शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (10:14 IST)

ओसीडी मंत्रचळ : तुम्ही सतत हात धुता का? एखाद्या गोष्टीमुळे त्रास होईल अशी भीती वाटते का?

- ओंकार करंबेळकर
तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूस एखादी व्यक्ती सतत एखादी कृती करण्याचा प्रयत्न करते का?
 
हात धुणे, घर, शरीर एका मर्यादेपलिकडे तेही सतत स्वच्छ करत राहाणे, एखाद्या गोष्टीचा निश्चित क्रम लावणे, तसा न लागल्यास अस्वस्थ होणे, चालता-बोलता आकडे, पावलं मोजणे, वस्तू जमवणे, देवी-देवतांबद्दल वाईट विचार येणे, गॅस-कुलूप-गिझर वगैरे गोष्टी सतत तपासत राहाणे अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश होतो.
 
या व्यक्तीला एखाद्या भीतीमुळे ती गोष्ट वारंवार करावीशी वाटते. त्याचा त्या व्यक्तीच्याच आयुष्यावर परिणाम होऊ लागतो.
 
ही ओसीडीची लक्षणं शक्यता असते. ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसॉर्डर म्हणजेच ओसीडी/OCD हा आजार काही लोकांमध्ये दिसून येतो. ओसीडी झालेले लोक एखाद्या किंवा अनेक प्रकारच्या भीतीने त्रासलेले असू शकतात. अर्थात याबाबतचे कोणतेही निदान तसंच त्याबाबतचे उपचार करण्याचे निर्णय डॉक्टरच घेऊ शकतात.
 
केवळ यातील काही किंवा एखादे लक्षण दिसल्यास परस्पर निदान करणे आणि स्वतःच उपचार घेणे धोकादायक आहे. कोरोनाच्या काळामध्ये अशा रुग्णांच्या त्रासात वाढ झाल्याचं सायकायट्री अँड न्यूरोसायन्सेस या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात म्हटलं आहे. जे. बी निस्सेन यांनी बीएमसी सायकायट्री या जर्नलमध्ये लिहिलेल्या निबंधातही अशीच निरीक्षणं नोंदवली आहेत.
 
कोरोनाच्या काळात वैयक्तिक आणि घराच्या स्वच्छतेविषयी सर्वत्र प्रबोधन केले गेले. मात्र अकारण भीतीमुळे चुकीचे मार्ग वापरले जाण्याची शक्यता असते.
 
उदाहरण द्यायचे झाले कितीही स्वच्छता झाली तरी कोरोनाची भीती मनातून न जाणे. किंवा सतत कोरोना किंवा संसर्गजन्य रोग होईल यासाठी गरजेपेक्षा जास्त काळजी घेणे, ती घेतली आहे याची वारंवार खात्री करणे. ठराविक वेळानंतर गरजेपेक्षा जास्त आणि सतत सॅनिटायझर वापरणे असे प्रकार दिसून येतात. यामध्ये अतिरेकी कृती दिसत असेल आणि ओसीडीसारखी लक्षणं दिसत असतील तर त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा.
 
ओसीडी म्हणजे काय?
ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसॉर्डर हा आजार ओसीडी असा लघुरुपाने ओळखला जातो. मराठीमध्ये याला मंत्रचळ म्हणता येऊ शकेल. या आजारात एखादी गोष्ट वारंवार करण्याकडे रुग्णाची वृत्ती दिसून येते.
 
ओसीडीचे दोन टप्पे मानले जातात. त्यातला पहिला टप्पा म्हणजे ऑब्सेशन. यामध्ये ठराविक प्रकारचे अस्वस्थता निर्माण करणारे विचार व्यक्तीच्या मनात येऊ लागतात. ते सतत येत असतात. त्यामुळे एक प्रकारची भीती आणि अस्वस्थता मनात येते.
दुसरा टप्पा आहे कंपल्शनचा. ऑब्सेशनमुळे आलेली भीती, अस्वस्थता दूर करण्यासाठी ती व्यक्ती एखादी कृती करते. त्यामुळे काही वेळापुरती अस्वस्थता दूर होते. पण हे विचार सतत येऊ लागतात आणि सतत ती कृती करावी लागते. त्यामुळे व्यक्तीचा संपूर्ण वेळ आणि विचारविश्व त्याच विचारांनी, कृतीनं भरून जातं.
 
उदाहरणार्थ घरातील सर्व वस्तू तपासून रात्री झोपल्यावर दार व्यवस्थित बंद झालं आहे की नाही किंवा गॅस बंद केला आहे की नाही याबाबत अस्वस्थता निर्माण होते. त्यामुळे ती व्यक्ती पुन्हापुन्हा या गोष्टी तपासत राहाते. कितीही प्रयत्न केला तरी अस्वस्थ करणारे विचार मनातून जात नाही आणि विचार आल्यावर कृती केल्याशिवाय स्वस्थ वाटत नाही.
 
यामुळे व्यक्तीचे, कुटुंबाचे मनस्वास्थ्य, दैनंदिन कामकाज, ऑफिसचे कामकाज धोक्यात येऊ शकते. यामध्ये वेळही जातो आणि त्याचे स्वरुप फारच गंभीर झाल्यास त्याचा सर्वांना त्रास होऊ लागतो.
 
अनेकदा व्यक्तीला मनात येणारा विचार आणि त्यामुळे करावी लागणारी कृती निरर्थक आहे हे लक्षात येत असतं मात्र तरिही ती व्यक्ती संबंधित कृती सतत करतच राहाते. तसंच हा ओसीडी असू शकतो याची कल्पना नसल्यामुळे ते वाढत जाण्याची शक्यता असते. तर काही लोक हा आजार लपवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेही आजार वाढू शकतो.
 
आपल्याला होत असलेला त्रास डॉक्टरांना न सांगता विचार आणि कृतीचं चक्र सुरू ठेवलं जातं. मानसोपचार तज्ज्ञ किंवा मनोविकारतज्ज्ञांकडे जाण्यास केलेली टाळाटाळही ओसीडी वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.
 
ओसीडीची लक्षणं
ओसीडीची अनेक प्रकारची लक्षणं आहेत. साधारणतः शंभर लक्षणांना ओळखून त्यांना नावं देण्यात आली आहेत. त्यापेक्षाही अनेक लक्षणं रुग्णानुसार वेगवेगळी दिसून येतात असं मत दिल्लीमधील मनोविकारतज्ज्ञ डॉ. सुमितकुमार गुप्ता यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
 
ते म्हणाले, "बहुतांश रुग्णांमध्ये साफसफाई (आजार होईल या भीतीपोटी घेतलेली आरोग्याची अतिरेकी काळजी) आणि गॅस-कुलूप-गिझर वगैरे वस्तू सतत तपासत राहाणे ही लक्षण जास्त आढळतात. परंतु याबरोबरच अनेक लक्षणं व्यक्तीनुरुप दिसतात."
 
मुंबईस्थित मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे सांगतात, "काही लोकांना व्यवस्थित, टापटिप राहाण्याची किंवा पर्फेक्शनिस्ट म्हणतो त्याप्रकारे राहाण्याची आवड असते. त्यांना ओसीडीचे लेबल चिकटवता येणार नाही. तसंच काही वस्तू जमा करण्याचा छंद असू शकतो. मात्र अनावश्यक गोष्टी जमा करणे, त्यामुळे घर भरून जाणं, काहीतरी चुकीच्या कल्पना मनात ठेवून वस्तू जमा केल्या जात असतील. त्याचा दैनंदिन आयुष्यात अडथळा निर्माण होत असेल तर मात्र त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे."
 
येल ब्राऊन विद्यापीठाने काही लक्षणांचा अभ्यास केला आहे. त्यामध्ये अग्रेसिव्ह ऑब्सेशन्स म्हणजे स्वतःला स्वतःकडूनच किंवा दुसऱ्याला आपल्याकडून इजा होईल असे सतत विचार येणे, कंटॅमिनेशन ऑब्सेशन्स म्हणजे एखाद्या भेसळीबद्दलचे विचार उदाः प्रदूषण किंवा चिकट पदार्थांबाबत येणारी घृणा यांचा समावेश होतो. त्यानंतर सेक्शुअल ऑब्सेशन्समध्ये लैंगिक विचारातील समस्यांची लक्षणं दिसतात.
होर्डिंग किंवा सेव्हिंग ऑब्सेशनमध्ये व्यक्तीला वस्तू जमवण्याचे विचार येतात. रिलिजियस ऑब्सेशनमध्ये पवित्र वस्तुचे अपिवित्रिकरण (छेडछाड वगैरे), ईश्वरनिंदा वगैरे विचार येतात.
 
सिमट्री किंवा एक्झॅक्टनेस ऑब्सेशनमध्ये व्यक्तीला एखादी वस्तू अमूक जागेवर अमूक कोनातच ठेवली पाहिजे अन्यथा अपघात होईल असे विचार येतात.
 
सोमॅटिक ऑब्सेशन्समध्ये स्वच्छता आणि आजाराबद्दलचे विचार येतात. याप्रकारचे अनेक विचार व्यक्तीच्या मनात सतत येऊ लागतात. त्याचा त्रास त्यांना होऊ लागतो. एखादा पवित्र किंवा लकी नंबर, ठराविक रंगाबद्दलचे विचारही मनात येऊ लागतात.
 
ओसीडी कोणत्या वयात होतो?
डॉ. सुमितकुमार गुप्ता यांच्यामते, "ओसीडी होण्यासाठी वयाच्या 10 ते 12 वयापासून झालेल्या घटनांचा परिणाम कारणीभूत असतो. 16 ते 25 या वयोगटामध्ये त्याच्या लक्षणांचा पहिला सर्वोच्चबिंदू दिसून येतो. साधारणतः ओसीडीचे निदान होण्याआधी 10 वर्षं त्याची लक्षणं दिसत असतात. मात्र त्याची योग्य माहिती नसल्यामुळे डॉक्टरांपर्यंत येण्यासाठी तितका काळ मध्ये गेल्याचं दिसून येतं."
 
ओसीडीसारखी लक्षणं असल्यास काय करावं?
बहुतांशवेळा काही लक्षणं सामान्य व्यक्तीमध्ये थोड्याफार प्रमाणात दिसून येतातच. मात्र याचा अर्थ सर्वांनाच ओसीडी झालेला असतो असा नाही.
 
मात्र त्याचा तुमच्या नेहमीच्या कामात अडथळा येऊ लागला, तुमची रोजची कामं करण्यात अडथळा येऊ लागला तर मात्र त्याकडे लक्ष देण्याची वेळ येते.
 
उदाहरणार्थ अतिरेकी स्वच्छतेत तुमचा वेळ जाऊ लागला आणि त्यामुळे कामाला उशीर झाला, घरात काम करणाऱ्या महिलेचं सर्व लक्ष केवळ एकाच सवयीकडे जाऊ लागलं आणि त्यामुळे इतर कामं न होणं वगैरे.
 
तसंच या सवयींमुळे आणि भीतीच्या विचारांमुळे जीवनातला आनंद हरवल्यासारखं वाटणं असेही त्रास होऊ लागतात.
 
एखाद्या रुग्णाला ओसीडी आहे की नाही याचं निदान मनोविकारतज्ज्ञांकडूनच करून घ्यावं असं मत डॉ. गुप्ता व्यक्त करतात.
 
ते म्हणतात, "वरिल लक्षणांपैकी काही लक्षणं इतरही अनेक मानसिक आजारांमध्ये दिसून येतात. त्यामुळे कोणत्याही सवयीला, लक्षणांना पाहून ओसीडीचं घरच्याघरी निदान करू नये. त्याचप्रमाणे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे स्वतःवरच उपचार करू नयेत."
 
सेरोटोनिनचा संबंध
ओसीडी हा आजार सेरोटोनिन या न्यूरोट्रान्समिटरशी संबंधित आहे. त्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांमुळेही ओसीडी होण्याची शक्यता असते. आपल्या आनंदासंबंधीच्या गोष्टी, सुखी-समाधानाची भावना निर्माण करणाऱ्या गोष्टी, प्रेम, झोप, सेक्स यासारख्या गोष्टी सेरोटोनिनशी संबंधित असतात असं मत डॉ. राजेंद्र बर्वे व्यक्त करतात.
 
"रुग्णाचे निदान करून त्याप्रकारे उपचार केले जातात. काही रुग्णांना औषधं, काहींना सायकोथेरपी किंवा काहींना दोन्हींची मदत घ्यावी लागते", असं ते सांगतात.
 
कोरोनाच्या काळात हात धुणे, सॅनिटायझर यासारखे उपाय सांगितले आहेत. ते योग्य प्रमाणात वापरण्यात काहीच गैर नाही. पण रोगाला घाबरून कोणतेही टोकाचे सततचे वर्तन होत असेल तर ते अयोग्य ठरेल, असं मत डॉ. बर्वे यांनी व्यक्त केलं.
 
तसंच त्याचं रुपांतर कपल्शन्समध्ये झालं तर कोरोनानंतरच्या काळात ओसीडी रुग्णांची संख्या वाढेल अशी भीती ते व्यक्त करतात. किंवा आतापासूनच काही रुग्ण दिसत असल्याचं ते सांगतात.
 
कोरोना आणि मानसिक ताण
कोरोनाच्या काळामध्ये मानसिक ताण-तणाव तसंच तशाप्रकारचे आजार वाढीला लागण्याची आणि त्याचे परिणाम पुढील बराच काळ दिसेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
The Psychology of Pandemics पुस्तकाचे लेखक आणि युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात मानसोपचार विषयाचे प्राध्यापक स्टिव्हन टेलर म्हणतात, "जवळपास 10 ते 15 टक्के लोकांच्या मानसिक आरोग्यावर या जागतिक आरोग्य संकटाचा जबरदस्त परिणाम होणार आहे. त्यामुळे त्यांचं आयुष्य पुन्हा पूर्ववत होऊ शकणार नाही."
 
ऑस्ट्रेलियाच्या ब्लॅक डॉग इन्स्टिट्‌युट या मानसिक आरोग्यविषयक संशोधन करणाऱ्या स्वतंत्र संस्थेनेही अशाच प्रकारचा इशारा दिला आहे. "काही लोकांना दीर्घकाळासाठी तणावाचा सामना करावा लागू शकतो," असं या संस्थेचं म्हणणं आहे.
 
तर युकेतल्या काही मानसिक आरोग्यविषयक तज्ज्ञांनी ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये लिहिलेल्या लेखात कोव्हिड-19 चा शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांपेक्षा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम दीर्घकाळ टिकेल, असं म्हटलेलं आहे.