शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017 (10:43 IST)

अलविदा करण्याचा निर्णय स्वत:चाच – नेहरा

मी क्रिकेट खेळण्याची सुरुवात निवड समितीची परवानगी घेऊन केली नव्हती आणि निवृत्त होण्यासाठीही मला त्यांच्या परवानगीची गरज नाही, अशा तिखट शब्दांत आशिष नेहराने राष्ट्रीय निवड समितीवर टीका केली आहे. क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय माझा स्वत:चाच होता, असे स्पष्ट करून नेहरा म्हणाला की, सुमारे 18 वर्षे देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूला किमान सन्मानजनक वागणूक मिळाली पाहिजे इतकीच त्याची अपेक्षा असते.
 
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वीच पहिल्या टी-20 सामन्यानंतर आपण निवृत्त होणार असल्याची घोषणा नेहराने केली होती. परंतु त्याच दरम्यान निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिलेल्या एका मुलाखतीत वादग्रस्त विधाने केली होती. आम्ही न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यापर्यंतच नेहराची अपेक्षा करीत आहोत, त्यानंतर नाही, असे सांगून प्रसाद म्हणाले होते की, नेहरालाही ही गोष्ट कळविण्यात आली आहे.
 
प्रसाद यांच्या विधानाबद्दल विचारले असता नेहरा म्हणाला की, मी त्यांचे विधान ऐकले आहे. परंतु माझ्यापर्यंत त्यातले काहीच पोहोचलेले नाही. प्रसाद यांनी माझ्याशी या बाबतीत कधीच संपर्क साधला नाही. मी इतकेच सांगू शकतो की, मी संघव्यवस्थापनाशी संवाद साधला होता. कोहली आणि रवी शास्त्री यांच्याशी मी चर्चा केली होती. रांचीला पोहोचल्यावर मी विराटशी बोललो, तेव्हा त्याने एकच प्रश्‍न विचारला, तुझा निर्णय निश्‍चित आहे ना? तू अद्यापही आयपीएल खेळू शकशील. तसेच खेळाडू व प्रशिक्षक अशी दुहेरी भूमिका बजावू शकशील. पण मी त्याला नकार दिला आणि माझी निवृत्ती क्रिकेटमधील सर्व भूमिकांमधून असल्याचे स्पष्ट केले.
 
आपण कधीही “बेनिफिट मॅच’ची मागणी केली नव्हती, असे सांगून नेहरा म्हणाला की, माझ्या सुदैवाने अखेरचा सामना नवी दिल्लीत माझ्या घरच्या मैदानावर आणि प्रेक्षकांसमोरच झाला. भुवनेश्‍वर कुमार आणि जसप्रीत बुमराह या युवा गोलंदाजांनी केलेली प्रगती आणि त्यांची कामगिरी पाहिल्यावर भारतीय गोलंदाजीचे भवितव्य त्यांच्या हातात सुरक्षित असल्याचे दिसून आल्यावरच आपण निवृत्तीचा निर्णय घेतला.