मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

'प्रभो शिवाजी राजा' या अॅनिमेशनपटातून दिसणार महाराजांचे शिवचरित्र

महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसांच्या नसानसात भिनलेले स्वराज्य प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज यांचा अजरामर इतिहास प्रत्येकाचा उर दडपून टाकतो. महाराजांचे चरित्रपर ग्रंथ आणि पोवाड्यातून त्यांचे पराक्रम आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. मात्र,आजच्या तरुण आणि भावी पिढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराजांना अॅनिमेशन स्वरुपात मोठ्या पडद्यावर आणण्याचा अनोखा उपक्रम 'प्रभो शिवाजी राजा' या अॅनिमेशनपटाद्वारे प्रथमच केला जात आहे. गणराज असोसिएट्स प्रस्तूत तसेच इन्फिनिटी व्हीज्युअल आणि मेफॅक निर्मित हा अॅनिमेशनपट निलेश मुळे यांनी दिग्दर्शित केला आहे. शिवाजी महाराजांचा कालखंड मांडणाऱ्या या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे, मराठीतील दिग्गज कलाकारांची नावे यात जोडली गेली आहेत. समीर मुळे लिखित या अॅनिमेशनपटासाठी  ख्यातनाम इतिहासकार निनाद बेडेकर यांनी संवाद आणि पटकथेचे सहाय्यक लेखन केले आहे. तसेच ज्येष्ठ इतिहासकारांची निरीक्षणे वापरून या सिनेमाची कथा सादर करण्यात आली आहे. ख्यातनाम चित्रकार सदाशिव भाऊ साठे यांच्या कुंचल्यातून या सिनेमातील पात्र रेखाटली गेली आहेत. शिवाय शंकर महादेवन, स्वप्नील बांदोडकर, श्रीरंग भावे, नंदेश उमप आणि उदेश उमप या गायकांची गाणीदेखील या चित्रपटात आकर्षणाचा विषय ठरणार आहेत. या सिनेमातली सर्व गाणी प्रकाश राणे यांनी लिहिली असून, भारत बलवल्ली यांचे संगीत त्याला लाभले आहे. सचीन खेडेकर आणि सुदेश भोसले यांच्या भारदस्त आवाजाचे निवेदन यात असून, शिवाजी महाराजांना अभिनेता उमेश कामत आणि धर्मेंद्र गोहिल यांनी आवाज दिला आहे. 
प्रभो शिवाजी राजे' हा १०० मिनिटाचा अॅनिमेशनपट असून, शिवकालीन कालखंड यात दाखवला जाणार आहे. तसेच या सिनेमाद्वारे, ३५० वर्षाहून अधिक वर्षे मोगल राजवटीत हालअपेष्टा सोसत असलेल्या आपल्या मातृभूमीसाठी 'स्वराज्य' ची आरोळी ठोकणा-या या लढवय्या महापुरुषाला अनोखी मानवंदनादेखील दिली जाणार आहे. दीपक विरकुड आणि विलास रानडे यांनी या सिनेमाचे संकलन केले असून, आगामी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १२ जानेवारील प्रदर्शित होत असलेला हा सिनेमा लवकरच हिंदी आणि इंग्रजी भाषेतही प्रदर्शित होणार आहे.