सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 31 जानेवारी 2022 (17:48 IST)

आंदोलनामागे हिंदुस्थानी भाऊचा हात?

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावी येथील घराबाहेर इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले. राज्यात विविध ठिकाणी विद्यार्थी राज्य सरकारचा विरोध करत असून, आंदोलन देखील सुरू आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील घराबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.
 
विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे कोण?
ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यात आज ठिकठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. त्यात धारावीत पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला. विद्यार्थ्यांना भडकवण्यामागे हिंदुस्थानी भाऊचा हात असल्याचे बोलले जात आहे. चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर हिंदुस्थानी भाऊचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतरच विद्यार्थी आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे.
 
राज्यात केवळ धारावीतच नव्हे, तर नागपूर, सातारा, कराड इतर काही ठिकाणी देखील विद्यार्थ्यांचं आंदोलन केले. त्यामुळे हे नियोजन करुन आंदोलन करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. तसंच हिंदुस्थानी भाऊच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरील त्याचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये हिंदुस्थानी भाऊ धारावीत आंदोलनात सामील झाला होता आणि त्यानेच केलेल्या आवाहनानंतर विद्यार्थी इतक्या मोठ्या प्रमाणात जमा झाले होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.