मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जानेवारी 2022 (08:37 IST)

११० एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाने दाखवला घरचा रस्ता

मुंबई : राज्यात मागील दोन महिन्यांपासून संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करण्यात आले. तरीदेखील कर्मचारी कामावर न परतल्याने एसटी महामंडळाने निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. साेमवारी महामंडळाने आणखी ११० निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून, आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ९२५ वर पोहचली आहे. याशिवाय आतापर्यंत महामंडळाने ११ हजार २४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
 
२ हजार ६११ कर्मचाऱ्यांना बाजवली नोटीस
एसटी महामंडळ विलिनीकरणाच्या मागणीवरून सुरू असलेला संप चांगलाच चिघळला असून, मागील दोन महिने उलटूनही एसटीचा संप सुरूच आहे. एसटी कर्मचारी बेकायदेशीरपणे संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने कारवाई सुरूच ठेवली आहे. महामंडळाने आतापर्यंत ११ हजार २४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामुळे आता निलंबित कामगारांना कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत २ हजार ६११ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नाेटीस महामंडळाकडून बजावण्यात आली आहे. तर, साेमवारी महामंडळाने ११० निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. यामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ९२५ वर पोहचली आहे.