गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

दूधी भोपळ्याची कोफ्ता करी

साहित्य : दुधी भोपळा - १ मध्यम, डाळीचे पीठ, सुके खोबरे - १ वाटी - किसलेले., कांदे - ४, टोमॅटो - २, आले-लसूण-मिरची पेस्ट - २-३ छोटे चमचे, तिखट, मीठ, लसूण - ४-५ पाकळ्या, खसखस - २ चमचे, तीळ - २ चमचे. 
 
कृती : सर्वप्रथम दूधी भोपळा किसून घ्यावा. त्यात मीठ आणि आले, लसूण, मिरची पेस्ट घालून ठेवावी. ५ मिनीटे बाजूला ठेवून द्यावे. तोपर्यंत कढईत खसखस, तीळ हे दोन्ही तेलाशिवाय परतून घ्या. हे मिक्सर मधून वाटून घ्या.
 
कढईत थोडेसे तेल घालून कांदा परतून घ्या. छान गुलाबी झाला की त्यातच सुके खोबरे परतून घ्या. दोन्ही म्हणजे परतलेले कांदा आणि खोबरे मिक्सर मध्ये टोमॅटो व लसूण यांच्या बरोबर छान बारीक वाटण करून घ्या. 
 
आत्तापर्यंत दुधी भोपळ्याला पेस्ट मुळे पाणी सुटलेले असेल. त्यात मावेल इतकेच डाळीचे पीठ घाला. आणखी पाणी अजीबात घालू नका नाहीतर कोफ्ते पचपचीत होतात. आता मध्यम आकाराचे कोफ्ते (भजी सारखे) तळून घ्या. 

आता कढईत थोडेसे तेल घालून कांदा- खोबर्याचे वाटण परतून घ्या. त्यात तिखट घाला. आता त्यात १ ते १.५ भांडे पाणी घाला. (पाणी केवढे ते आवडीनुसार). आता यात आधी वाटलेले तीळ व खसखस याचे वाटण घाला. आता चवीप्रमाणे मीठ घालून २-३ मिनीटे मस्त उकळी आणा. दूधी भोपळ्याचे कोफ्ते घालून परत एक उकळी आणा. मस्त गरम गरम खा.