शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

रपक, छपक चप्पल!

पावसाच्या पाण्याने, चिखलाने भरलेल्या रस्त्यातून छपक, छपक आवाज करत वाट काढत जायचं म्हणजे खायचं काम नव्हे. अशा रस्त्यांवर तुमच्याकडे हव्यात भक्कम पण स्टाइलिश चपला. त्याबद्दलच... पावसाळा म्हणजेच गढूळ पाण्याने, चिखलाने आणि खड्ड्यांनी भरलेले रस्ते. याच रस्त्यांवरून रोज ये-जा करायची म्हणजे, आपल्याला दोन गोष्टींवर सर्वात जास्त लक्ष द्यावं लागतं. एक म्हणजे योग्य पावसाळी चप्पल आणि दुसरं म्हणजे पावलांची योग्य ती काळजी. 
 
पावसाळी चपला... आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारात असंख्य पावसाळी चपला उपलब्ध आहेत. त्यातीलच काही चपलांचे खास प्रकार तुमच्यासाठी.
 
फ्लिप फ्लॉप्स :  
रबर किंवा पीव्हीसी पासून बनवलेले फ्लिप फ्लॉप्स पावसाळ्यासाठी अगदी योग्य ठरतात. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ते सहजपणे स्वच्छ करतात येतात. ते सुकण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. सर्व बाजूनी ते मोकळे असल्याने पावलांना श्र्वासोच्छावस करायला मदत करतात. बाजारात सध्या अशा फ्लिपफ्लॉपची लाइन लागलीय म्हणाना. ब्राइट निऑन रंगात आणि वेगवेगळ्या प्रिंट्स आणि डिझाईंसमध्ये या चपला मिळतात. त्या बर्‍यापैकी स्वस्तही असतात. वांद्रे, लोखंडवाला, कुलाबा अशा सर्व मार्केटमध्ये तुम्हाला त्या अगदी 500 रुपयांच्या आत उपलब्ध आहेत.
 
प्लास्टिक चपला : 
जर तुम्हाला सर्वात स्वस्त चप्पल घ्यायचा असतील तर त्या आहेत, प्लास्टिक चपला. पावसाळ्यात त्या सर्वात जास्त उपयोगी ठरतात. त्यामध्ये वेगवेळे रंग आणि प्रकारही उपलब्ध आहेत.
 
क्रॉक्स : 
पावसाळ्यासाठी क्रॉक्स हासुध्दा एक उत्तम उपाय ठरू शकतो. क्रॉक्स रबरच्या असतात त्यामुळेच रस्त्यावर चांगली ग्रिप मिळते. त्यामुळे स्लिप होण्यापासून आपण बचावतो. रंगीबेरंगी आणि भोकं असलेल्या या क्रॉक्स हे पावसाळ्यासाठी एक चांगलं स्टाइल स्टेटमेंट ठरू शकतं.
 
पेपिटोज : 
पायांची फक्त बोटं उघळी राहून बाकीचं पाऊल झाकणारी ही चप्पलसुध्दा पावसाळ्यासाठी उत्तम ठरेल. या चपला तुम्हाला वॉटरफ्रुरूफ मटेरिअलमध्ये उपलब्ध आहेत. उदा. पीव्हीसी मटेरिअल किंवा प्लास्टिक. हे शूज मिटींग्ज किंवा कॉलेजातल्या प्रेझेंटेशनसाठीही हे शूज एक चांगला पर्याय असू शकतो. 
 
गमबूट्स किंवा वेलिंग्टंस :  
गमबूट्स हा अत्यंत जुना तरीही स्टायलिश प्रकार आहे. तुम्हाला तुमचा गेटअप वेस्टर्न ठेवायला आवडत असेल तर गमबूट नक्की विकत घ्या. शिवाय वेगवेगळ्या प्रिंटमधले आणि रंगातले वेलिंग्टंसही तुम्ही घालू शकता.