शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. प्रेमाची गोष्ट
Written By

मन पाऊस पाऊस..

केवढा उकाडा, असह्य होणारा उकाडा. अचानकच ऊन फिकं फिकं होऊ लागलं. बघता-बघता आभाळ केवढं छान दाटून आलं. दुरून येणारा वारा केसांशी खेळत, गावावर रुळत सांगू लागला तो येतो. हो तो येतोय. आणि खरंच तो आला. प्रथम थेंबाच्या रूपात. गालावर, कपाळावर, ओंठावर, केसांवर अलगद आला आणि येतच राहिला, हो पण मन थार्‍यावर नाही. आनंद हृदात मावत नाही. कारण मनही पाऊस पाऊस झाले.
 
तो किती सुंदर दिसतो माझ्या नजरेत दूरवर तो अलगद कोसळतो. त्या दूरवरच्या उंचच उंच इमारती तर या पावसाच्या धुक्यात धूसर दिसताहेत. ती नारळाची झाडे पावसाची किती लडिवाळ खेळताहेत. हो, पक्षी निवार्‍याला बसलेत, पण खरं सांगू त्या पाखराचे मनदेखील माझसारखे पाऊस पाऊस झालं.
 
झाडं अंगोपांगी थेंब, सरी झेलत कृतकृत्य झालीत. कळ्याचं तारुण्य पावसानं अधिकच बहरलं. तो पाऊस बघा कशी तारांबळ उडवून चालला त्या तरुणींची पण तिलाही वाटतं हातातली सर्व पुस्तके दूरवर ठेवून आज या अचानक भेटलेल्या पावसाला अलगद मिठीत घ्यावं, आज तिचेही मन पाऊस पाऊस झालं.
 
खिडकीतून पावसाला बघणार्‍या आजीच्या डोळ्यातही मला तोच मजेदार, फजिती करणारा, लडिवाळ पाऊस दिसतो. आजही तो एका छत्रीत दोघांनी अनुभवलेला पाऊस. निमित्त त्या छत्रीचं, पण ओढ मात्र एकमेकांच्या सहवासाची. आजूबाजूला पाऊस, स्वत:ला वाचवत छत्री सावरत अनुभवलेला पाऊस, आज सुरकुतलेल्या चेहर्‍यावर आनंदाचा वर्षाव करून चालला. आज आजीचं मनही पाऊस पाऊस झालं जुन्या आठवणीत रमताना.
 
पावसाच्या साचलेल्या पाण्यात डुबुक डुबुक उडय़ा घेणारी छोटी मुलं-मुली पाहिली अन् वाटतंय पळत जावं अन् आपलंही बालपण ओढून पुन्हा आणावं. नको म्हणत असलेल्या हाका कानावर न घेता या पावसाचा एक भाग संपूर्ण अंगावर घेत धूम पळत सुटावं. आज भिजून आल्यावर पाठीत धपाटा मिळाला तरी चालेल, पण या पावसाला मला गमवाचं नाही. इतकं मन अधीर झालं. मन पाऊस पाऊस झालं. आज कुठलही सजण्याची इच्छा नाही. पावसाच्या रूपातच चिंब चिंब होत नटायचं. मला स्वत:चं आज पाऊस व्हाचंय. ये रे ये रे पावसा मोठय़ाने म्हणायचं, गोड गिरकी घ्यायचीय. पावसाचं पाणी उडवायचं आहे. पावसाशी आज एकरूपच व्हायचं आहे. सर्व अंतरंग मोकळं करायचं, मनातलं बोलायचं. खूप भिजायचं हो आज आवरू नका, सावरू नका खरंच आज मन पाऊस पाऊस झालं, मन पाऊस पाऊस झालं. 
 
स्वाती कराळे