मोबाइल, टीव्हीमुळे लहान मुले धोक्यात
सध्या जगाच्या पाठीवर सोशल मीडिया धुमाकूळ घालत आहे. लहान मूल जेवत नसेल तर त्याला त्यांच्या हातात मोबाइल देऊन त्यास घास भरविला जातो. नको तितके मोबाइलचे वेड लागले आहे. या मोबाइलच्या गेममुळे कित्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या सतत मोबाइल पाहाण्यामुळे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम या विकाराला मुले बळी पडू लागली आहेत.
सतत मोबाइल पाहाण्याने आपल्या डोळची उघडझाप होत नसल्याने बुबळाला ओलावा मिळत नाही. त्या कारणाने डोळे कोरडे पडतात. स्क्रीनमधून पडणारा किरणोत्सव डोळ्याला अपायकारक ठरतो. यामुळे दृष्टी मंद होणे, ताणतणाव वाढणे, किंवा कमी वयात चष्मा लागणे तसेच मानदुखी, डोकेदुखी या विकाराने त्रस्त होतात.
वाढत्या वयाबरोबरच दृष्टिदोषाची समस्या जाणवू लागली आहे. हे नैसर्गिक असले तरी हल्ली झपाट्याने मानवाच्या बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे बालकामध्येही नेत्र विकाराचे प्रमाण वाढत आहे. लहान बालकांचा बदलत गेलेला आहार, नेहमी डोळ्यासोर मोबाइलवरील गेम या कारणानेही विकार जाणवू लागले आहेत. त्यामुळे मुलांना मोबाइलपेक्षा मैदानावर खेळण्यासाठी पाठविणे सर्वोत्तम व्यायाम आहे. त्यामुळे तब्येत तंदुरुस्त होऊन मुले निरोगी राहतात. मोबाइल वापराने विद्याथिवर्ग आळशी बनत आहे. मुलांच्या बुद्ध्यांकामध्ये विचार करण्याची क्षमता कमी होत आहे. त्यांना फास्टफूड देण्यापेक्षा पालेभाज्या द्याव्यात. बाजारातील ज्या त्या हंगामातील उपलब्ध होणारी ताजी फळे त्यांना द्यावीत.
मोबाइलपासून अलिप्त हेच औषध
अलीकडील दोन वर्षामध्ये शालेय मुलांमध्ये दृष्टिदोष मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्याला कारण आपण आवडीने दिलेला मोबाइल, त्या सोबत टी.व्ही. या दोन्ही उपकरणातून होणार किरणोत्सर्गामुळे डोळ्यावर ताण पडतो. आई-वडील मुलांना योग्य समजूत घालून या दोन्ही सवयीपासून अलिप्त करणे हेच एकेव औषध आहे.