शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 डिसेंबर 2020 (12:26 IST)

सुंदर कथा: गृहपाठाची पाने आणि चिमणी

एका गावात रत्नेश नावाचा एक छोटा मुलगा त्याच्या आई-‍वडिलांसोबत राहत होता. गावात तो रत्नू या नावानेच ओळखला जायचा. गाव तसं छोटसच होतं. त्याचे घर म्हणजे छोटीशी बंगली. घराच्या मागे पुढे अंगण. अंगणात फूलवेली व फळांची झाडे होती. पानांनी भरली म्हणजे झाडांची हिरवी सावली घराला शांत प्रसन्न बनवायची. फुलांनी फुलारली की घराच्या आजुबाजूचे वातावरण सुगंधित व्हायचे. फळांनी लगडली म्हणजे झाडांवर अनेक प्रकारचे पक्षी यायचे. 
 
पक्ष्यांची मजा बघण्यात रत्नूचा खेळ मजेत निघून जात असे. रोज ते पक्षी बघणे, त्यांना दाणे खाऊ घालणे याची रत्नूला फार मजा मौज वाटे. सर्व पक्ष्यांमध्ये त्याची आवडती म्हणजे चिमणी. 
 
चिमणीला दाणे देण्याचा त्याला लहाणपणापासून छंदच जडला होता. तिला दाणे दिल्याशिवाय रत्नू जेवत नसे. एक दिवस चिमणी वेळेवर आलीच नाही. रत्नु बेचैन झाला. आईने त्याला जेवणाचा खूप आग्रह केला. पण, चिमणीला दाणा दिल्या शिवाय तो कधी जेवलाच नव्हता. तसे स्पष्टच त्याने आईला सांगितले व चिमणीची वाट बघत असला. मग आईला प्रश्न विचारत बसला, चिमणी का आली नसेल? कुठे गेली असेल? आईने सांगितले की पिलांसाठी दाणा आणायला गेली असेल. मी तिला रोज दाणे देतो. मग तिला कष्ट घ्यायची का जरूरत पडते? असे रत्नूने आईला विचारताच आई म्हणाली, '' सारखं सारखं कुणाकडून काही घेणं योग्य नव्हे. स्वकष्टाने एखादी गोष्ट मिळविण्यात जो आनंद असतो तो आयतं घेण्यात नसतो. शिवाय कष्टाचे महत्वही त्यामुळे कळते.'' आईचे समाजवणे होत नाही तोच चिमणी पटकन उडत आली जणूकाही आपल्याला उशीर झाला, क्षमा कर, असेच भाव तिच्या चेहर्‍यावर होत. पण रत्नूच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून चिमणीला बरे वाटले. तिने एक-दोन दाणे खाल्ले, त्याच्याशी खेळली अन् उडून गेली. असा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. 
 
रत्नू हळूहळू मोठा झाला. शाळेत जाऊ लागला. चिमणीला खूप आनंद झाला. एक दिवस रत्नू शाळेतून घरी आला. व लगेचच अभ्यासाला बसला. रोज चिवचिव करून साद घालणारी चिमणी रत्नू अभ्यास करतो आहे, हे पाहुन बाहेरच शांततेने वाट बघत बसली. अभ्यास झाल्यावर रत्नू बाहेर आला. तेव्हा वाट पाहत थांबलेल्या चिमणीला पाहून त्याला कसेसेच झाले. खूप अभ्यास असल्याचे त्याने चिमणीला सांगितले. शाळेतल्या गमती-जमती, अभ्यास याबाबत तो चिमणीला रोजच सांगत असे. चिमणीला समजत होते की नाही माहीत नाही. पण तिरपी मान करून ती ते सर्व ऐकायची.
 
त्या दिवशी‍ चिमणी थोडावेळ खेळली नि उडून गेली. चिमणी आज घरट्याकडे न जाता वेगळ्याच दिशेने उडून गेली हे रत्नूच्या बाल नजरेने हेरले. त्याच्या डोक्यात विचारचक्र फिरू लागले. तेवढ्यात चोचीत काहीतरी घेऊन चिमणी परत आली. लांब आकाराची हिरवीगार पाने पाहून रत्नूला आनंद झाला. तो आनंद मनात साठवून चिमणी घरट्याकडे उडून गेली. ती पाने घेऊन रत्नू घरात आला. पुस्तकांचा पसारा आवरला. त्यात त्याने ती पाने ठेवून दिली. 
 
दुसर्‍या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे रत्नू उठला, दात घासले, दूध प्यायले. शाळेसाठी तयार झाला. शाळेत गेला, वर्गात गेल्यावर थोड्यावेळात गुरुजी आले. गृहपाठ तपासण्यासाठी त्यांनी सर्वांच्या वह्या घेतल्या. त्यादिवशी नेमका रत्नूने गृहपाठ केला नव्हता, त्यामुळे मनातून तो घाबरला होता. गुरुजी मात्र रत्नूचे कौतुक करत होते. त्याला काही समजेना. गुरुजी सर्वांना रत्नूने आणलेली पाने दाखवत होते. आंब्याची पाने आणण्याचा गृहपाठ गुरुजींनी दिला होता. गुरुजींना खुलासा केला तेव्हा त्याच्या लक्षात आले. लगेच त्याला चिमणीची आठवण झाली. चिमणीने त्याला गृहपाठ करण्यात मदत केली होती. गुरुजींनी रत्नूला शाबासकी दिली. त्यावेळेस शाबासकीच्या आनंदापेक्षाही चिमणीच्या सहकार्याचा आनंद रत्नूला जास्त मोलाचा वाटला.