सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (16:06 IST)

प्रेयसी सासूनं प्रियकर जावयाची हातोड्याने वार करत निर्घृण हत्या केली

मुंबईतील वडाळा पूर्व परिसरात एक विचित्र घटना घडली आहे ज्यात एक 72 वर्षीय महिलेनं आपल्या 56 वर्षीय जावयाची हातोड्यानं वार करत निर्घृण हत्या केली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
56 वर्षीय जावयाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून पोलीस देखील हादरून गेले. याप्रकरणी पोलिसांनी मृताच्या सासूविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून तिला बेड्या ठोकल्या आहेत. 
 
विमल खन्ना असं हत्या झालेल्या 56 वर्षीय जावयाचं नाव आहे तर शांती पाल असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. विमल खन्ना मुंबईतील वडाळा पूर्व परिसरातील रहिवासी आहेत. तर शांती पाल विरारमधील रहिवासी आहे. आरोपी महिला काही दिवसांपूर्वी आपला जावई विमल खन्ना यांच्याकडे राहण्यासाठी आली होती. दरम्यान, दोघांमधील जुना वाद उफळल्यानं 72 वर्षीय महिलेनं आपल्या जावयाची निर्घृण हत्या केली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार 56 वर्षीय मृत विमल खन्ना यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या वयापेक्षा 16 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या शांती पाल यांना लग्नासाठी मागणी घातली होती पण खन्ना यांनी पाल यांच्याशी लग्न न करता त्यांच्या मुलीशी लग्न केलं. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होता. आपल्याला लग्नासाठी मागणी घालणारा आपला जावई बनल्यानं शांती पाल यांना बघवत नव्हतं. यामुळे दोघांमध्ये अनेकदा भांडणं होत होते.
 
पण काही दिवसांपूर्वी सासू आपल्या जावईकडे राहिल्या आल्यावर दोघांमधील जुना वाद पुन्हा उफाळून निघाला आणि याच रागातून 72 वर्षीय सासूबाईंनी जावयाच्या डोक्यात हातोड्याने वार करत त्यांची निर्घृण हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपी सासूबाई विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत तिला अटक केली असून या घटनेचा पुढील तपास वडाळा पोलीस करत आहेत.