपासू 'मध्यम वर्ग' जो कोणत्याही किंमतीवर प्रत्येक प्रकारचं सुख उपभोगू इच्छितोय. आजच्या शोषणवादी व्यवस्थेचा 'वाहक' आहे हा "मध्यम वर्ग". लोभाने पछाडलेला हा मध्यम वर्ग, अर्धवट विचार, अर्धवट ज्ञान, अर्धवट जीवन आणि स्वप्न मात्र जग काबीज करण्याचे! या रंगीत स्वप्नांच्या पूर्ततेसाठी 'विकास' या अभिशापग्रस्त महानगरांचा रहिवासी आहे हा'मध्यम वर्ग'!

या महानगरांमध्ये आपल्या स्वप्नांना कमावण्यासाठी प्रत्येक क्षणी गर्दीत विशेष होण्याच्या अभिनयाच्या धडपडीत तरबेज झालाय हा मध्यम वर्ग. प्रत्येक प्रकारच्या कृत्रिम बाजाराचा ग्राहक आहे हा मध्यम वर्ग. प्रत्येक प्रकारची ठोकर सहन करण्यात तरबेज आहे हा मध्यम वर्ग. "सबका साथ सबका विकास' चा भक्त आहे हा मध्यम वर्ग. पण खिन्नता हीच की हा मध्यम वर्ग, "थोडा है, थोडे की जरूरत है" च्या चक्रव्यूहाला तोडू शकत नाही आणि आपल्याच दिखावटी स्वप्नांच्या जाळ्यात फसून सोसत राहतो आणि विकासाचे भजन गात राहतो. या शोषण चक्रापासून या मध्यम वर्गाला मुक्ती देतो आणि देऊ शकतो तो आहे"कलाकार"! मात्र हा मध्यम वर्ग पुंजीवादी व्यवस्थेच्या षडयंत्र सूत्रानुसार "केवळ मनोरंजनासाठी कला" असणाऱ्या कलेचा भक्त आहे. या भक्तीभावानुरूप तो एका अशा कलाकारांच्या समूहाला प्रोत्साहित करतो जो कलेच्या भोगवादी पक्षाच्या प्रसार प्रचारात तरबेज असेल. अशा कलाकारांना हा मध्यम वर्ग आपल्या एस एम एस द्वारे चुटकीसरशी सुपरस्टार बनवतो आणि प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन बसवतो. मात्र कलेच्या चेतनात्मक पक्षाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे हा 'मध्यम वर्ग'!

विकासाच्या महानगरीय 'विनाशी' बेटांवर "मनोरंजनासाठी कला " मानणाऱ्या कलाकारांची गर्दी आहे. जी मध्यमवर्गाच्या इशाऱ्यावर नाचते आणि 'मध्यमवर्गा' प्रमाणे कुठेच पोहचत नाही. बस स्वतःच्या भ्रमजाळात फिरत राहते आणि शोषणवादी सत्तेचा राजपाट ह्याच मध्यमवर्गाच्या भ्रांतीय चाकावर उभा आहे आणि चालतो आहे.

कलाकाराचे ध्येय केवळ पोट भरणे नाही. याचा अर्थ असा नाही की कलाकाराला जीवनाच्या मूलभूत गरजांची आवश्यकता नाही. जो कलावंत आहे त्याला जीवन जगण्याची कला देखील येते आणि जो रोजगाराच्या गर्दीत गुंतलेला आहे त्याची गोष्टच निराळी!

कलाकाराला कलेचा उद्देश्य समजणे गरजेचे आहे, विकासाच्या नावावर 'विनाशाच्या' षडयंत्राला समजून घेणे गरजेचे आहे. सत्तेचे षडयंत्र समजून घेण्याची गरज आहे ,सत्तेच्या अनुदानीत तुकड्यां पलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. समाजातील 'चेतनेच्या' जडत्वाला तोडण्याची आवश्यकता आहे.

कलाकारांमध्ये  केवळ नाचण्या-गाण्या पुरते कौशल्य मर्यादित नसून कलाकार हा जनकार्यकारी व्यक्तित्व असतो. जो प्रत्येक क्षणी ' मध्यमवर्ग आणि सत्तेच्या ' शोषणवादी चक्रव्यूहाला आपल्या कलेने भेदतो ! कारण कलाच मानवाला "मानव" बनवते.

आज कलाकारांना ठरवणे आवश्यक आहे कि, अर्थ निर्मितीत ते स्वतःला कोणत्या श्रेणीत पाहू इच्छितात .
1. शारीरिक श्रम आणि कौशल्य 2. भाव अभिव्यक्ती आणि कौशल्य 3. लैंगिक व्यवहार 4.चेतना, बुद्धी आणि विचार!

मानवता आणि माणुसकीच्या बचावासाठी कलेतील चेतनेच्या विवेकशील प्रतिबद्ध स्वरुपाचा स्वीकार करूया.कलेच्या मानवाला मानवीय बनवणाऱ्या ह्या कलात्मक प्रक्रियेचा अवलंब करूया. सत्तेच्या अनुदानित चाकरीला नाकारुया आणि रोजगारांच्या गर्दीतून स्वत: ला मुक्त करूया.

कारण कलाकार आपल्या पोटाऐवजी आपल्या कलात्मक चेतनेच्या प्रकाशाने प्रदीप्त असतात ! कलामेव जयते! 
-मंजुल भारद्वाज (रंग चिन्तक)