मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (11:34 IST)

कोरोनानंतर डायबेटिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढण्याची डॉक्टरांना भीती का?

कोरोना आणि डायबेटिस यांच्यातला परस्परसंबंध नेमका काय आहे आणि त्याचे परिणाम काय असू शकतात?
 
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात, विपुल शहा यांनी कोरोनाशी लढा देताना अतिदक्षता विभागात 11 दिवस झुंज दिली.
 
विपुल यांना कोरोना होण्याआधी डायबेटिस नव्हता. कोरोनाच्या उपचारादरम्यान विपुल यांना स्टेरॉइड्स देण्यात आली.
 
कोव्हिडमुळे फुप्फुसावर परिणाम होतो. विपुल यांच्या फुप्फुसातील इन्फेक्शन स्टेरॉइड्सनी कमी केलं. शरीरातली प्रतिकारशक्ती जेव्हा कमी होईल अशी शक्यता होते तेव्हाही स्टेरॉइड्स कामी येतात.
 
पण स्टेरॉइड्स प्रतिकारशक्ती कमीही करतात आणि त्याचवेळी रक्तातली साखरेची पातळी वाढवतात. डायबेटिस असलेल्या तसंच डायबेटिस नसलेल्या दोन्ही प्रकाराच्या रुग्णांमध्ये हा धोका संभवतो.
 
विपुल यांना कोरोनातून बाहेर पडून आता वर्षभराचा कालावधी लोटला आहे. पण 47वर्षीय विपुल यांना आजही रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधं घ्यावी लागतात.
 
कोव्हिडमधून सावरल्यानंतर डायबेटिससाठी औषधं घेणाऱ्या अनेकांना मी ओळखतो, असं व्यवसायाने स्टॉक ट्रेडर असणाऱ्या विपुल यांनी सांगितलं.
 
जगात डायबेटिसच्या सहा रुग्णांपैकी एक भारतात असतो. भारतात डायबेटिसचे अंदाजे 77 दशलक्ष रुग्ण आहेत. भारतापेक्षा डायबेटिसचे रुग्ण चीनमध्ये आहेत. चीनमध्ये 116 दशलक्ष डायबेटिसचे रुग्ण आहेत.
 
डॉक्टरांच्या मते अनेक लोकांमध्ये या रोगाची लागण झालेली आहे मात्र त्यांच्यावर उपचार झालेले नाहीत. स्वादुपिंड पुरेशा इन्सुलिनची निर्मिती करू शकत नसेल किंवा शरीराला तयार झालेलं इन्सुलिन वापरता येत नाही तेव्हा डायबेटिसचा आजार होतो.
 
यामुळे साखरेचा एक प्रकार असलेलं ग्लुकोज रक्तात अतिरिक्त प्रमाणात तयार होतं. यामुळे शरीराला गंभीर धोका उद्भवेल अशी शक्यता असते. किडनी, डोळे, हृदय यांना धोका संभवतो.
 
डायबेटिस असलेल्या लोकांना गंभीर स्वरुपाचा कोरोना होण्याचा धोका अधिक असतो. स्थूलपणा, उच्च रक्तदाब, हृदयविकार, फुप्फुसांची संबंधित आजार असलेल्यांनाही कोरोना होऊ शकतो.
 
कोरोनातून सावरलेल्या रुग्णांना नव्या स्वरुपाचा डायबेटिस होण्याचा धोका आहे असं डॉक्टरांना वाटतं. देशात 32 दशलक्ष नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जगात यापेक्षा अधिक कोरोना रुग्ण फक्त अमेरिकेत आहेत.
 
कोरोनामुळे देशात डायबेटिस रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते असं डॉ. राहुल बक्षी यांना वाटतं. बक्षी मुंबईस्थित डायबेटिसतज्ज्ञ आहेत.
 
कोरोनाचा संसर्ग झाला तेव्हा डायबेटिस नसलेल्या 8 ते 10 टक्के रुग्णांमध्ये रक्तातली साखरेची पातळी वाढत असल्याचं स्पष्ट झालं आहे. यासाठी त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत.
 
काहींचा डायबेटिस सौम्य स्वरुपात आहे. काहीजण औषधांच्या माध्यमातून डायबेटिसला नियंत्रणात ठेवत आहेत. काहींना वर्षभर यासाठी औषधं घ्यावी लागत आहेत असं डॉ. बक्षी म्हणाले.
 
डायबेटिसची कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या रुग्णांमध्ये कोरोनामुळे डायबेटिस पसरतो का? यावर जगभरातले डॉक्टर खल करत आहेत.
 
कोरोना उपचारादरम्यान स्टेरॉइड्सचा मारा केल्याने होऊ शकतं असं त्यांना वाटतं. शरीरातली प्रतिकार यंत्रणा कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी तयार होते. त्यावेळी कोरोना विषाणू स्वादुपिंडात इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींवर आक्रमण करतो. त्यावेळी डायबेटिस होण्याची, वाढण्याची शक्यता असते.
 
म्युकरमायकोसिस अर्थात काळ्या बुरशीच्या संसर्गातून बरं झालेल्या रुग्णांच्या डॉक्टरांच्या संशोधनातून कोरोना आणि डायबेटिस यांच्यातला संबंध स्पष्ट झाला आहे.
 
देशभरात बुरशीचा संसर्ग झाल्याचे 45,000 जास्त रुग्ण आहेत. बुरशीच्या संसर्गामुळे नाक, डोळे आणि काही रुग्णांमध्ये तर डोक्यापर्यंत संसर्ग पोहोचतो. कोव्हिडमधून सावरल्यानंतर 12 ते 18 दिवसात बुरशीचा संसर्ग होतो.
 
संशोधनात हे लक्षात आलं की 127 पैकी 13 म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचं तर 10 टक्के रुग्णांमध्ये नव्या स्वरुपाचा डायबेटिस आढळतो आहे. या रुग्णांचं सरासरी वय 36 वर्ष आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यापैकी सातजणांना कोरोना उपचारादरम्यान स्टेरॉइड्स देण्यात आलं नव्हतं तसंच त्यांना कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवावं लागलं नव्हतं.
 
तरीही या रुग्णांच्या रक्तात साखरेची पातळी प्रचंड आहे. यामुळे येत्या काही वर्षात डायबेटिस रुग्णांच्या संख्येचा उद्रेक होऊ शकतो अशी भीती आम्हाला वाटते असं डॉ. अक्षय नायर यांनी सांगितलं. डॉ. अक्षय हे नेत्रविकारतज्ज्ञ असून या संशोधन गटाचा भागदेखील होते.
 
दिल्ली आणि चेन्नईतील रुग्णालयातील मिळून 555 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. कोरोनानंतर डायबेटिस झालेल्या रुग्णांमध्ये, कोरोना होण्याआधीही डायबेटिस असलेल्या रुग्णांपेक्षा साखरेची पातळी जास्त आढळल्याचं स्पष्ट झालं आहे.
 
कोरोना आणि डायबेटिस यांच्यातला परस्परसंबंध एक गुंतागुंतीचं चित्र निर्माण करणारा आहे असं डायबेटिसतज्ज्ञ डॉ. अनुप मिसरा सांगतात. ते या संशोधन गटाचा भाग होते.
 
कोरोनाच्या उपचारादरम्यान रुग्णालयांमध्ये हिमोग्लोबिन A1c लेव्हल चाचणीच्या माध्यमातून डायबेटिस आहे की नाही हे कळतं. तीन महिन्यात रुग्णाच्या रक्ताच्या पातळीतलं साखरेच्या प्रमाणाची सरासरी ही चाचणी देते.
 
या रुग्णांना कोरोना होण्याआधी डायबेटिस असण्याची शक्यता होती परंतु त्यांनी चाचणीच केली नाही किंवा उपचारादरम्यान स्टेरॉइड्स दिल्याने त्यांना डायबेटिस झाला असावा.
 
काही रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर त्यांच्या रक्तातली साखरेची पातळी सर्वसाधारण झाली. मात्र विपुल शहा यांच्या बाबतीत तसं झालं नाही. वर्षभरानंतरही साखरेची पातळी नियंत्रणात राखण्यासाठी त्यांना औषधं घ्यावी लागतात. अशा रुग्णांमध्ये डायबेटिस होण्याची शक्यता आधीपासूनच होती. लठ्ठपणा आणि कौटुंबिक इतिहास यामुळे ही शक्यता होती असं डॉ. मिसरा यांना वाटतं.
 
काही दुर्मीळ रुग्णांमध्ये कोरोनाने स्वादुपिंडाचं नुकसान केल्याचं स्पष्ट झालं आहे. अशा रुग्णांचे दोन प्रकार असू शकतात. एक म्हणजे त्यांच्या शरीरात इन्सुलिन निर्मिती होत नाही. दुसरं म्हणजे शरीरात अतिशय अल्प स्वरुपात इन्सुलिनची निर्मिती होते.
 
स्वादुपिंडाच्या ज्या भागात इन्सुलिनची निर्मिती होते त्याजागी कोरोना विषाणू आक्रमण करतो असं प्राध्यापक गाय रुटर सांगतात. लंडनच्या इंपीरियल महाविद्यालयात ते कार्यरत आहेत.
 
कोरोनातून सावरलेल्या रुग्णांमध्ये आढळणारा नव्या स्वरुपाचा डायबेटिस कायमस्वरुपी आहे का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
 
भारतीयांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर लाखोजणांना डायबेटिस आहेच. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही डायबेटिस रुग्णांची संख्या कमी असलेल्या देशांपेक्षा अधिक आहे.
 
कोरोनाचं संकट आटोक्यात आल्यानंतर देशाच डायबेटिस रुग्णांची संख्या वाढेल असं डॉक्टरांना वाटतं.
 
देशात प्रदीर्घ काळ लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. यामुळे हजारो माणसं घरी बसून काम करत आहेत. ते ऑनलाईन सेवांद्वारे खाणंपिणं मागवतात. या मंडळींचा व्यायाम फारसा नसतो. त्यामुळे अनेकांना चिंता भेडसावते, नैराश्य जाणवतं. अशा लोकांमध्ये नव्या स्वरुपाच्या डायबेटिसचे रुग्ण आढळत आहेत. माझ्यासाठी ही अतिशय काळजीची गोष्ट आहे असं डॉ. मिसरा यांना वाटतं.