शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

दिनूचे बिल

दिनू सहा वर्षाचा मुलगा होता. त्याचे वडील डॉक्टर होते. दिनू अधून-मधून वडिलांबरोबर दवाखान्यात जायचा. आजारी तिथे वडिलांकडे तपासून घेण्यासाठी तर कोणी औषध घेण्यासाठी येत असायचे. वडिल त्यांना तपासून, औषधं देऊन बिल द्याचे. हे पाहून एकदा दिनूने वडिलांना विचारले हे बिल कशाला. त्यावर डॉक्टर वडिलांनी त्याला कागद दाखवून समजवले की हे नीट वाच. त्यावर लिहिलं होतं: 
 
रोग्याला तपासण्याबद्दल: 50 रुपये
3 दिवसांच्या औषधांबद्दल: 200 रुपये
इंजेक्शन दिल्याबद्दल: 100 रुपये
एकूण: 350 रुपये
 
बिल हा प्रकार बघितल्यावर दिनूला एक कल्पना आली. घरी गेल्यावर दिनू आपल्या खोलीत गेला आणि एका कागदावर त्याने आपल्या आईच्या नावावर एक बिल तयार केले. त्याच्यावर लिहिलं होतं:  
दुकानातून सामान आणल्याबद्दल 10 रुपये
भावाला दोन तास सांभाळल्याबद्दल 50 रुपये
शेजारच्या काकूंना निरोप दिल्याबद्दल 5 रुपये
किचनमध्ये कामात मदत केल्याबद्दल 20 रुपये
एकूण: 85 रुपये
 
दिनूने बिल आपल्या आईच्या खोलीत नेऊन ठेवले. दुसर्‍या दिवशी दिनू सकाळी लवकर उठून बघतो तर काय त्याच्या उशाशी 85 रुपये ठेवलेले होते. खूश होऊन दिनूने ते उचलले. त्याबरोबर त्याला तिथे ठेवलेला एक कागद दिसला. त्यावर काय लिहिले आहे हे तो वाचायला लागला. त्यावर आईने लिहिले होते:
 
दिनूसाठी आवडते पदार्थ केल्याबद्दल 0 रुपये
आजारपणात दिवसरात्र जागून काळजी घेतल्याबद्दल 0 रुपये
बागेत फिरायला घेऊन गेल्याबद्दल 0 रुपये
होमवर्क करण्यात मदत केल्याबद्दल 0 रुपये
एकूण 0 रुपये
 
हे वाचून दिनूला स्वत:ची लाज वाटली. त्याच्या डोळ्यात पाणी आले. पैसे घेऊन तो तसाच आईकडे धावत गेला. त्याने पैसे परत करून आईला मिठी मारली आणि रडू लागला. तेव्हा आईने प्रेमानं कुरवाळून त्याला म्हटले की "तुझ्या बिलाचे पैसे पावले बरं, दिनू!"
 
- आचार्य अत्रे लिखित ‘दिनूचे बिल’ या गोष्टीवरून