शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: नवी मुंबई , शनिवार, 22 मे 2021 (11:47 IST)

सिडकोच्या लॉटरीधारकांना १ जुलै २०२१ पासून टप्प्याटप्प्याने मिळणार घराचा ताबा

घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या सिडकोच्या लॉटरी धारकांसाठी खूशखबर आहे. सिडको महागृहनिर्माण योजना २०१८-१९ मधील अर्जदारांना १ जुलै २०२१ पासून घरांचा (सदनिकांचा) ताबा टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय सिडको महामंडळाने घेतला आहे. सध्याच्या कोरोना साथीच्या काळात सर्वत्र विकासकामांना खीळ बसलेली असताना सिडको महामंडळाने मात्र सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेवर मात करीत युद्धपातळीवर घरांचे बांधकाम पूर्ण करून सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करत आहोत.
 
नगर नियोजन आणि विकास क्षेत्रातील देशातील एक अग्रणी प्राधिकरण असणाऱ्या सिडको महामंडळाने बांधकाम क्षेत्रातही आपले कर्तृत्व सिद्ध केले. आपल्या स्थापनेपासूनच समाजाच्या सर्व आर्थिक स्तरातील नागरिकांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्याचे सिडकोचे ध्येय आहे. सिडको गृहनिर्माण त्यात सातत्य हे निश्चितच सिडकोच्या सर्वसमावेशक विकासाची निदर्शक आहे. महाराष्ट्र शासनाच्या “सर्वांसाठी घरे” धोरणांतर्गत सिडकोतर्फे महागृहनिर्माण योजना २०१८-१९ अंतर्गत नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या ५ नोडमध्ये सुमारे २५,००० घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता साकारण्यात आली होती. या योजनेतील घरांचा ताबा, गृहनिर्माण योजनेच्या वेळापत्रकानुसार ऑक्टोबर २०२० पर्यंत देणे विहित होते. परंतु सन २०२० च्या प्रारंभी आलेली कोविड-१९ महासाथ आणि त्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे बहुतांशी विकास प्रकल्पांचे काम मंदावले किंवा ठप्प झाले. सिडको महागृहनिर्माण योजना त्यास अपवाद नव्हती.
 
सार्वजनिक परिवहन सेवांवरील निर्बंध, मजुरांचे स्थलांतर अशा विविध कारणांमुळे मजुरांचा तुटवडा निर्माण झाला. त्यानंतर १५ एप्रिल २०२१ पासून राज्यामध्ये लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमध्येही या समस्या कायम आहेत. या काळात सर्वत्र निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना सिडकोला करावा लागला. परंतु ‘इच्छा तेथे मार्ग’ या उक्तीनुसार या सर्व अडी अडचणींवर मात करून पुरेसे मजूर तैनात करून, सिडकोतील अभियंते आणि अधिकाऱ्यांनी अहोरात्र काम करीत योजनेतील घरांचे बांधकाम पूर्ण करून घेतले. किंबहुना ‘संकटामध्ये संधी शोधणे’ हेच सिडकोच्या आजवरच्या यशाचे गमक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महागृहनिर्माण योजना २०१८-१९ मधील विजेत्या अर्जदारांना देण्यात येणारा घरांचा ताबा हे कोविड-१९ महासाथीच्या काळात सर्वांत लवकर पूर्ण झालेल्या महाप्रकल्पाचे देशातील एकमेव उदाहरण आहे.
 
सदर महागृहनिर्माण योजनेतील ज्या अर्जदारांनी घरांचे सर्व हप्ते भरले आहेत, त्यांना बाकी असलेले किरकोळ शुल्क भरण्यास १ जून २०२१ पासून १ महिन्याची मुदत देण्यात येईल. १ जुलै २०२१ पासून घरांचा ताबा टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. हफ्ते थकीत असलेल्या अर्जदारांना यापूर्वीच हफ्ते भरण्याकरिता ३१ जुलै 
२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सिडकोच्या या निर्णयामुळे सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही हजारो कुटुंबांचे हक्काच्या घरांचे स्वप्न साकार होणार आहे.