रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शनिवार, 1 डिसेंबर 2018 (14:40 IST)

कलात्मक करिअरची सोनेरी वाट

सध्या कल्पकता म्हणजे क्रिएटिव्हिटीला खूप मागणी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये व्हिज्युअल आर्टस, परफॉर्मिंग आर्टस्‌, प्रायोगिक चित्रपट, साहित्य, ऐतिहासिक वारसा तसंच पारंपरिक हस्तकला यांच्या बाजारपेठा विस्तारत आहेत. या क्षेत्रात तज्ज्ञांची मागणी वाढते आहे. तुमच्या अंगी एखादी कला असेल तर त्या बळावर उत्तम करिअर घडवू शकता. कलात्मक करिअरचे हे काही पर्याय...
 
आर्ट हिस्टोरियन म्हणून तुम्ही नाव कमवू शकता. भारताचा इतिहास खूप समृद्ध आहे. आपल्या इतिहासासह यातल्या कलात्मक पैलूंची माहिती असेल तर तुम्हाला आर्ट गॅलरी, आर्ट म्युझियममध्ये चांगलं पॅकेज मिळू शकतं. अनेक ठिकाणी ऐतिहासिक कलाकृतींचा लिलाव केला जातो. इथेही तुम्ही काम करू शकता. 
 
काचेचा वापर करून बनवल्या जाणार्‍या सुंदर कलाकृतींना प्रचंड मागणी आहे. तुम्हीही ग्लास आर्टिस्ट म्हणून नाव कमावू शकता. स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकता. 
 
कलेच्या माध्यमातून मानसिक आजारांवर उपचार केले जातात. या तज्ज्ञांना आर्ट थेरेपिस्ट असं म्हटलं जातं. संगीत, वादनाच्या माध्यमातून लोकांना मानसिक समाधान दिलं जातं. या क्षेत्रात बर्‍याच संधी आहेत. 
 
फूट स्टायलिंगचं क्षेत्रही वाढत आहे. हॉटेल, रेस्तराँमध्ये ग्राहकांपुढे येणारे पदार्थ उत्तम पद्धतीने सजवले जाणं गरजेचं ठरत आहे. यासाठी तज्ज्ञांची मागणी वाढते आहे. तुम्ही इथे काम करु शकता.
 
दोर्‍याचा वापर करून छान छान कलाकृती घडवल्या जात आहेत. ही थ्रेड किंवा फायबर आर्ट शिकू शकता.

ऊर्मिला राजोपाध्ये