शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. फॅशन
Written By वेबदुनिया|

मेकअपमध्ये पावडर गरजेची

ND
मेकअप करताना पावडर लावण्याबाबत हलगर्जी करून चालणार नाही. उन्हाळ्यात तर चेहर्‍यावर पावडर लावणे सौंदर्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. कारण त्या दिवसात घाम व घामोळ्या येण्याचे प्रमाण वाढते.

घामामुळे शरीराला खाज सुटते. पावडर लावल्याने त्वचेवरील घाम सुकतो व गोरेपणाही येतो. मेकअप अधिक खुलवण्यासाठी 'कॉम्पॅक्ट' पावडर वापरली जाते. बहुतेक वेळा स्त्रिया तिचा वापर नाक व हनुवटीवर लावण्यासाठी करतात, तर कधी कधी फाऊंडेशनच्या जागी पावडरचाही वापर केला जातो.

दुर्गंधीयुक्त घामापासून सुटका करून घेण्यासाठी प्रत्येक जण धडपड करताना दिसतो. त्यासाठी सुगंधीयुक्त पावडर लावली जाते. पावडर घामाची दुर्गंधी दूर करून प्रसन्नता प्रदान करते.

उन्हाळ्याच्या दिवसात नामांकित कंपनीच्या 'आइस कूलिंग' पावडर बाजारात उपलब्ध होतात. त्या आपल्या शरीराला बर्फासारखा गारवा प्रदान करतात.

पावडरचेही काही प्रकार आहेत. त्यात मेकअप करण्यासाठी लूज पावडर, कॉम्पॅक पावडर व टाल्कम पावडर असे प्रमुख प्रकार आहेत. त्यांचा मेकअपमध्ये विविध प्रकारे वापर केला जातो.

लूज फेस पावडर पारदर्शी असते. ती आपल्या मेकअपमध्ये मॅट फिनिशिंग देते. चेहर्‍यावर फाऊंडेशन लावल्यानंतर लूज फेस पावडर लावली जाते. आज बाजारात तर आपल्या बॉडी टोनला मॅच होणार्‍या विविध रंगाच्या शेड्‍स सहजरित्या उपलब्ध होतात.

टाल्कम पावडरचा वापर शरीरावर घाम सुकवण्यासाठी केला जातो. त्यात विविध पदार्थांव्यतिरिक्त 'टेल्क' खनिज काही प्रमाणात असते. बाजारात टाल्कम पावडर गुलाब, मोगरा, चंदन आदी फ्लेवरमध्ये सहजरित्या उपलब्‍ध होतात. त्यांच्या सुगंधाने व्यक्तीला ताजेतवाने वाटते. पावडरविना मेकअप अपूर्ण आहे. पावडर व्यक्तीच्या सौंदर्यात भर घालण्याचे कार्य करते.

पावडर तळहातावर घेऊन चेहर्‍यावर गोल-गोल फिरवून लावतात. मात्र, यात थोडी सुधारणा केली पाहिजे. पावडरचा हात चेहर्‍याच्या वरच्या बाजूने खाली व खालच्या बाजूने वर अशा पध्दतीने फिरवावा. त्यामुळे पावडर पुसली न जाता दीर्घकाळ चेहर्‍यावर राहून सौंदर्य खुलवते.