तारुण्य राखणारे माशाचे तेल
नित्याच्या व्यायामाबरोबरच माशाच्या तेलाचे सेवन केल्यास व्यक्तीचे तारुण्य अधिक काळ टिकते, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. माशाच्या तेलामुळे व्यक्तीच्या मांसपेशीत नव्याने ताकद येते परिणामी त्यामुळे त्वचा सतेज राहत असल्याचेही दिसून आले, पण संशोधकांनी मात्र हे तेल पूर्णपणे सौंदर्यवर्धक असल्याचा निर्वाळा दिलेला नाही. यासाठी आणखी सखोल संशोधन आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या तेलाची परिणामकारकता आजमावून पाहण्यासाठी संशोधकांनी 65 वर्षीय महिलांवर प्रयोग केला असता त्यांच्या हाती सकारात्मक निष्कर्ष आले. दरम्यान माशाच्या तेलात आढळणारा ओमेगा-3 हा घटक हृदयासाठी विशेष फायदेशीर असल्याचे दिसून आले. वृद्धावस्थेत व्यक्तीच्या शरीरातील मांसपेशी अंकुचन पावतात परिणामी त्वचेवर सुरकुत्या पडत असल्याचे दिसून आले आहे. तसेच गुडघेदुखी, चालताना पायात होणार्या वेदना यांना देखील मांस पेशींचे अंकुचन हेच कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पण माशाच्या तेलाचा शरीरावर अनुकूल परिणाम होण्यासाठी तेलाच दर्जा मात्र चांगला असायला हवा तरत त्याचे परिणाम होतात, असेही संशोधकांनी म्हटले आहे. अलीकडे माशाच्या तेलात मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याने त्याचा विपरीत परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे या तेलाचे सेवन करण्याआधी ते नीट पारखून घ्यावे, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.