मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

काळजी हिरड्यांची

हिरड्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतात. जिंजीवायटिस हा हिरड्यांसंबंधी एक प्रमुख विकार आहे. या आजारात हिरड्यांना सूज येते. बरचदा खाद्यकण अडकतात आणि हिरड्यांमध्ये साचून राहतात.
 
दररोज व्यवस्थित स्वच्छता न झाल्यास तोंडामध्ये संसर्ग उत्पन्न होतो आणि जिंजीवायटिसचा धोका बळावतो. गमलाईनच्या खाली हिरड्यांमधील पेशींना इजा होते आणि हिरड्या सूजतात. ही सूज प्राथमिक अवस्थेत असताना उपचार न झाल्यास प्रोडोन्टिटिस नामक गंभीर आजार उद्‌भवू शकतो. यामध्ये दात आणि जबड्याचे कधीही भरुन न येणारे नुकसान होते.
 
हिरड्या लाल होणे, सुजणे, ब्रश करताना रक्त येणे या लक्षणांवरुन जिंजीवायटिसचे निदान होऊ शकते. उपचारांना विलंब झाल्यास दात आणि हिरड्यांमध्ये एक पोकळी निर्माण होते. हिरडीची दातावरील पकड कमी होते. निर्माण झालेल्या या पोकळीत संसर्ग उत्पन्न झाल्यास मुखदुर्गंधीची समस्या उद्‌भवते. त्याचबरोबर जिभेची चव जाते.
 
ब्रश करताना दातांचीच नव्हे तर हिरड्यांचीही निगुतीने स्वच्छता व्हायला हवी. आहारात कॅल्शियमयु्क्त अन्नघटकांचे प्रमाण वाढवावे. दूध, पनीर यांच्या सेवनाने शरीराला कॅल्शियमचा योग्य पुरवठा होतो आणि दातांबरोबरच हिरड्या सुदृढ राहतात.
 
साभार : मधुरा कुलकर्णी