शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2015 (16:55 IST)

रेड कांगारू

ऑस्ट्रेलियामध्ये आढळणार्‍या कांगारू या प्राण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी एक म्हणजे रेड कांगारू. या प्राण्याच्या इतर प्रकारांपेक्षा रेड कांगारू आकारानं सर्वात मोठं असतं. रेड कांगारू संपूर्ण ऑस्ट्रेलियात आढळतं. एवढंच नाही तर रेड कांगारू ऑस्ट्रेलियातला सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे.
 
रेड कांगारू नर मादीपेक्षा आकाराने बरेच मोठे असतात. त्यांची लांबी 10 फुटापर्यंत असू शकते तर वजन 200 पाउंड असतं. मादी चार फुटांपर्यंतच वाढते. तिचं वजन 80 पाउंड असतं. या कांगारूंच्या नराच्या त्वचेचा रंग लालसर करडा असल्याने रेड कांगारू म्हटलं जातं. मादीच्या त्वचेचा रंग मातकट करडा असतो. त्यांचे हात खूप छोटे असतात. पण पायांमध्ये खूप ताकद असते. यामुळे त्यांना टुणूक टुणूक उड्या मारत येतात. उभं राहिल्यावर तोल सांभाळण्यासाठी ते लांब शेपटीचा वापर करतात. नर कांगारू 30 फूट अंतरापर्यंत उडी मारू शकतो.


 
प्रति तास 30 मैल एवढ्या वेगाने उड्या मारत ते कमी वेळात प्रवास पूर्ण करू शकतात. हे प्राणी गवत खातात. कोरड्या प्रदेशात राहत असल्याने ते पाण्याशिवाय अनेक दिवस राहू शकतात. कांगारूचं पिल्लू आईच्या पोटातल्या पिशवीत बसतं. आठ महिन्यांपर्यंत ते आईच्या पोटातल्या पिशवीत बसतं. रेड कांगारू फक्त आठ वर्ष जगतात. कांगारूंना छान पोहता येतं. पण ते उलट्या दिशेनं चाल शकत नाहीत. रेड कांगारू गोंडस दिसतात.
 
प्रशांत अभ्यंकर