बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (21:18 IST)

पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे – मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी

भारत निवडणूक आयोगाने 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त “माझे मत माझे भविष्य एका मताचे सामर्थ्य’ ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी 15 मार्च, 2022 पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत.
 
भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार जनजागृती होण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय मतदारजागृती स्पर्धेत (National Voters Awareness Contest), जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
 
स्वीप कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित करुन भारत निवडणूक आयोग सामान्य लोकांच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर लोकशाही बळकट करण्यासाठी करीत आहे. यामध्ये सर्व वयोगटांना सहभागी होता येणार आहे. सामूहिक सहभागातून लोकशाहीतील प्रत्येक मताचे महत्त्व विशद करण्याच्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित कल्पना व मजकुराचा गौरव करणे, असा यामागील उद्देश आहे.
 
“माझे मत माझे भविष्य एका मताचे सामर्थ्य” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत 5 प्रकारच्या स्पर्धा होत आहेत. यामध्ये प्रश्नमंजुषा, घोषवाक्य, गीत गायन, व्हिडिओ मेकिंग आणि भित्तीचित्र स्पर्धा यांचा समावेश आहे. प्रश्नमंजुषा स्पर्धेद्वारे निवडणुकीबाबतची जागरुकता पातळी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्पर्धकांनी तपशिलवार मार्गदर्शन तत्त्वे, नियम आणि अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ https://ecisveep.nic.in/contest/ येथे भेट द्यावी. प्रवेशिका सर्व तपशिलासह [email protected] येथे ई-मेल करावी. ई-मेल करतांना स्पर्धेचे नांव आणि श्रेणी याचा विषयात उल्लेख करावा. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी. सर्व प्रवेशिका 15 मार्च 2022 पर्यंत सहभागी स्पर्धकांच्या तपशिलासह [email protected] या ई-मेलवर पाठविण्यांत याव्यात, असे भारत निवडणूक आयोगाच्या वतीने कळविण्यात आले आहे.