1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मार्च 2024 (08:16 IST)

वजन कमी करायचं आहे? 'या' चुका करू नका

weight loss
वजन कमी व्हावं यासाठी गुगलवर माहिती शोधणाऱ्यांची संख्या या जगात कमी नाही. जसं की, वजन कमी करण्यासाठी व्यायामानंतर काय खावं?, वजन झपाट्याने कमी करण्यासाठी कोणते सप्लिमेंट्स घ्यावेत?, वजन कमी करण्यासाठी टिप्स, बीट खाऊन वजन कमी होतं का? असे एक ना अनेक प्रश्न गुगलला विचारले जातात.
 
साओ पाउलो विद्यापीठातील बायोमेडिकल सायन्सेस संस्थेतील पोषणतज्ञ डिझायर कोएल्हो सांगतात की, यापैकी काही प्रश्न पाहिले तर लक्षात येतं की वजन कमी करण्यासाठी लोक शॉर्टकटच्या शोधात आहेत.
 
'बॉडी, बिहेव्हियर, न्युट्रिशन' या पुस्तकात त्यांनी लिहिलंय की, "बहुतेक लोक अशा जादूच्या छडीच्या शोधत आहेत ज्यामुळे ते लगेच बारीक होतील."
 
त्या सांगतात की, "आरोग्य आणि वजन कमी करणं या दोन्ही एकमेकांशी निगडित गोष्टी आहेत. तुम्ही जर जोखमीच्या मार्गांनी वजन कमी करण्याचा प्रयत्न केला तर, तुमच्या वाट्याला अनेक आजार येण्याचा धोका असतो."
 
डिझायर कोएल्हो म्हणतात की, "बारीक लोक सुंदर असतात असा समज करून घेणंच मूळ समस्येचं कारण आहे. काही लोकांना असं वाटतं की, सडपातळ असणं म्हणजे निरोगी असणं. पण हे चुकीचं आहे."
 
"सडपातळ असणाऱ्या लोकांमध्ये 'इटिंग डिसऑर्डर' दिसून आला आहे."
 
"त्यामुळे इतर व्यक्तीच्या शरीराबद्दल न बोलणंच चांगलं आहे. कारण बऱ्याचदा आपल्याला त्या व्यक्तीच्या आरोग्याविषयी माहिती नसते. त्यांच्या खाण्याशी संबंधित आजारांबद्दल माहिती नसते."
 
त्यामुळे वजन कमी करताना कोणत्या गोष्टींमुळे गुंतागुंत निर्माण होते? वजन कमी करण्यासाठी कोणत्या घटकांचं योगदान जास्त असतं? हे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात समजून घेऊ.
 
वजन कमी करण्यासाठी इंटरनेटवर जे उपाय शोधले जातात त्याबाबत तुम्हाला काय वाटतं?
 
डिझायर कोएल्हो : प्रत्येक गोष्टीसाठी शॉर्टकट शोधू नका. तुम्ही काही प्रश्न पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की लोकांना जादूची गोळी हवीय.
 
खरं सांगायचं तर लोकांना स्वतःचं वजन कमीच करायचं नाहीये, त्यांना फक्त सडपातळ व्हायचं आहे. आणि ते देखील सहज व्हायला पाहिजे. यासाठी त्यांना कोणतीही मेहनत घ्यायची नाहीये.
 
एका रात्रीत वजन कमी करणं हा एक अकल्पनीय पराक्रम आहे. जर वजन कमी करायचंच असेल तर सर्वात आधी वजन कमी करण्याची योग्य पद्धत आणि आरोग्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.
 
आणखी एक गोष्ट अशी की, जेव्हा आपण पोषणाविषयी बोलत असतो तेव्हा डोळ्यासमोर केवळ सडपातळ व्यक्तीच आला पाहिजे हे गरजेचं नाही. असा विचार करणंच मुळी चुकीचं आहे.
 
बऱ्याच लोकांना वाटतं की बारीक असणं निरोगीपणाचं लक्षण आहे. पण, हे खरं नाही.
 
'व्हाय कान्ट लूज वेट' या पुस्तकात वजन कमी करताना येणाऱ्या अडथळ्यांचा उल्लेख करण्यात आलाय. प्रत्यक्षात वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत कोणते अडथळे येतात?
 
डिझायर कोएल्हो : बहुतेक लोकांना वाटतं की वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये सामान्यतः 'सुरुवात, मध्य आणि शेवट' असे टप्पे असतात. प्रत्यक्षात असं काहीही नसतं.
 
तुम्हाला तुमचा बांधा कसा हवाय? वजन किती असावं? कशा प्रकारची जीवनशैली हवी? याचाही त्यांनी विचार करायला हवा. तरच ही प्रक्रिया सखोलपणे समजून घेता येईल.
 
दुसरी गोष्ट अशी आहे की वजन कमी करताना त्याची प्रक्रिया सुरू केली की शेवट पर्यंत न्यायची असते असं म्हटलं जातं. पण हा देखील एक गैरसमज आहे. या प्रक्रियेत अनेक चढ-उतार येतात. यातून काय शिकायचं हे ठरवावं लागतं.
 
लोकांना जादू हवीय. पण, इथे असं काहीही होणार नाही. कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. सर्वासाठी एकच सूत्र असेल असं नाही. आनुवंशिकता, सामाजिक घटक, व्यक्तीचा कौटुंबिक इतिहास अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो.
 
जर तुम्ही हे प्रयत्न मध्येच थांबवले तर पुन्हा ही प्रक्रिया किती जोमाने सुरू केली जाते यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात.
 
असं म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तीच्या जीवनशैलीचा खाण्याच्या सवयीवर परिणाम होतो. हे उदाहरण देऊन समजावून सांगू शकाल का?
 
डिझायर कोएल्हो : माझ्याकडे एक रुग्ण आहे. तिचं वजन खूप वाढलंय. ती प्रमाणाबाहेर गोड खायची. उपचाराचा भाग म्हणून मी तिच्या जीवनशैलीबद्दल प्रश्न विचारले. यावर तिने सांगितलं की ती एका पोषणतज्ज्ञांकडे गेली होती. तिने या पोषणतज्ज्ञांना सांगितलं की, तिला दररोज जेवणानंतर गोड खाण्याची सवय होती.
 
पोषणतज्ञांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की. "साखर तुमच्या आरोग्यासाठी चांगली नाही. त्यामुळे गोड खाणं बंद करावं लागेल. "
 
यानंतर तिने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि गोड खाणं बंद केलं.
 
मात्र, एका आठवड्यानंतर तिचा ताबा सुटला. तिने दुकानात जाऊन चॉकलेटचा डबा विकत घेतला आणि सर्व चॉकलेट फस्त केले. त्यानंतर तिला एकावेळी जास्त चॉकलेट्स खाण्याची सवय लागली. हे सर्व तिच्यावर लादलेल्या काही नियमांमुळे होत असल्याचं तिच्या लक्षात आलं.
 
याचा अर्थ असा की, इथल्या जीवनशैलीबद्दल आपल्याला माहिती हवी आहे. याचा अर्थ आपण खाल्लेल्या अन्नाचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो हे समजून घेतलं पाहिजे.
 
प्रत्येकावर समान परिणाम करणाऱ्या महत्वाच्या घटकांबद्दल काय सांगाल? असे काही महत्त्वाचे घटक आहेत का?
 
डिझायर कोएल्हो : काही आहेत.
 
यापैकी पहिली झोप आहे. आज लोकांमध्ये याबाबतची जागरूकता खूप वाढली आहे.
 
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरामात झोपणं महत्त्वाचं आहे. तुम्ही इथे किती वेळ झोपलात हे महत्वाचं नाही, तुमची झोप चांगली झाली का हे महत्वाचं आहे. जेव्हा तुमची झोप पूर्ण होत नाही तेव्हा वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. कारण नीट झोप घेतली नाही तर भूक वाढते. त्यामुळे आपण अधिक अन्न खाण्यास प्रवृत्त होतो.
 
दुसरीकडे, आपण आजारी पडतो. यामुळे शरीराची जास्त हालचाल करता येत नाही. हे सर्व अतिशय धोकादायक आहे.
 
दुसरं म्हणजे शारीरिक हालचाल. इथे शारीरिक हालचालीचा अर्थ तज्ज्ञांच्या देखरेखीखाली केलेला व्यायाम नव्हे. आपण जी दैनंदिन कामं करतो त्याला शरीराची हालचाल म्हणता येईल. काही जण व्यायाम केल्यानंतर उरलेला दिवस बसून घालवतात. त्यामुळे त्यांना व्यायामाचे हवे तसे परिणाम मिळत नाहीत. त्यामुळे दिवसभर शरीराची हालचाल करण्याचा प्रयत्न करावा.
 
तिसरा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अन्न. आपल्या दैनंदिन आहारात महत्वाचे पोषक घटक असायला हवेत. बऱ्याच लोकांना आपल्या आहारात पालेभाज्या समाविष्ट करण्याची गरज असते. पण आपल्याला शरीरात कशाची कमतरता आहे हे समजून घेऊन त्यानुसार आहार घेतला पाहिजे.
 
चौथं म्हणजे भावनांवर नियंत्रण. अनेकजण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा खूप जास्त खाल्लं जातं. वजन कमी करण्याच्या दृष्टीने हा मुद्दा खूप महत्वाचा आहे.
 
लोक आता उपवास करण्याबद्दल बोलत आहेत. वजन कमी करण्याचा हा योग्य मार्ग आहे का?
 
डिझायर कोएल्हो : काही प्रकरणांमध्ये याचा परिणाम दिसू शकतो.
 
खरं तर आपले पूर्वज एक हजार-दोन हजार वर्षांपूर्वी असं पाच वेळा जेवत नव्हते.
 
आज आमच्याकडे येणारे काही रुग्ण दिवसातून सात वेळा खातात. त्यामुळे शरीरात अन्नपचानाची क्रिया सुरूच असते.
 
पचन संस्थेला देखील विश्रांतीची गरज असल्यामुळे लोक उपवास करताना दिसतात. मात्र दिवसभरात उपवास करण्यापेक्षा रात्री उपवास करणं कधीही चांगलं.
 
यासाठी तुम्ही संध्याकाळी 7 वाजता जेवलात की थेट दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजताच जेवायचं. याचाही शरीराला फायदा होतो. अभ्यास देखील दर्शवितो हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
 
बरेच लोक प्रथिनं आणि पूरक आहाराबद्दल बोलतात. याबद्दल विज्ञान काय सांगतं?
 
डिझायर कोएल्हो : आज अनेक देशांमध्ये विज्ञानापेक्षा उद्योगाला प्राधान्य दिलं जातं. लोकांनी सतत खात राहावं यासाठी ते लोकांना प्रोत्साहित करतात. आणि सर्वात मोठी अडचण अशी आहे की यामुळे लोकांची दिशाभूल होत आहे.
 
उदाहरण म्हणून आपण ओमेगा-3 घेऊ. विज्ञान सांगतं की, माशांमध्ये किंवा अक्रोड मध्ये ओमेगा-3 भरपूर प्रमाणात असतं. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारू शकते. मात्र नुसत्या पूरक आहाराचा चांगला परिणाम होत नाही.
 
इथे महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, पूरक आहार घ्यावा का? की आपल्या दैनंदिन आहाराचा भाग म्हणून या गोष्टी आहारात समाविष्ट कराव्यात? बरेच जण सांगतात त्याप्रमाणे आपल्या दैनंदिन आहाराचा भाग म्हणून या गोष्टींचं सेवन करावं.
 
प्रथिनांबद्दल काय सांगाल?
 
डिझायर कोएल्हो : बरेच लोक मोठ्या प्रमाणावर प्रथिनं घेत असतात. मात्र याची गरज नसते. उदाहरणार्थ, 35 ते 40 वर्ष वयोगट घ्या. ते जास्त प्रथिनं असलेले शेक पितात, पण त्यांना याची फारशी गरज नसते.
 
प्रत्येकाला प्रथिनांची गरज असते. विशेषत: 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना या प्रथिनांची जास्त गरज असते. कारण त्या वयात स्नायूंचा ऱ्हास सुरू होतो.
 
शारीरिक श्रम करताना अतिरिक्त प्रथिने घेणं आवश्यक आहे. आता प्रोटीन ड्रिंक्स आणि सप्लिमेंट्स मधून प्रथिनं घ्यायचं का? असा प्रश्न आहे. यावर एकच उत्तर आहे, आपल्या शरीरासाठी काय योग्य आहे हे बघून निवड करा.