सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: रविवार, 14 नोव्हेंबर 2021 (16:35 IST)

Diabetes: मधुमेह होऊ नये म्हणून काय कराल?

मधुमेह (डायबेटिस) हा शब्द आता बहुतेक सर्वांच्या ओळखीचा झालेला आहे. डायबेटिस, रक्तातील साखर तपासणे, इन्शुलिन या शब्दांचीही आपल्या सर्वांना सवय झाली आहे.
 
पण आपल्यालाही कधीतरी डायबेटिस होईल अशी भीती अनेक जणांना वाटत असेल. त्यामुळे डायबेटिस होण्याआधीच त्याला रोखण्यासाठी काय प्रयत्न करायचे याची माहिती आपण घेणार आहोत.
 
रक्तामधील साखरेची पातळी एका मर्यादेपेक्षा जास्त वाढल्यामुळे मधुमेह ही आयुष्यभर चालणारी स्थिती तयार होते.
 
डायबेटिससारखी शंका आल्यास कोणत्याही व्यक्तीने स्वतःच इंटरनेटवर माहिती मिळवून त्याचं निदान करू नये. डायबेटिससाठी आवश्यक त्या चाचण्या, जीवनशैलीतले बदल, आहारातले बदल, औषधे यांचा निर्णय डॉक्टरांनीच घेतला पाहिजे.
 
कोणत्याही तपासणी, डॉक्टरांविना स्वतःहून ऐकीव माहितीवर निर्णय घेणं धोकादायक ठरू शकतं याची जाणिव ठेवली पाहिजे.
 
डायबेटिसचे दोन मुख्य प्रकार आहेत
 
टाइप वन डायबेटिस- या प्रकारात इन्शुलिन निर्मिती करणाऱ्या पेशींवर शरीरातील प्रतिकारक्षमता हल्ला करते.
 
टाइप टू डायबेटिस- यामध्ये शरीर पुरेसं इन्शुलिन तयार करू शकत नाही किंवा शरीरातील पेशी इन्शुलिनला प्रतिसाद देत नाहीत. या प्रकाराचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असतात.
गरोदरपणामध्ये काही महिलांच्या रक्तात ग्लुकोजची पातळी वाढल्यामुळे त्यांचे शरीर ते सामावून घेण्यासाठी पुरेसं इन्शुलिन तयार करू शकत नाही. त्याला जेस्टेशनल डायबेटिस (Gestational Diabetes) म्हटलं जातं.
मधुमेहपूर्व स्थिती (Pre-diabetes)
अनेक लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य पातळीपेक्षा दिसते. परंतु त्याला डायबेटिस म्हणण्याइतकी ती वाढलेली नसते. या अवस्थेला प्री-डायबेटिस असं म्हणलं जातं.
जर सामान्य पातळीपेक्षा तुमची साखरेची पातळी जास्त असेल तर तुम्हाला पूर्णपणे डायबेटिस होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे योग्यवेळीच त्याची कल्पना आल्यास त्या व्यक्तीला मदत होते जर उशीर झाल्यास त्याचे परिणाम गंभीर होत जातात.
 
डायबेटिस का होतो?
जेव्हा अन्नाचं पचन होतं. तेव्हा त्याचं रुपांतर ग्लुकोजमध्ये होऊन ते रक्तप्रवाहात जात असतं. इन्शुलिन ग्लुकोजला रक्तात, पेशींपर्यंत पोहोचवत असतं. तिथं त्याचं ऊर्जेत रुपांतर होत असतं.
परंतु डायबेटिस झाला असल्यास शरीराला ग्लुकोजचं ऊर्जेत रूपांतर करता येत नाही. कारण ग्लुकोज वहनासाठी योग्य प्रमाणात इन्शुलिन नसतं किंवा इन्शुलिन योग्यप्रकारे काम करत नसतं.
 
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मधुमेहाचं निदान म्हणजे, स्वादुपिंडाची इन्शुलीन तयार करण्याची क्षमता 50 टक्के कमी झालेली असते. उरलेली 50 टक्के क्षमता मधुमेह नियंत्रण आणि जीवनशैलीमधील बदल यावर अवलंबून असते.
 
डॉक्टरांकडे कधी जायचं?
इंग्लंडच्या एनएचएस संस्थेने काही लक्षणं सांगितली आहेत. त्यापैकी कोणतीही लक्षणं दिसल्यास आपण डॉक्टरकडे जाण्याचा विचार केला पाहिजे. एनएचएसने सांगितलेली लक्षणं पुढीलप्रमाणे-
 
भरपूर तहान लागणे
नेहमीपेक्षा भरपूरवेळा लघवीला जावं लागणं, विशेषतः रात्री
खूप दमल्यासारखं वाटणं
वजन घटणं आणि स्नायूंचं प्रमाण कमी होणं
शिश्न आणि योनीजवळ खाज सुटणं
जखमा फार संथपणे भरणं
दृष्टी कमकुवत होणं
डायबेटिस होऊ नये म्हणून काय करावं लागेल?
डायबेटिस होऊ नये असा विचार आपण करत असू तर सर्वांत आधी स्वतःचं निरीक्षण करावं लागेल. आपलं वजन, रक्तातील साखरेची पातळी, जीवनशैली यांचा विचार करावा लागेल.
 
1. कौटुंबिक इतिहास-
ज्या लोकांच्या घरामध्ये डायबेटिसने मागच्या पिढ्यांमध्येच प्रवेश केला केला आहे अशा लोकांना डायबेटिसचा धोका जास्त असतो. त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
मुंबईमध्ये हिंदुजा हेल्थकेअरमध्ये कार्यरत असणारे डॉ. शशांक शहा यांच्यामते "आई-वडिलांपैकी कोणालाही डायबेटिस असेल तर घरामध्ये साखर, बाहेरचे खाणे, गोड पदार्थ यांच्यात आधीपासूनच 50 टक्के कपात करता येईल. अशामुळे डायबेटिसचं येणं लांबवता येईल."
 
मधुहेमहतज्ज्ञ डॉ. किरण शहा यांच्यामते, "डायबेटिसचा इतिहास असणाऱ्या कुटुंबांनी मुलांच्या हालचालींवर विशेष लक्ष दिलं पाहिजे. अशा मुलांनी आधीपासूनच वजन कमी ठेवणं, व्यायाम करणं गरजेचं आहे."
 
मोबाईल, संगणकापेक्षा मुलांनी मैदानी खेळ, व्यायाम यावर भर दिला पाहिजे असं डॉ. किरण शहा सांगतात.
 
2. वजन-
आपला बीएमआय म्हणजे उंचीनुसार आदर्श वजन किती आहे हे सर्वांनी पाहिलं पाहिजे. जर वजन लठ्ठपणाकडे जात असेल तर काळजी घ्यावी लागेल. कंबरेचा घेर 90 से. मी. पेक्षा जास्त असता कामा नये असं डॉ. शशांक शहा सांगतात.
ज्या घरांमध्ये लठ्ठपणा, डायबेटिस आधीपासून आहे त्यांनी कमी कॅलरी आणि जास्त प्रथिनं असलेला आहार घेण्यावर भर द्यावा असं डॉक्टर सांगतात.
 
वजन आटोक्यात ठेवण्याबद्दल डॉ. किरण शहा बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "या लोकांनी स्वतःचं अतिरिक्त असलेलं 7 टक्के वजन कमी केलं त्यांच्यामध्ये डायबेटिस वाढत जाण्याची प्रक्रिया 60 टक्क्यांनी मंदावली तसेच जे लोक प्री-डायबेटिस स्थितीत आहेत त्यांनी आपलं 7 ते 10 टक्के वजन कमी केल्यावर त्यांचा डायबेटिसकडे जाण्याचा वेग मंदावल्याचं अभ्यासातून दिसून आलं आहे."
 
3. आहार-
भारतीय जेवणात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त आहे. त्या आहारात प्रथिनांनाही जागा दिली पाहिजे. भाज्या- फळं अशा कच्च्या आहाराचं प्रमाण वाढवलं पाहिजे. साखर आणि गोड पदार्थ, चॉकलेट्सचं प्रमाण कमी केलं पाहिजे.
गोड पेयं, थंड पेयं, फळांचे रस, कॉन्सन्ट्रेटेड पेयांमुळे भरपूर साखर पोटात जाते. ते थांबवलं पाहिजे. योग्य प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे आणि वेळेवर पित राहिलं पाहिजे.
 
डॉ. किरण शहा यांच्यामते, "सर्वांनी आपल्या आहारात तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्सचा वापर वाढवला पाहिजे. प्रक्रिया केलेलं, पॅक फूड कमीत कमी वापरलं पाहिजे. सॅच्यूरेटेड तेल वापरू नये."
 
4. व्यायाम-
प्रत्येक व्यक्तीने घरातील कामांच्या हालचालींशिवाय व्यायाम करण्याची गरज आहे असं डॉक्टर सांगतात.
 
केवळ घरातल्या कामांवर विसंबून राहाता येणार नाही. चालणे, फिरणे, पोहणे, सायकलिंग, वेट ट्रेनिंगसारखे व्यायाम करण्याची गरज आहे. त्याला पर्याय नाही.
महिलांनी व्यायामाकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे हे सांगताना डॉ. किरण शहा म्हणाले, "ज्या महिलांना गरोदरपणाच्या काळामध्ये जेस्टेशनल डायबेटिस होतो त्यांनी प्रसुतीनंतर वजन कमी न केल्यास डायबेटिस कायम राहू शकतो किंवा पुढच्या प्रसुतीच्यावेळेस डायबेटिस निर्माण होऊ शकतो."
 
यामुळेच महिलांनी वजन आटोक्यात आणून घरगुती कामांसह व्यायामासारख्या हालचाली केल्याच पाहिजेत असं ते म्हणतात.
 
5. तपासण्या-
"साधारण वयाच्या पंचविशीपासून रक्तातील साखर, इन्शुलिन, कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसिरॉइडचे प्रमाण तपासण्यासाठी चाचण्या केल्या पाहिजेत. त्यातून डायबेटिसचा अंदाज येऊ शकतो. याबरोबर प्रथिनं आणि जीवनसत्वांचे प्रमाणही तपासावे," असं डॉ. शशांक शहा सांगतात.
जीवनसत्वांच्या अभावामुळे वजन वाढू शकतं असं ते सांगतात.
 
6. परस्पर निर्णय नको-
इंटरनेटवर माहिती वाचून परस्पर निर्णय घेऊ नये असं डॉ. शशांक शहा सांगतात. "इंटरनेटवर तेही खात्रीशीर स्तोत्रांवर माहिती मिळवायला हरकत नाही परंतु शरीराबाबतचा कोणताही निर्णय व्यक्तीने स्वतःच घेऊ नये. डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे", असं डॉ. शशांक सांगतात
"वजन कमी करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या डाएट्सचा वापर केला जातो. त्यामुळे शरीराचं नुकसान होत आहे का?" हेसुद्धा तपासण्याची गरज असल्याचं डॉ. किरण शहा सांगतात.
 
प्रत्येक व्यक्तीने आहार विहाराबरोबर तणावमुक्त राहाणं, हसतमुख राहाणं आणि व्यवस्थित झोप घेणं फारच आवश्यक असल्याचं ते सांगतात.