शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By वेबदुनिया|

बासरीवाला आणि गावकरी

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. घरात, दुकानात, शेतात नुसते उंदीरच उंदीर.

त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही.

ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाल्याला कळते. तो या गावात येतो व गावकर्‍यांना सांगतो, की मी या उंदराचा बंदोबस्त करतो. तुम्ही मला त्या बदल्यात शंभर सुवर्णमुद्रा द्या. गावकरी तयार होतात. मग तो बासरीवाला बासरी वाजवत गावात हिंडू लागतो.

त्याच्या बासरीच्या सुरामुळे सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात. व त्याच्यामागे धावू लागतात. तो तसाच नदीत जातो. त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात. आणि पाण्यात बुडून मरतात..

बासरीवाला गावकर्‍यांना आपली बिदागी मागतो. मात्र, गावकरी शंभर सुवर्णमुद्रा द्यायला नकार देतात. बासरीवाल्याला गावकर्‍यांची लबाडी कळून येते.

तो म्हणतो ठिक आहे, आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते पहा. तो पुन्हा बासरी वाजवत गावात फिरू लागतो. या वेळी त्याच्या बासरीचे सूर ऐकून लहान मुले त्याच्याकडे आकर्षली जातात. ती त्याच्या मागे धावू लागतात.

गावकर्‍यांना भीती वाटते की उंदराप्रमाणे तो आपल्या मुलांनाही नदीत नेऊन बुडवेल. त्यामुळे गावकरी त्याला थांबवून शंभर सुवर्णमुद्रा देतात.

उपदेश ः उपकार करणार्‍याशी कृतघ्न वागू नये.