शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By सौ. भाग्यश्री कुलकर्णी|

स्वरभास्कराला भारतरत्नाचं कोंदण

कर्नाटकातल्या गदग नावाच्या एका लहानशा गावात जन्मलेल्या भीमसेननांना लहानपणापासूनच गाण्याचा पहिला धडा मिळाला तो त्यांच्या मातोश्रीकडून.      
पंडित कुमार गंधर्व म्हणजे भारतीय संगीतातलं एक मोठं नाव तीर्थक्षेत्रच म्हणाना! फक्त शास्त्रीय संगीतच नव्हे तर अभंगासारख्या साध्या सोप्या वाटणार्‍या संगीतालाही तितक्याच तन्मयतेने सादर करणारे हे स्वररत्न त्यांना भारतरत्न जाहीर झाला, हा त्या व्यक्तीबरोबरच ह्या संगीत क्षेत्राचाही बहुमूल्य सन्मान आहे.

पंडितजींना वयाच्या 86 व्या वर्षी हा पुरस्कार जाहीर झाला.आणि इतक्या वर्षाची स्वरआराधना करून तेज:पुंज झालेल्या त्यांच्या आवाजाच्या हिर्‍याला जणू सोन्याच कोंदण लाभलं अन स्वरांचाही सन्मान झाला. ह्या पुरस्कारामागे त्यांची संगीत साधना तर आहेत पण त्याही पेक्षा त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट धडपड ह्या सर्वांच आज चीज झालंय.

कर्नाटकातल्या गदग नावाच्या एका लहानशा गावात जन्मलेल्या भीमसेननांना लहानपणापासूनच गाण्याचा पहिला धडा मिळाला तो त्यांच्या मातोश्रीकडून. कारण प्रत्येक आई आपल्या मुलासाठी म्हणते ती अंगाई पहिल्यांदा त्याच्यासाठी कान तयार करण्याचेच काम करते. सात-आठ वर्षाच्या वयातच त्यांनी सर्वप्रथम मैफिलीत सवाई गंधर्वांना आपल्या वडिलांसमवेत ऐकलं. अन ते गाणं ऐकता ऐकता पंडितजी त्यात इतके गुंतून गेले की आता गाण्याशिवाय त्यांचे कशातही मन लागेना त्या गाण्यापायी त्यांनी घर सोडलं.

कानडीशिवाय दुसरी कोणतंही भाषा न येणारा हा छोटासा पोर संगीताच्या प्रांतात म्हणजे उत्तर हिंदुस्थानात दाखल झाला. तो इथवर कसा आला तो कुठे झोपला काय खाललं या गोष्टी कळाल्यानंतर अंगावर शहारे येतात. एवढी निष्ठा अन सुरांवरचं सच्चं प्रेमच 'भीमसेन' घडवू शकलं आजच्या काळात छोट्याशा यशाने हुरळून जाणाऱ्याला तर भीमसेनजींच चरित्र मुळातूनच अभ्यासावं लागेल.

PIB
उत्तरेकडे काही संगीत शिकायला मिळतील या आशेवर त्यांनी अंगावर पडेल ती कामे केली त्यात तब्येतीची हेळसांड होणं आलंच. त्याच दरम्यान काही सुर्‍हदही त्यांना भेटले. विनायक पटवर्धन हे त्यापैकी एक. त्यांनी सवाई गंधर्वांचा पत्ता दिला आणि सांगितलं, गदगजवळच कुंदगोळला किराणा घराण्याचे फार मोठे गायक आहेत. तेव्हा तू त्यांचाच गंडाबंद शार्गीद हो असा सल्ला दिला. एका अर्थी भीमसेन ज्यांचे गाणे ऐकून संगीतासाठी सर्वस्व द्यायला तयार झाला त्यांच्याकडेच शिकण्याची संधी मिळणे ही त्यांच्यासाठी पर्वणीच होती.

ते सवाई गंधर्वांकडे शिकण्यासाठी गेलेही. पण आजच्या सारख्या पैसे घेऊन तासा-दोन तासाची शिकवणी देण्याचा तो काळ नव्हता. गुरू शिष्याची पूर्ण पारख करून मगच त्याला आपल्या शिकवणीचा लाभ मिळू देत तेव्हा गुरुगृही राहून सर्व कामे करून शिकावं लागे. सुरवातीचे दोन महिने तर त्यांना पाणी भरण्याचे काम करावे लागले पण पाणे शून्य कानावर जेवढे पडेल तेवढे ते ग्रहण करून त्याचा रियाज करणाऱ्या भीमसेनांचा तानपुर्‍यावरचा षड्ज ऐकून गुरुला शिष्याची खूण पटली अन तालीम सुरू झाली.

त्यातही शेवटी काही गैरसमजुतीत सवाई गंधर्वांच्या शिकवणीला एक-दोन महिने त्यांना मुकावे लागले त्यावेळी ही गुरुप्रती असणारा त्यांचा आदर तीळमात्रही कमी झाला नाही. एका मैफिलीत स्वत: सवाई गंधर्वांनी त्यांना ऐकले (अर्थातच समोर न बसता कारण सवाई गंधर्वांना समोर बघून पंडितजी नर्व्हस होऊ नयेत म्हणून!) एकमेकांप्रती एवढे गाढ प्रेम असणारे हे गुरू शिष्य त्या मैफिलीनंतर परत एकत्र आले.

या गुरुप्रती आदर म्हणूनच पंडितजींनी 1955 पासून पुण्यात आपले गुरुबंधू पं. फिरोज दस्तुरांच्या मदतीने सवाई गंधर्व महोत्सव सुरू केला. आज त्याची ख्याती जगभर पसरलेली आहे.

  भीमसेनजींना भारतरत्न मिळणं हा तमाम संगीतप्रेमी जनतेसाठी एक अत्युच्च आनंद सोहळाच आहे ह्या भारतरत्नाने गौरवलेल्या स्वररत्नाला याहून चांगली सलामी ती कोणती?      
पंडितजींचा आवाज खणखणीत तर आहेच पण तो पहाडी आहे. अन सप्त तारकात जेव्हा त्यांचा आवाज घुमतो तेव्हा आपण स्वरानंदात न्हाऊनच नव्हे तर तरंगायला लागतो. मैफिलीत आधी कोण गायलं अन नंतर कोण गाणार याचा काहीही परिणाम त्यांच्या गाण्यावर होत नसे. कारण लोकांवर पंडितजींच्या आवाजाचं एवढं गारूड होत असे की त्यांना ऐकण्यावर तृप्त धन्य तर वाटतच. पण दिव्यत्वाची अनुभुती येते.

भीमसेनाची अभंगावाणी ज्याने ऐकले नाही असा माणूसच विरळा आहे. ''बोलावा विठ्ठल.... ''चा नाद आत्ताही कानात घुमतोय. ''तीर्थ विठ्ठल.... '' जाता पांढरीशी...... '' अशा अभंगांबरोबर पंडितजी एवढे मिसळले गेलेत की त्यांच्या आवाजाशिवाय त्या अभंगाची आर्तता आत भिडणारच नाही. एवढ्या उतारवरयातही त्यांच्या अखेरच्या मैफिलीचे स्वर आजही कानात रुंजी घालताहेत. शुद्ध स्पष्ट खणखणीत आवाज आजही तसाच आहे अन ऐकणार्‍या प्रत्येकाला भले तो शास्त्रीय संगीतातला दर्दी असो किंवा एखादा सामान्य श्रोता. पंडितजी प्रत्येकाच्या काळजाला हात घालतात अन असा हे असामान्य माणूस सामान्यांच्या नसानसात मनामनात विरघळून जातो. अशा भीमसेनजींना भारतरत्न मिळणं हा तमाम संगीतप्रेमी जनतेसाठी एक अत्युच्च आनंद सोहळाच आहे ह्या भारतरत्नाने गौरवलेल्या स्वररत्नाला याहून चांगली सलामी ती कोणती?

स्वरऋषी