रविवार, 28 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (23:26 IST)

तुम्ही खात असलेलं तूप शुद्ध आहे की भेसळयुक्त? कसं ओळखायचं?

ghee
गुजरातमधील बनासकांठा येथील प्रसिद्ध अंबाजी मंदिरात भाविकांच्या प्रसादासाठी मोहनथाळ बनवणाऱ्या खाजगी कंपनीच्या प्रसादात भेसळयुक्त तूप वापरण्याचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
'मोहिनी केटरर्स' नावाच्या एका खासगी कंपनीला मोहनथाळचा प्रसाद भाविकांसाठी बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती, मात्र राज्याच्या अन्न आणि औषध नियंत्रण प्रशासनानं (एफडीसीए) केलेल्या तपासणीत प्रसादात वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या शुद्धतेबाबत धक्कादायक तथ्य समोर आणलं आहे.
 
मोहिनी केटरर्सनं मधुपुरा येथील एका खासगी कंपनीमार्फत निकृष्ट दर्जाचं तूप खरेदी करून कंटेनरवर अमूलचं बनावट ब्रँडिंग केल्याचं तपासात उघड झालं आहे.
 
अन्न आणि औषध नियंत्रण प्रशासनाचे आयुक्त एच.जी. कोशिया यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, मोहिनी केटरर्सकडून 15 सप्टेंबर रोजी जप्त केलेल्या तुपाचे नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचं आढळलं. मात्र भाविकांमध्ये घबराट पसरू नये, म्हणून रिपोर्ट जाहीर करण्यात आला नाही.
 
या वादामुळं आता नकली तुपाचा मुद्दा चर्चेचा विषय बनला असताना, बीबीसीनं भेसळयुक्त तूप कसं बनतं आणि ते कसं ओळखावं याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.
 
भेसळयुक्त तूप कसं बनतं?
राजकोट महानगरपालिकेच्या आरोग्य शाखेतील उप आरोग्य अधिकारी डॉ. हार्दिक मेहता यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना, कमी गुंतवणुकीत जास्त पैसे मिळवण्यासाठी काही लोक भेसळयुक्त वस्तू बनवण्यासाठी वापरत असलेल्या वस्तूंची माहिती दिली.
ते म्हणाले की, “बनावट तूप तयार करण्यासाठी विविध प्रकारचं वनस्पती तूप आणि तिळाचं तेल मोठ्या प्रमाणात वापरलं जातं.” ही पद्धत नकली तुपाचं मिश्रण आणि त्याला चिकटपणा येण्यासाठी प्रभावी ठरतं.
 
शिवाय, ते सांगतात की बनावट तुपाला देखील खऱ्या तुपासारखाच सुगंध आणि चव आणतात. यामुळं, बहुतेक प्रकरणांमध्ये बनावट तुपाचा वास शुद्ध तुपासारखाच असतो. बनावट तूप वापरण्याच्या धोक्यांबद्दल बोलताना डॉ. हार्दिक म्हणतात, "बनावट तुपाचा दीर्घकाळ वापर केल्यानं हृदयविकार आणि पक्षाघात यांसारखे गंभीर दीर्घकालीन आजार होऊ शकतात."
 
बाजारपेठेतील भेसळयुक्त तुपापासून सावध राहण्याचा सल्ला देत ते म्हणाले, 'बाजारात उपलब्ध असलेलं नकली तूप, जे ओरिजिनल दिसतं, ते अनेकदा कमी किमतीत विकलं जातं. त्यामुळं ग्राहकांनी खरेदी करताना अत्यंत सावध असणं आवश्यक आहे.
 
शुद्ध तूप आणि नकली तूप यातील फरक करताना ग्राहकांना भेडसावणाऱ्या संभ्रमाबाबत ते सांगतात,
 
“लोकांच्या मनात शंका येऊ नये, म्हणून अनेक वेळा बनावट तूपही शुद्ध तुपाच्या किंमतीला विकलं जातं. तूप पाहिल्यानंतरही ते शुद्ध आहे की भेसळयुक्त हे ओळखणं कठीण आहे. त्यामुळं तूप खरेदी करताना खूप काळजी घेण्याची गरज आहे.
 
“अस्सल तुपाला आयएसआय (ISI) मार्किंग आणि एफएसएसएआय (FSSAI) नोंदणी क्रमांक किंवा परवाना क्रमांक असतो. याशिवाय पॅकवरील पोषण तक्ता, घटक इत्यादी पाहूनच उत्पादन खरेदी करावं.
 
भेसळयुक्त तूपाची खरेदी टाळण्यासाठी काय करावं?
भेसळयुक्त तूप ओळखण्यासाठीच्या चाचणीबद्दल बोलताना, गुजरात अन्न आणि औषध प्रशासनाच्या माजी उपायुक्त दीपिका चौहान या सांगतात की, “पूर्वी वनस्पती तूप आणि तिळाच्या तेलापासून बनवलेलं भेसळयुक्त तूप शोधण्यासाठी बाउडोइन टेस्ट (Baudouin test) आणि तुपाची आरएम व्हॅल्यू (RM value ) यांसारख्या चाचण्यांवर अवलंबून होतो. पण ही चाचणी टाळण्यासाठी अनेक पळवाटा आणि पद्धती विकसित केल्या गेल्या. मात्र, आता गॅस क्रोमॅटोग्राफी पद्धतीनं तुपातील वनस्पती तुपाचं अस्तित्व शोधलं जातं.
अस्सल तूप ओळखण्यासाठी सामान्य ग्राहकानं करायच्या उपायांबद्दल बोलताना त्या सांगतात, “वर नमूद केलेल्या सर्व पद्धती प्रयोगशाळेद्वारे शक्य आहेत. सध्या अशी कोणतीही व्यवस्था नाही की ज्याद्वारे ग्राहकांना खऱ्या आणि नकली तूपात सहज फरक करता येईल. पण भेसळयुक्त तूप खरेदी टाळण्यासाठी आपण चांगल्या दुकानातून किंवा ब्रँडचं तूप खरेदी करत आहोत याची खात्री करून घ्या. तसंच सुटं तूप खरेदी न करता चांगल्या ब्रँडचं पॅकेजिंग केलेलं तूप घ्यावं.
 













Published By- Priya Dixit