बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: रविवार, 30 जानेवारी 2022 (15:53 IST)

Omicron Covid : लाँग कोव्हिडनंतर फुफ्फुसांवर आढळल्या परिणाम झाल्याच्या खुणा

स्मिता मुंदसाद
दीर्घकाळ कोव्हिड अर्थात लाँग कोव्हिड असलेल्यांमध्ये काही प्रमाणात फुफ्फुसांचं नुकसान झालेलं असण्याची शक्यता असते, असं युकेमधील एका लहान अभ्यासावरून समोर आलं आहे.
 
नेहमीच्या पद्धतीनं केल्या जाणाऱ्या तपासणी (स्कॅन) द्वारे फुफ्फुसांवर झालेला परिणाम दिसून येत नसल्यानं शास्त्रज्ञांनी यासाठी झेनॉन (Xenon) गॅस स्कॅन पद्धतीचा वापर केला.
 
या अभ्यासकांनी 11 अशा लोकांचा अभ्यास केला, ज्यांना कोव्हिडची लागण झाल्यानंतर रुग्णालायत दाखल होऊन उपचारांची गरज भासली नव्हती. मात्र, या संसर्गानंतर दीर्घकाळ त्यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास झाला होता.
 
याच्या निष्कर्षांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी मोठ्या पातळीवर सखोल अभ्यास सध्या सुरू आहे.
यापूर्वी कोव्हिडची लागण झाल्यामुळं रुग्णालयात दाखल कराव्या लागलेल्या रुग्णांच्या स्थितीनुसार हा अहवाल तयार करण्यात आला होता.
 
श्वासोच्छ्वासाला होणारा त्रास आणि त्याची कारणं ही अत्यंत गुंतागुंतीची असतात. तरीही दीर्घकाळ राहणाऱ्या कोव्हिडमध्ये श्वासोच्छ्वासात त्रास होणं ही एवढी सामान्य बाब का आहे, यावर अभ्यासाच्या निष्कर्षांमुळं प्रकाश टाकता येईल, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे.
दीर्घकाळ राहणारा कोव्हिड हा कोरोनाच्या संसर्गानंतरही अनेक आठवडे आढळणाऱ्या लक्षणांचा परिणाम असतो. त्यासाठी दुसरं काही कारण दिलं जाऊ शकत नाही.
'ऑक्सिजनचा प्रवास'
 
ऑक्सफर्ड, शिफिल्ड, कार्डिफ आणि मँचेस्टर येथील टीमने झेनॉन गॅस स्कॅनर आणि फुफ्फुसांतील संसर्गासाठीच्या इतर तपासण्या यांची रुग्णांच्या तीन गटांमध्ये तुलना केली.
 
यामध्ये कोरोनाचा संसर्ग झाला तेव्हा रुग्णालयात दाखल करावं न लागेलल्या पण दीर्घकाळ कोव्हिड आणि श्वासोच्छ्वासाचा त्रास असलेल्या रुग्णांचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर रुग्णालयात दाखल करावे लागलेले पण दीर्घकाळ कोव्हिड नसलेले 12 रुग्ण आणि 13 सुदृढ लोकांचा यामध्ये समावेश करण्यात आला.
 
या चांगल्या कारणासाठी सहभागी झालेल्या सर्वांनी मॅग्नेटिक रेझनन्स इमॅजिंग (MRI)स्कॅन दरम्यान झेनॉन वायू श्वासाद्वारे शरिरात घेतला.
 
हा वायू शरिरामध्ये ऑक्सिजनसारखंच वर्तन करतो, मात्र तो स्कॅनदरम्यान आपल्याला दिसू शकतो. त्यामुळं शास्त्रज्ञांना फुफ्फुसांच्या माध्यमातून तो रक्तवाहिन्यांमध्ये कशाप्रकारे प्रवास करतो हे पाहता आलं. शरिरात ऑक्सिजनच्या प्रवाहाचा हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो.
 
यातून संशोधकांच्या असं लक्षात आलं की, सुदृढ लोकांच्या तुलनेत दीर्घकाळ कोव्हिड असलेल्या रुग्णांच्या शरिरात हा वायू कमी प्रभावी पद्धतीनं प्रवास करत होता.
तसंच ज्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं, त्यांच्यामध्येही अशाच प्रकारचा परिणाम दिसून आला.
 
लोक जेव्हा दवाखान्यात येतात तेव्हा त्यांना श्वासोच्छ्वास घ्यायला नेमका त्रास का होत आहे, हे समजावून सांगता येत नाही तेव्हा ती अत्यंत विचित्र परिस्थिती असते, असं प्रमुख शास्त्रज्ञ आणि फुफ्फुस रोगतज्ज्ञ डॉ. एमिली फ्रेसर म्हणाल्या. अनेकदा एक्स रे आणि सीटी स्कॅन यात काहीही परिणाम झालेले दिसत नाही.
"हे एक अत्यंत महत्त्वाचं संशोधन आहे. त्यामुळं या माध्यमातून या विषयावर अधिक प्रकाश टाकता येईल, अशी आशा आहे."
 
"पण, यावर पुनर्वसन कार्यक्रम आणि श्वासोच्छ्वासाचं प्रशिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याचा फायदा होऊ शकतो, हे लोकांनी लक्षात घ्यायला हवं," असंही त्या म्हणाल्या.
 
"जेव्हा आम्ही क्लिनिकमध्ये श्वासोच्छ्वासात त्रास होणारे लोक पाहतो, तेव्हा आपण त्यांना बरं करू शकतो."
 
"यात आता काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. दीर्घकाळ कोव्हिड असलेल्या किती रुग्णांमध्ये असा परिमाण पाहायला मिळतो. आपल्याला आढळलेल्या परिणामांचं नेमकं आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वं आणि त्याचे दीर्घकाळ होणारे परिणाम, यांचा त्यात समावेश आहे," असं या संशोधनाचे सहप्रमुख संशोधक प्राध्यापक फर्गस ग्लीसन यांनी म्हटलं.
 
"एकदा आपल्याला ही लक्षणं निर्माण होण्यामागची यंत्रणा लक्षात आली, तर आपण यासाठी अधिक चांगले उपचार शोधू शकतो."
 
हे संशोधन अद्याप कुठेही प्रकाशित झालेलं नाही. तसंच त्याचा औपचारिक अभ्यास किंवा समीक्षणही करण्यात आलेलं नाही.