रविवार, 28 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

जीव वाचवणारी सीपीआर प्रक्रिया काय असते? ती प्रत्येकाला का आली पाहिजे? वाचा

कल्पना करा तुम्ही बागेत किंवा मॉलमध्ये फिरायला गेला आहात किंवा बस रेल्वेमधून प्रवास करताना एखादी व्यक्ती अचानक आजारी पडली, तिला एखाद्या गोष्टीचा अचानक त्रास सुरू झाला तर?...अशावेळेस काय करायचं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. कारण आपल्या मदतीमुळे, प्रथमोपचारांमुळे त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वीचा हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. त्या काळात कसं वागायचं, काय उपचार करायचे हे पाहिलं पाहिजे.
 
या उपचारांत सर्वाधीक महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या सीपीआर या उपचाराची माहिती आपण घेणार आहोत.
 
सीपीआर याचा अर्थ कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन. एखादी व्यक्ती आजारी पडली, तिची शुद्ध हरपली, ती श्वासोच्छवास करत नाहीये किंवा श्वास मंदावला आहे तर अशा स्थितीत सीपीआर दिला गेला पाहिजे.
 
या उपचार प्रक्रियेद्वारे त्या व्यक्तीच्या फुप्फुसात ऑक्सिजन दिला जातो. त्याबरोबर त्या व्यक्तीच्या शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्ताचा संचार होऊ लागतो.
 
आपत्कालीन स्थितीत दिल्या जाणाऱ्या उपचारांमध्ये जगभरात सर्वाधीक वेळा दिली जाणारी ही उपचार प्रक्रिया म्हणून सीपीआर ओळखली जाते.
 
तुम्ही नाटक सिनेमात एखाद्या बेशुद्ध व्यक्तीच्या छातीवर दुसरी व्यक्तीवर वारंवार दाब देताना आणि तोंडात श्वास देत असल्याचं पाहिलं असेल. त्यामुळे ती व्यक्ती शुद्धीवर आल्याचं तुम्ही पाहिलं असेल. यालाच सीपीआर असं म्हटलं जातं.
 
अर्थात नाटक सिनेमात पाहिलं असलं तरी ती करण्याची प्रक्रिया आपल्याला माहिती असली पाहिजे तसेच कोणत्या स्थितीत सीपीआर द्यायची असते हे सुद्धा माहिती असलं पाहिजे.
 
आरोग्य क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांना हे प्रशिक्षण दिलेलं असतंच. मात्र याचं प्रशिक्षण सामान्य नागरिकांनाही दिलं जावं असं तज्ज्ञांचं मत आहे. काही देशांमध्ये मुलांना लहान वयातच याचं प्रशिक्षण दिलं जातं.
 
सीपीआर कधी द्यायचा?
ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनच्या वेबसाईटनुसार एखाद्या व्यक्तीला कार्डिअॅक अरेस्ट झाला तर रुग्णवाहिकेसाठी फोन करावा आणि तात्काळ सीपीआर सुरू करावा.
 
ब्रिटनची राष्ट्रीय आरोग्य सेवासुद्धा हेच सांगते. ते म्हणतात, जर एखादी व्यक्ती बेशुद्ध झाली आणि सामान्यरित्या श्वास घेत नसेल तर रुग्णवाहिकेसाठी फोन करावा आणि सीपीआर सुरू करावा.
 
रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट या संघटना जगभरातील स्वयंसेवकांना प्राथमिक उपचारांचा प्रशिक्षण देते.
 
अमेरिकन रेडक्रॉसनुसार सीपीआरमुळे कार्डिअक अरेस्टच्या वेळेस एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी मदत होऊ शकते.
 
जेव्हा हृदय काम करणं थांबवतं किंवा हृदयाचे ठोके अनियमित होतात तेव्हा मेंदू आणि इतर महत्त्वाच्या अवयवांत रक्त सामान्यरित्या प्रवाहित होत नाही. त्यामुळे त्याचा मेंदूवर परिणाम होतो. यामुळे कधीकधी मृत्यूही ओढावतो. मात्र सीपीआर दिल्यामुळे जीव वाचण्याची शक्यता बरीच वाढते.
 
बांगलादेश नॅशनल कार्डिओवस्क्युलर इन्स्टिट्यूटचे तज्ज्ञ डॉ. अशरफ उर रहमान तमाल सांगतात, "कार्डिअक अरेस्ट हृदयरोगींना होऊ शकतो तसा हृदयरोग नसलेल्या लोकांनाही होऊ शकतो. एखादी व्यक्ती जोरात दुखापत होऊन खाली पडला आणि त्याचं हृदय थांबतंय असं लक्षात आलं तर त्याला सीपीआर दिल्यास त्याला वाचवण्यासाठी वेळ मिळतो."
 
अशी स्थिती हृदय रोग, विजेचा झटका लागणे, पाण्यात बुडणं, शरीरात एखादं मोठं गंभीर इन्फेक्शन होणं अशा कारणांनी येऊ शकते. यामुळे हृदयाचं काम थांबू शकतं. अशा स्थितीत सीपीआरचा उपयोग करावा असं डॉक्टर सांगतात.
 
रहमान सांगतात, जेव्हा हृदय थांबतं तेव्हा फारच कमी वेळ आपल्याकडे असतो. अगदी पाच ते सात मिनिटं असतात. या पहिल्या टप्प्यातच सीपीआर लगेच सुरू करणं आवश्यक आहे.
 
सीपीआरच्या सात पायऱ्या
रेडक्रॉसने सीपीआरची सात पायऱ्यांत आखणी केली आहे.
 
पहिल्या टप्प्यात तुम्ही आधी सुरक्षेची स्थिती लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे ज्या व्यक्तीला त्रास होतोय त्या व्यक्तीच्या आजूबाजूला पाणी किंवा आग असा धोका तर नाहीये ना याची खातरजमा करावी किंवा ती व्यक्ती भर वाहत्या रस्त्याच्या मध्ये पडली नाहीये ना हे पाहाणं.
 
जर आवश्यकता असेल तर पीपीई किट किंवा तत्सम व्यक्तिगत संरक्षण उपकरण वापरावं असं सुचवलं जातं.
 
दुसऱ्या टप्प्यात ती व्यक्ती काय प्रतिक्रिया देतेय हे पाहाणं येतं. यासाठी तिला जोरात धक्का देणं किंवा हाक मारणं येतं. तसेच तिला कुठे रक्तस्राव तर होत नाहीये ना याची तपासणी करावी.
 
तिसऱ्या टप्प्यात जर ती व्यक्ती प्रतिक्रिया देत नसेल आणि श्वास घेत नसेल किंवा नाडी लागत नसेल, धडधड वाढली असेल तर मदतीसाठी रुग्णवाहिका किंना आपत्कालीन नंबरला फोन करायचा असतो.
 
चौथ्या टप्प्यात गुडघ्यावर बसावं आणि त्या व्यक्तीच्या शेजारी बसावं. यावेळेस हात खांद्याबरोबर समोर ठेवून त्या व्यक्तीला झोपवलं पाहिजे.
 
पाचव्या टप्प्यात सीपीआरची सुरुवात करावी. सर्वात आधी छातीवर दोन्ही हात ठेवावेत. एक हात दुसऱ्या हातावर ठेवावा आणि तळहातानं दोन्ही हातांच्या बोटांवर दाबलं पाहिजे. हा दाब किमान दोन इंचाचा असला पाहिजे. प्रत्येकवेळा दाबल्यावर पूर्ण हात वर घेतले पाहिजेत म्हणजे छाती पुन्हा सामान्य स्थितीत येईल. याचा वेग प्रतीमिनिट 100 ते 120 असेल. मात्र सलग तीसवेळा असं दाबल्यावर तुम्हाला एक ब्रेक घ्यावा लागेल.
 
सहावा टप्पा आता येतो. यात तोंडाने श्वास देणं येतं. यासाठी त्या व्यक्तीचं डोकं सरळ ठेवा. जिवणी वरच्या बाजूला दाबावी. मग त्या व्यक्तीचं नाक पकडून श्वास घ्या आणि तो त्या व्यक्तीच्या तोंडात पूर्ण आत दाबा.
 
याचा वेळ एक सेकंद असेल आणि छाती फुलतीय याकडे लक्ष ठेवा. पुढचा श्वास देण्याआधी तो बाहेर येऊ द्या.
 
मात्र यात पहिल्यावेळेस छाती फुलून वर येत नसल्याचं दिसलं तर पुन्हा डोतं हलवून तोंड उघडून घशात काही अडकल्यामुळे श्वासात अडथळा येतोय का हे पाहावं.
 
सातव्या टप्प्यात छातीला अशा प्रकारे 30 वेळा दाबलं जातं आणि दोनवेळा तोंडानं श्वास देतात. मात्र छाती दाबण्यामधलं अंतर 10 सेकंदांपेक्षा जास्त असता कामा नये हे लक्षात ठेवा. अशाप्रकारे रुग्णवाहिका किंवा इतर मदत येईपर्यंत सीपीआर सुरू ठेवलं पाहिजे.
 
बालचिकित्सा सीपीआर
कधीकधी लहान मुलांनाही सीपीआरची आवश्यकता भासते. ही स्थिती हृदयाशी संबंधित समस्या असलेल्या मुलांत दिसून येते. अशा मुलांना श्वास घेण्यात त्रास होतो.
 
युकेची एनएचएस सेवा सांगते, की मुलांना सीपीआर देताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
 
सर्वात आधी एक हात डोक्यावर ठेवावा आणि डोकं मागं नेऊन उचलावं. तोंडात किंवा नाकात काही अडकलं असेल ते बाहेर काढावं.
 
यानंतर नाक पकडून तोंडाद्वारे पाचवेळा श्वास घेण्यास सांगतात आणि छाती वर येतेय की नाही तेही पाहाण्यास सांगतात.
 
मग एक तळहात मुलाच्या छातीवर ठेवून दोन इंचापर्यंत दाबावं. जर एका तळहातानं होत नसेल तर दोन हातांनी करावं.
 
एका वर्षापेक्षा लहान मुलाच्या स्थितीत दोन हातांऐवजी दोन बोटांनी सीपीआर करावं असं सांगतात. अशावेळी दाब दीड इंचापर्यंतच द्यावा.
 
तसेच प्रतिमिनिट 100 ते 120 श्वास या गतीने तोंडाने दोनवेळा 30-30 श्वास द्यावेत. रुग्णवाहिका आणि मदत येईपर्यंत सीपीआर सुरू ठेवावा.
 
Published BY- Priya Dixit