शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मे 2015 (15:26 IST)

बाळाच्या कपडय़ांची खरेदी करताना..

घरात बाळाचे होणारे आगमन हा संपूर्ण कुटुंबासाठी अत्त्युच्च आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे बाळाचे कोडकौतुक करण्यासाठी त्याच्या आई-बाबा बरोबरच इतर सारे सज्ज असतात. त्यात बाळासाठीची खरेदी हा तर स्वतंत्र विषय असतो. हल्ली मोठय़ा घरांमध्ये, बंगल्यांमध्ये बाळासाठी स्वतंत्र खोली असते. ती आकर्षक पध्दतीने सजवण्यावरही भर दिला जातो. घर छोटे असले तरीही त्यात बाळाची जमेल तशी स्वतंत्र व्यवस्था करण्याचा प्रयत्न आवर्जून केला जातो. असे असले तरी अजूनही बाळासाठी कपडय़ांची खरेदी करताना काही प्रश्न हमखास पडतात आणि त्यातून योग्य कपडय़ांची निवड करणे कठीण जाते. म्हणून बाळासाठी कपडे खरेदी करताना काही गोष्टींचा विचार आवश्यक ठरतो. 
 
लहान वयात बाळाची वाढ वेगाने होत असते. त्यामुळे मूल ज्या वयाचे आहे त्याच वयाचे कपडे घेणे उचित ठरत नाही. कारण बाळाची वाढ होते तसे हे कपडे त्याला येत नाहीत. त्यामुळे ते फार लवकर टाकून द्यावे लागतात. त्यामुळे बाळ लहान असो वा मोठे, त्याच्या वयाच्या मानाने अधिक वयाचे कपडे खरेदी करणे श्रेयस्कर ठरते. म्हणजे सहा महिन्याचे मूल असेल तर त्याला नऊ ते 12 महिन्याच्या मुलाच्या मापाचे कपडे घालता येतात. याशिवाय तुमानानुसार कपडय़ांची खरेदी करावी. कारण बाळासाठी उन्हाळ्याचे खरेदी केलेले कपडे पावसाळ्यात वा थंडीत चालत नाहीत. त्यामुळे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या मुख्य तूसाठी मुलांना स्वतंत्र कपडय़ांची खरेदी महत्त्वाची ठरते. 
 
मुलांचे बनियन, मोजे, प्लेन टॉप्स यांच्या खरेदीवर अधिक पैसे खर्च करू नयेत. मुलाला डिझायनर किंवा ब्रॅंडेड कपडे असावेत ही हौस असेल तरी स्वस्तातील कपडय़ांचे काही जोड असू द्यावेत. या कपडय़ांना ब्रँडेड कपडय़ांसोबत मिक्स अँड मॅच करता येईल. त्यामुळे मूल ब्रँडेड कपडे वापरत आहे असेच वाटेल. 
 
बर्‍याच मुलांच्या त्वचेला कपडय़ांमधील काही प्रकारांची अँलर्जी येते. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात हे प्रमाण अधिक दिसून येते. त्यामुळे उन्हाळ्यासाठी वापरावयाचे कपडे खरेदी करताना कॉटनच्या सुती, मऊ कपडय़ांना प्राधान्य द्यावे. 
 
अलीकडे ऑनलाइन शॉपिंगचे प्रस्थ बरेच वाढले आहे. अशा शॉपिंगवर वेळोवेळी मोठी सूटही दिली जाते. काही वेबसाईटस् तर खास मुलांसाठीच असतात. त्यावरून माहिती घेऊन ऑनलाइन खरेदी केल्यास मुलांचे ब्रँडेड कपडे स्वस्तात मिळतात. मुलासाठी भारीचे कपडे असावेत अशीच इच्छा असेल तर त्यानुसार खरेदी करताना त्यातून पैशाची पुरेपूर वसुली होते का, याचा विचार करावा. बाळाला बाहेर फिरायला घेऊन जाताना किंवा खास समारंभांना जाताना भारीचे कपडे असावेत अशी मानसिकता सर्वच महिलांची असते; परंतु नेहमी वापरावयाचे कपडे साधारणच असावेत. बाळाचे बारसे, वाढदिवस या निमित्ताने बरेचसे नातेवाईक कपडे भेट म्हणून देतात. हे सारे कपडे पुढे वापरात आणता येणारे नसतात. त्यामुळे ते लगेच वापरण्यास काढावे लागतात. हे लक्षात घेता आई-बाबांनी तसेच त्या कुटुंबीयांनी बाळासाठी अधिक प्रमाणात कपडय़ांची खरेदी करणे टाळणेच इष्ट ठरते. 

-मोना भावसार