सोमवार, 9 सप्टेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 26 सप्टेंबर 2014 (15:12 IST)

बानूला मिळाला मोठा ब्रेक

‘मंगलाष्टक वन्स मोअर’, ‘हॅलो नंदन’, ‘वी आर ऑन आता होऊन जाऊ द्या’ या मराठी सिनेमांमध्ये झळकलेली आणि आता ‘जय मल्हार’ मालिकेमध्ये बानूच्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे इशा केसकर. आता इशाला तिच्या करिअरमधील मोठी संधी मिळाली आहे. आगामी ‘सीआरडी’ या हिंदी सिनेमात इशा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. आजची तरुणाई, त्यांचं जग यावर भाष्य करणार्‍या या सिनेमात इशाने आजच्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करणारी भूमिका साकारली आहे. मराठी दिग्दर्शिका क्रांती कानडे यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमासाठी ऑस्कर पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर डॅनिअल केत्झ यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून हॉलिवूडच्या आणखीही काही तंत्रज्ञांनी यासाठी काम केले आहे. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातसुद्धा हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचे समजते. महाविद्यालयीन काळापासून इशा कॉलेजांच्या एकांकिका स्पर्धामध्ये सहभागी होत होती. त्यानंतर पुण्यात अनेक प्रायोगिक नाटकांमधून तिने काम केले. नाटक, मराठी सिनेमा आणि मालिकेनंतर इशा आता हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणार आहे. या भूमिकेसाठी रीतसर ऑडिशन दिल्यानंतर तिची निवड झाली. पुढील वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.