बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 25 जानेवारी 2023 (19:03 IST)

बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री कृष्ण: अज्ञातवास, कोट्यवधीची प्रॉपर्टी, आणि वाद - बागेश्वर 'बाबां'विषयी सर्वकाही

dhiredra shashatri krishna
Author,विकास त्रिवेदी
Role,बीबीसी हिंदी प्रतिनिधी
 
facebook
मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यात प्राचीन खजुराहो मंदिरं आहेत. इथली शिल्पं जगभरातल्या लोकांना आकर्षित करतात.
 
दिल्लीहून खजुराहोला जाणारी ट्रेन बऱ्याचदा छतरपूरजवळ थांबते. इथे कोणतंही स्टेशन नाही. इथे रोज, खासकरून, मंगळवारी आणि शनिवारी ट्रेनची चेन ओढून ट्रेन थांबवली जाते.
 
ट्रेनमधून मोठ्या प्रमाणात लोक उतरतात. या लोकांसाठी बस, रिक्षा किंवा टेम्पो उभे असतात.
 
हे लोक बागेश्वर धाम नावाच्या जागी जात असतात जिथे 26 वर्षांचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री ‘बाबा’ बसलेले असतात.
 
हेच धीरेंद्र शास्त्री अंधश्रद्धा पसरवणं,  त्यांच्यावर झालेले आरोप आणि त्यावर त्यांनी दिलेली उत्तरं या सगळ्यामुळे चर्चेत आहेत.
 
धीरेंद्र शास्त्री चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. कधी सनातन धर्मांच्या गोष्टी, कधी केंद्रीय मंत्र्यांना आशिर्वाद, कधी विचित्रं वागणं, कधी वादग्रस्त वक्तव्य तर कधी जमीन हडपण्याचा आरोप... अशा अनेक कारणांमुळे ते या आधीही चर्चेत आलेले आहेत.
 
कोण आहेत धीरेंद्र शास्त्री?
खजुराहो मंदिरापासून साधारण 35 किलोमीटर अंतरावर गढा नावाचं गाव आहे. याच गावातल्या रामकृपाल आणि सरोज यांच्या घरात 1996 साली धीरेंद्र यांचा जन्म झाला.
 
धीरेंद्र शाळेत जायला निघायचे पण मंदिरात जायचे. लहान वयातच ते धोतर-कुर्ता असा वेश परिधान करायला लागले.
 
स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की धीरेंद्र यांचं कुटुंब खूपच गरीब होतं. अनेकदा त्यांचं कुटुंब भिक्षा मागून त्यावर आपली गुजराण करायचं.
 
त्याच्या वेबसाईटवरही असंच लिहिलेलं आहे. त्यात म्हटलंय की, “त्यांचे वडील पूजा सांगायचे. त्यातून जी दक्षिणा मिळायची त्यातून पाच लोकांच्या कुटुंबाचं पोट भरायचं.”
 
धीरेंद्र यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे. सगळ्यांत मोठे धीरेंद्र. मग बहीण रीता गर्ग आणि धाकटे बंधू शाळिग्राम गर्ग.
 
बहिणीचं लग्न झालंय आणि भाऊ त्यांच्या आश्रमाचं काम पहातात.
 
गढातल्या काही तरुणांनी बीबीसीला सांगितलं की, “ते एरवी याज्ञिकी करायचे, पूजा सांगायचे पण कधी कधी क्रिकेटही खेळायचे. त्यांचं आठवीपर्यंतचं शिक्षण गढातल्या एका सरकारी शाळेत झालं.”
 
धीरेंद्र यांचे आजोबा सेतू लाल गर्गही याज्ञिकी करायचे. पूजा सांगायचे. त्यांनी त्यांच्या आजोबांकडूनच याचं शिक्षण घेतलं आणि कमी वयातच याज्ञिकी करायला लागले.
 
एका व्हीडिओत धीरेंद्र म्हणतात, “तीनदा सलग आजोबा माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले की अज्ञातवासात जा. तेव्हा मी लहान होतो आणि अज्ञातवास म्हणजे काय हेही मला माहीत नव्हतं. मग कळलं की पांडवही अज्ञातवासात गेले होते. तेव्हा समजलं की अज्ञातवासामुळे देवाचा वर मिळतो. मी जेव्हा अज्ञातवासातून परत आलो तेव्हा दरबार लागायला लागला. लोकांची साथ मिळत गेली.”
 
धीरेंद्र शास्त्रीसोबत शाळेत शिकणाऱ्या एका व्यक्तीने बीबीसीला सांगितलं की, “शाळेत धीरेंद्र माझ्यापेक्षा एक वर्षांने लहान होता. तो दहावी पास झाला की नाही माहीत नाही. आधी नुसताच फिरायचा. अभ्यासातही हुशार नव्हता. मोठा होऊन धंदा करणार असं म्हणायचा. मग वर्षंभर कुठेतरी गायब झाला. परत आला तेव्हा वेगळाच होता. हळूहळू इथे आमदार, खासदार, नेत्यांची ये-जा सुरू झाली. तुम्ही असं समजा की त्याला मोठं केलं काँग्रेसने पण आज तो जे आहे ते फक्त भाजपमुळे. नाहीतर पाच वर्षांपूर्वीपर्यंत सायकल, मोटरसायकलवर फिरत असायचा.”
 
धीरेंद्र शास्त्री आज खासगी विमानाने फिरतात. भारत ते लंडन सगळीकडे त्यांना मान मिळतो. ते कुठे जायला निघतात तेव्हा डझनभर गाड्यांचा ताफा त्यांच्यामागे फिरतो.
 
प्राचीन शिवमंदिर आणि बालाजी मंदिर
गढामध्ये धीरेंद्र शास्त्रींचा दरबार भरतो त्या ठिकाणाजवळ एक प्राचीन शिवमंदिर आहे. याच मंदिरात एक संन्यासी बाबा बसायचे. धीरेंद्र शास्त्री त्याच बाबांचा आशिर्वाद मिळाल्याचं सांगतात.
 
या शिवमंदिराशेजारी एक बालाजी मंदिर (हनुमान) आहे जे नव्याने बांधलं आहे असं दिसतं. इंटरनेटवर काही व्हीडिओ आहेत ज्यात दिसतं की काही वर्षांपूर्वीपर्यंत या ठिकाणी शिवमंदिर होतं, पण बालाजी मंदिर नव्हतं.
 
चंदलाचे माजी आमदार आर डी प्रजापति, जे सध्याचे भाजप आमदार राजेश प्रजापति यांचे वडील आहेत त्यांनी बीबीसी हिंदीशी चर्चा केली.
 
आरडी प्रजापति सुरुवातीपासूनच धीरेंद्र शास्त्रींचा विरोध करत आलेले आहेत.
 
ते म्हणतात, “या ठिकाणी शंकराचं मंदिर होतं. शेजारी हनुमानाची मूर्ती होती. धीरेंद्रचे वडील इथे पूजा करायचे. त्यांच्याकडे राहायला घरही नव्हतं. इथल्या एका धर्मशाळेत ताडपत्री लावून त्यांचं कुटुंब रहायचं. वडील पूजा सांगायचे आणि गावकरी त्यांची मदत करायचे. हळूहळू त्यांनी इथे दरबार लावायला सुरुवात केली.”
 
गढात राहाणारे उमाशंकर पटेल बीबीसीशी बोलताना म्हणतात, “धीरेंद्रवर संन्यासी बाबांची कृपा झाली तेव्हापासून सगळं बदललं.”
 
धीरेंद्र शास्त्रींनी इथे आधी राहाणाऱ्या रामभद्राचार्य महाराजांना अनेकदा आपलं गुरू म्हटलं आहे.
 
रामभद्राचार्य लहानपणापासूनच अंध होते आणि त्यांच्या भक्तांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मोठ्या लोकांचा समावेश आहे.
 
इंटरनेटमुळे मिळाली लोकप्रियता
भारतात इंटरनेटचा वापर वाढला तसंतसं धीरेंद्रना आपली लोकप्रियता वाढवण्यात मदत मिळाली. युट्यूब, व्हॉट्सअप, संस्कार चॅनल अशा माध्यमांव्दारे धीरेंद्र लाखो लोकांपर्यंत पोचले.
 
सोशल मीडियावर त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली.
 
आज धीरेंद्र यांच्या व्हीडिओजला लाखो व्ह्यूज आहेत. युट्यूबवर त्यांचे 37 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. तीन वर्षांत त्यांना 54 कोटींहून जास्त व्ह्यू मिळाले आहेत.
 
फेसबुकवर बागेश्वर धामचे 30 लाख फॉलोअर्स आहेत तर ट्विटर वर 60 हजार आणि इंस्टाग्रामवर 2 लाख.
 
धीरेंद्र शास्त्री आणि बाबा बागेश्वर धामची टीम इंटरनेटचा कसा प्रभावी वापर करते याची काही उदाहरणं – बाबा बागेश्वर धामची,वेबसाईट गुगल सर्चला ध्यानात ठेवून डिझाइन केलेली आहे.
 
लोक गुगलवर काय शोधतात याचा अभ्यास करून त्यानुसार शब्द संयोजना केली आहे. म्हणजेच जर कोणी बाबा बागेश्वर धामबद्दल कोणी सर्च करत असेल तर सरळ त्यांच्या वेबसाईटवर पोचेल.
 
23 जानेवारीला या वेबसाईटच्या होमपेजवर ‘बागेश्वर धाम श्री यंत्रम्’ चा प्रचार होत होता.
 
यात असा दावा केला होता की हे यंत्र देशातल्या फक्त पाच हजार ‘भाग्यवान’ लोकांना मिळेल. हे यंत्र घरात ठेवल्याने गरिबी दूर होईल.
 
रजिस्ट्रेशन करण्यासाठी या वेबसाईटवर क्लीक करायचं होतं. इथे आपला फोन नंबर आणि नाव लिहिल्यानंतर संस्कार टीव्ही चॅनलच्या वेबसाईटवर अकाऊंट बनलं जातं.
 
धीरेंद्र शास्त्री यांचं समर्थन करण्यासाठी बाबा रामदेव पुढे आले आहेत. त्यांनी म्हटलं, “प्रत्येक ठिकाणी दांभिकता शोधायला नको.”
 
जर तुम्ही बागेश्वर धामच्या युट्यूबवर नजर टाकली तर तुम्हाला लक्षात येईल की सध्याच्या इंटरनेटच्या जगातल्या लोकांची आवड लक्षात ठेवून ते व्हीडिओ बनले आहेत. याची काही उदाहरणं अशी –
 
हे व्हीडिओ आणि त्यांचे टायटल हिंदीत आहेत, पण वाचकांच्या सोयीसाठी त्यांचा मराठी अनुवाद देत आहोत.
 
लवेरियाच्या मुलाची इच्छा अशी पूर्ण झाली
श्रीमंत बनण्याचे दहा उपाय
सासू-सुनेच्या भांडणावर उपाय
कर्जातून मुक्त व्हाल, व्यापारात बरकत
घरात लक्ष्मीचा वास का नाही?
मुलीला का सांगितलं – लग्नानंतर फार बोलू नको
धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारात जाण्याची प्रक्रिया
धीरेंद्र यांचे चुलत भाऊ लोकेश गर्ग बीबीसी हिंदीशी बोलताना म्हणाले, “रोज इथे जवळपास 10-15 हजार लोक येतात. जेव्हा गुरुजी महाराज (धीरेंद्र) बागेश्वर धाममध्ये असतील तेव्हा हीच संख्या दीड-दोन लाखांपर्यंत पोचते.”
 
जानेवारी महिन्यात छत्तीसगड इथे भरणाऱ्या दरबारात पोचलेल्या एका पत्रकाराने म्हटलं होतं की या कार्यक्रमात तीन लाखाहून जास्त लोक आले होते.
 
या दरबारांमध्ये कसं जायचं, त्याची पूर्ण प्रक्रिया काय याची पूर्ण माहिती बाबा बागेश्वर धामच्या वेबसाईटवर आहे.
 
वेबसाईटनुसार बागेश्वर धाममध्ये वेळोवेळी टोकन दिले जातात. इथली समिती धीरेंद्र शास्त्रींच्या निर्णयानंतर भक्तांना टोकन टाकण्याची तारीख कळवते.
 
ही तारीख दरबारात आणि सोशल मीडियावर घोषित केली जाते. टोकन पेटीत श्रद्धाळू आपलं नाव, आपल्या वडिलांचं नाव, गाव, जिल्हा, राज्य, पिनकोड आणि फोननंबर लिहून टोकन टाकतात.
 
ज्यांच्या नावाचं टोकन निघतं त्यांना समिती संपर्क करते. त्यांनी सांगितलेल्या दिवशी बागेश्वर धामला जायचं असतं.
 
या वेबसाईटवर लिहिलं आहे की, “गुरुदेव स्वतः सांगतात की भक्ताने किती वेळा यायचं पण कमीत कमी 5 मंगळवार दरबारात हजेरी लावावी असा आदेश प्रत्येक भक्ताला दिला जातो.”
 
ही प्रक्रिया निशुल्क आहे.
 
बागेश्वर धामच्या वेबसाईटचा दावा आहे की धीरेंद्र शास्त्री यांच्याकडून इतर कामंही केली जातात. बागेश्वर धामला दानातून जेवढे पैसे मिळतात त्याच्या अर्ध्या हिश्शातून इथे ही काम केली जातात असं म्हटलंय.
 
यातली काही प्रमुख कामं म्हणजे –
 
गोरक्षा
गरीब मुलींची लग्नं
मंगळवारी आणि शनिवारी भुकेल्यांसाठी अन्नदान
पर्यावरण संवर्धनासाठी बागेश्वर बाग
धीरेंद्र शास्त्री आणि जमीन
बागेश्वर धाम इथे भक्तांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे गढा गावाच्या जमिनीला सोन्याचा भाव आला आहे.
 
इथे दुकानं आणि इतर व्यवसायही वाढीला लागले आहेत.
 
इथल्या जमिनी वादात अडकल्या आहेत. चंदलाचे माजी आमदार आरडी प्रजापति यांचा आरोप आहे की, “गढाची सरकारी जमीन धीरेंद्र यांनी बळकावून त्यावर आपलं बांधकाम केलं आहे.”
 
धीरेंद्र शास्त्री यांनी आपली जमीन बळकावली असा आरोप काही स्थानिकांनी केला होता. त्यांनी याविरोधात निदर्शनंही केली होती तसंच स्थानिक प्रशायकीय अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली होती.
 
हे प्रकरण कोर्टात गेलं आणि कोर्टाने सध्या या जमिनींवर स्टे आणत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करायला नकार दिला आहे.
 
या प्रकरणी कोर्टात जाणाऱ्या अनेक लोकांपैकी एक 26 वर्षांचे संतोष सिंह होते.
 
त्यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, “या जागेवर आमची दुकानं होती. एके रात्री ते लोक आले आणि आमची दुकानं काढली. आम्हाला कळलंही नाही. आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयातही गेलो, निदर्शनं केली पण काही कारवाई झाली नाही. ती जागा मंदिराच्या मागे आहे. काही दिवसांपूर्वी या लोकांनी म्हटलं की जमीन आम्हाला द्या आणि आमच्या नावावर कागदपत्रं करा. मग आमचे वडील, काका लोकांनी ती जमीन 30 लाखांना विकून टाकली.”
 
सरकारी जमीन, तलाव आणि स्मशान
धीरेंद्र यांच्या वेबसाईटवर पर्यावरण संवर्धनासाठी झाडं लावण्याचा उल्लेख आढळतो. पण त्यांनी गढातल्या पर्यावरणाचं नुकसान केल्याचा आरोपही त्यांच्यावर झालेला आहे.
 
गढामध्ये एक तलाव आहे तसंच इथल्या मंदिराजवळ एक स्मशानही होतं.
 
आरडी प्रजापति यांचा आरोप आहे की, “गावात एक तलाव होता. स्मशान होतं जिथे प्रेतं जाळली जायची. पण ते बळकावलं गेलं आहे. इथली धर्मशाळाही बळकावली गेली आहे. बरं, हा असा भाग आहे जिथे चुकीच्या चालीरिती आणि अंधश्रद्धा अजूनही फोफावलेली आहे. इथे 5 रुपयाचं लॉकेट कधी 5 हजाराला तर कधी 51 हजाराला विकलं जातंय. असेच त्यांनी कोट्यवधी रुपये कमवले. हाच यांचा व्यवसाय आहे.”
 
धीरेंद्र शास्त्रींवर केल्या गेलेल्या या आरोपांबद्दल माहिती घेण्यासाठी बीबीसीने छतरपूरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना संपर्क केला पण ही बातमी प्रकाशित होईपर्यत त्यांच्याकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही.
 
त्यांचं उत्तर आल्यानंतर यात अपडेट केलं जाईल.
 
धीरेंद्र यांचे चुलत भाऊ आणि त्याच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य लोकेश गर्ग आपण जमीन बळकावल्याचा आरोप फेटाळून लावतात.
 
ते म्हणतात, “स्मशानाची जमीन आणि तलाव आजही तिथेच आहेत. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आम्ही स्मशानाच्या जमिनीची साफसफाई केली होती. जिथे आम्ही राहातो ती जागा आमच्या आजोबांची होती. राहाता राहिला अंधश्रद्धेचा मुद्दा तर लोक येतात, तेच गर्दीत उभे राहून विचारतात. आम्ही थोडी म्हणतो याला उभं करा किंवा त्याला उभं करा. ही तर बालाजीची कृपा आहे.”
 
गढातून बाहेर पडून आता दुसऱ्या शहरात नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीने बीबीसीशी बोलताना म्हटलं की,”या लोकांकडे इतका पैसा आणि जमीन नव्हतीच की हे धर्मशाळा बांधतील. आताच्या नव्या बांधकामाच्या ठिकाणी खालच्या मजल्याची डागडुजी केली नसेल तर तुम्हाला आताही दिसेल ती ती जागा सरकारी आहे.”
 
जमिनीशी संबंधित वादांबद्दल लोकेश म्हणतात की, “जेव्हा कोणी पुढे जातं तेव्हा त्याच्यामागे काही ना काही कारस्थान रचलं जातंच. ज्या जमिनीचा वाद आहे ती मंदिराचीच होती. कोणीतरी उगाच विरोध करत होतं. त्यांच्या सांगण्यावरून आणखी काही लोकांनी विरोध केला पण जेव्हा खरं काय ते समजलं तेव्हा ते लोक स्वतःहून मागे हटले.”
 
दरम्यान गढा एक भक्तीस्थळ म्हणून विकसित करण्याचे प्रयत्न सुरू झाले. या प्रयत्नांमध्ये एक कहाणी इथल्या स्थानिक लोकांचीही आहे.
 
उमाशंकर यांचं आजोळ गढा आहे तर त्यांचं कुटुंब आता छतरपूरमध्ये राहातं.
 
ते म्हणतात, “गावाकडे लोक वर्षांनुवर्षं एका ठिकाणी राहात असतात. पण त्या जमिनीची कागदपत्रं थोडी असतात. सरपंचाने सांगितलं इथे घर बांधा तर लोकांनी बांधलं. आता धामवाले लोक प्रसिद्ध झाले तर कागदपत्रांची ढाल पुढे करून त्यांच्या रस्त्यात जी घरं आहेत ती प्रशासनाच्या मदतीने पाडून टाकली. जेव्हा प्रशासनाकडे तक्रार केली तेव्हा उत्तर आलं – चौकशी सुरू आहे.”
 
तलाव आणि स्मशानाबद्दलही उमाशंकर सांगतात.
 
ते म्हणतात, “एकदा यांनी म्हटलं की स्मशानाच्या जागी यज्ञ करायचा आहे तर इथल्या गोष्टी हलवा. इथे यज्ञाला लोग येतील त्यांची गैरसोय नको. मग या ठिकाणी त्यांनी मोठी यज्ञवेदी उभारली. आता म्हणतात की यज्ञवेदी काढू शकत नाही कारण ते धर्मविरोधी ठरेल.”
 
गढातल्या व्यापारात धीरेंद्र शास्त्रींचा किती हस्तक्षेप?
काही स्थानिक लोकांनी या वर्षी 23 जानेवारीला घडलेला एक किस्सा सांगितला.
 
गढाच्या दुकानांमध्ये जवळच्या भागातून पाणीपुरवठा होतो. पाण्याची एक कॅन 20 रूपयांची असते. धीरेंद्र शास्त्रींच्या लोकांनी 20 रूपयांच्या एका कॅनवर 5 रूपये कमिशन मागितलं असा आरोप आहे.
 
गढा गावातले एक जण सांगतात, “स्थानिक लोकांनी याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. ज्यांनी वाद घातला होता त्या लोकांनी माफी मागितली, आणि पोस्ट डिलीट करायला सांगितली. महाराजांचाही फोन आला मग हा वाद शमला. आता तसं काही नाहीये.”
 
या सगळ्या आरोपांवरून आम्ही धीरेंद्र शास्त्रींशी बोलण्याचाही प्रयत्न केला पण त्यांच्या टीमच्या सदस्यांनी सांगितलं की सध्या महाराज बाहेर गेलेत आणि ते परत येतील तेव्हा बोलतील.
 
त्यांच्याशी अजून संपर्क होऊ शकलेला नाही.
 
लहान-थोर सगळेच महाराजांचे भक्त
धीरेंद्रच्या दरबारात सामान्य माणसं, नेते, व्यावसायिक, लहान-थोर सगळेच जातात.
 
छतरपूरचे स्थानिक नेते आणि काँग्रेसचे आमदार आलोक चतुर्वेदी त्यांचे भक्त आहेत आणि धीरेंद्र शास्त्रींचं महत्त्व वाढवण्यात त्यांनी मुख्य भूमिका आहे असं म्हटलं जातं.
 
मग या यादीत कैलास विजयवर्गीय, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा तसंच नितीन गडकरी आणि गिरीराज सिंह अशा केंद्रीय नेत्यांची नावंही येतात.
 
जेव्हा नेते धीरेंद्र यांच्या दरबारात जातात तेव्हा फक्त फोटो बाहेर येतात, पण सामान्य माणसं दरबारात जातात तेव्हा अनेक प्रकारचे व्हीडिओ समोर येतात.
 
जवळपास सगळ्याच व्हीडिओमध्ये भक्त धीरेंद्र यांनी कागदावर लिहिलेल्या गोष्टी, आणि भक्तांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरं याबद्दल समाधानी दिसतात. धीरेंद्र या भक्तांना विचारतात, धाममध्ये आल्यानंतर तुमचं आयुष्य बदललं का?
 
सगळेच लोक होकारार्थी उत्तर देतात.
 
पण अंधश्रद्धा पसरवण्याचे आरोपही धीरेंद्र शास्त्रींवर झाले आहेत.
 
आपण लोकांच्या मनातील ओळखू शकतो असा दावा करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आणि समितीचे राष्ट्रीय समन्वयक श्याम मानव यांनी आव्हान दिले आहे. 
 
धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या मंचावर येऊन हे दावे सिद्ध करावेत, ते सिद्ध झाले तर 30 लाख रुपये देऊ असे अंनिसने सांगितले होते. मात्र धीरेंद्र यांनी ते न स्वीकारता महाराष्ट्रातून निघून जाण्याचा निर्णय घेतला.
 
या प्रकरणावरचा वाद गेले काही दिवस वाढत चालला आहे. श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी आणि आता धीरेंद्र शास्त्री यांनीही आपल्याला धमकी आल्याचा दावा केला आहे. त्याविरोधात त्यांनी बमिठा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार नोंद केली आहे.
 
कार्यक्रम लवकर संपवण्याबद्दल धीरेंद्र शास्त्रींकडून सांगण्यात आलं की हे आधीपासूनच ठरलं होतं.
 
पण या प्रकरणानंतर धीरेंद्र शास्त्री मीडियामध्ये चर्चेत आले. धीरेंद्रही पत्रकारांना मुलाखती द्यायला लागले आणि त्यांनी दरबारातून निवडलेल्या लोकांबद्दल कागदावर लिहून जाहीर करायला लागले.
 
पत्रकारांसमोर स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींचे अनेक व्हीडिओ व्हायरल झाले.
 
20 जानेवारीला छत्तीसगडमध्ये धीरेंद्र शास्त्रींचा जो कार्यक्रम झाला त्यात अनेक पत्रकार सहभागी झाले.
 
यातल्या एका व्हीडिओत दिसतं की त्यांनी एका महिला पत्रकाराला समोर बसलेल्या कोणत्याही व्यक्तीला निवडायला सांगितलं. त्या पत्रकाराने एका महिलेला निवडून धीरेंद्र शास्त्रींसमोर आणलं आणि तिच्याशी काही बोलण्याआधीच ते कागदावर काही लिहायला लागले आणि मग तो कागद त्यांनी सगळ्यांना दाखवला.
 
या महिला पत्रकाराशी आम्ही बोललो. त्या म्हणतात, “माझा या सगळ्यावर विश्वास नाहीये पण माझी नोकरी आहे, मला सांगितलं गेलं म्हणून मी तिथे गेले. मला वैयक्तिकरित्या वाटतं की माध्यमांमध्ये असं कव्हरेज होण्याचा फायदा अशा बाबा लोकांनाच जास्त मिळतो. मी जेव्हा त्या गर्दीतून एका महिलेची निवड केली, तेव्हा तीच महिला निवडा असं मला कोणी सांगितलं नव्हतं. ती महिला जेव्हा स्टेजवरून खाली उतरली तेव्हा मी तिला विचारलं की धीरेंद्र शास्त्रींनी त्याच गोष्टी सांगितल्या का ज्या तिच्या मनात होत्या, तेव्हा त्या महिलेने होकार दिला. आता हा चमत्कार आहे की आणखी काही हे लोकांनी ठरवायला हवं.”
 
धीरेंद्रची वागायची पद्धत, वक्तव्यं आणि वाद
धीरेंद्र स्टेजवरून बोलताना एका विशिष्ट पद्धतीने बोलतात, वागतात. जर त्यांनी काही रंजक गोष्ट सांगितली तर स्वतः टाळी वाजवतात आणि जय राम म्हणतात.
 
भक्तांशी बोलताना अनेकदा त्यांचं वागणं तुसडेपणाचं असतं.
 
आपल्या कार्यक्रमांमध्ये धीरेंद्र शास्त्री भूतबाधेचा इलाज करण्याचाही दावा करतात. ते स्टेजवर पुटपुटतात, फुक मारतात.
 
मग गर्दीतून ओरडण्याचे आवाज यायला लागतात. पुरुष, महिला उठतात आणि किंचाळताना दिसतात. धीरेंद्र म्हणतात यांना चिमट्यांनी मारा, साखळ्यांनी बांधा.
 
संशोधकांचं आणि डॉक्टरांचं म्हणणं आहे की, “जेव्हा लोकांना वाटतं की आपल्याला भुतांचं अस्तित्व जाणवतंय तेव्हा खरं त्यांचं चित्त थाऱ्यावर नसतं. त्यामुळे शरीरात बदल घडतात आणि त्या लोकांना असं वाटतं की आपल्या शरीरावर आपलं नियंत्रण नाहीये, ते दुसरं कोणाच्या अधीन झालंय.”
 
धीरेंद्र ठासून सांगतात, “आम्ही काही चमत्कार करत नाही. ही बालाजीची कृपा आहे. तेच सगळे करतात. आम्ही काहीच सांगत नाही, बालाजीच सांगतात.”
 
धीरेंद्र फक्त भक्तांच्या प्रश्नांविषयी बोलत नाहीत.
 
ते काश्मीर फाईल्स, पठाण असे चित्रपट ते हिंदू राष्ट्र आणि सनातन धर्माच्या गोष्टी करतात.
 
या बाबतीत धीरेंद्र यांचं ताजं वक्तव्यं 23 जानेवारीचं आहे.
 
ते म्हणतात, “नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी म्हटलं होतं की ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा. आज आम्ही भारतात नव्या इतिहासाची नवी घोषणा केली आहे – तुम मेरा साथ दो, हम हिंदू राष्ट्र बनाऐंगे. भारतातल्या लोकहो, बांगड्या भरून घरात बसू नका. बोट फक्त बागेश्वर धामकडे दाखवलं नाहीये, तर प्रत्येक सनातन्यावर बोट दाखवलं आहे.”
 
मे 2022 मध्ये धीरेंद्र शास्त्रींचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. एक माणूस धीरेंद्र यांच्या पाया पडताना दिसतो, धीरेंद्र त्याला थांबवून म्हणतात, “हात नको लावू मला, अस्पृश्य माणूस आहे... जय हो.”
 
लोकांनी आरोप केला धीरेंद्र अस्पृश्यता पाळतात.
 
पण यावरही धीरेंद्र स्पष्टीकरण देताना म्हणाले, “आम्ही बाबाजींचा वारसा चालवतो. आम्ही अस्पृश्यता पाळत नाही. अनेक लोक दारू पिऊन येतात किंवा कांदा-लसूण खातात. आम्ही सगळ्यांमध्ये राम बघतो. मग आम्ही रामाकडून नमस्कार कसा करून घेणार. आम्ही त्या दरबाराताले आहोत जिथे ना कोणी लहान आहे न कोणी मोठं.”
 
धीरेंद्र यांनी मुसलमांनावरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. ते ‘घर वापसी’ च्याही गोष्टी करतात.
 
एका व्हीडिओत दिसतं, सुलताना नावाची एक महिला आपण छत्तीसगढच्या आहोत असं सांगते आणि पुढे म्हणते की मी मुसलमान आहे पण मुर्ती आणि फोटोची पूजा करते. यावर माझ्या घरचे चिडतात.
 
स्टेजवर बसलेले धीरेंद्र विचारतात, “तुम्हाला हिंदू धर्मात का यायचं आहे?” ती महिला उत्तरते, “कारण हिंदू धर्मापेक्षा चांगलं काहीच नाही.”
 
धीरेंद्र शास्त्रींनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यापैकी काही अशी आहेत –
 
33 कोटी देवी-देवता आहेत तर चंद्राची पूजा करण्याची काय गरज?
डरपोक हिंदुनो उठा, जागे व्हा, हत्यार हातात घ्या, म्हणा – आम्ही सगळ एक आहोत.
सरकार किती दिवस बुलडोझरने पाडणार? हिंदुंना पाडावं लागेल.
सगळ्या हिंदुंनो एक व्हा, दगड मारणाऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवा.
धीरेंद्र शास्त्री खरंच लोकांच्या मनातलं ओळखतात का?
तुम्ही कदाचित विचार करत असाल की धीरेंद्र शास्त्री खरंच लोकांच्या मनातलं ओळखतात का? याचं वेगवेगळे लोक, वेगवेगळं उत्तर देतील.
 
धीरेंद्र शास्त्री म्हणतील – आम्ही काही करत नाही, सगळं बालाजी करतात आणि आमच्याकडून करून घेतात.
 
भक्त म्हणतील ते चमत्कार करतात.
 
विज्ञान, मनोवैज्ञानिक आणि जादुगरांना विचाराल तर तुम्हाला एकदम वेगळंच उत्तर मिळेल.
 
एक कला आहे ज्याच नावं आहे मेंटॅलिझम. याला सोप्या भाषेत समोरच्याच्या मनातलं ओळखणं असंही म्हणतात.
 
या कलेचा अभ्यास करणारी व्यक्ती समोरच्याचे हावभाव, शब्दांचा वापर, त्याची बोलण्याची पद्धत यावरून समोरच्याच्या मनात काय चालू आहे ते ओळखू शकतो.
 
मुंबईच्या यु-ट्यूबर सुहानी शहा या कलेचा अभ्यास करतात. त्या गेल्या काही दिवसात टीव्ही चॅनेल्सवरही दिसल्या.
 
सुहानी आपल्या यू-ट्यूब व्हीडिओत आणि शोमध्ये समोरच्याने काही न सांगता त्याच्याशी संबधित काही गोष्टी ओळखून दाखवते.
 
सुहानी शाह बीबीसीशी बोलताना म्हणतात, “जादूचे अनेक प्रकार असतात. त्यातलाच एक प्रकार मेंटॅलिझम आहे. मी 32 वर्षांची आहे आणि 7 वर्षांची असल्यापासून जादूचे खेळ करतेय. 10 वर्षांपासून मेंटॅलिझम करतेय. मेंटॅलिझममध्ये अनेक टेक्निक असतात. समोरच्याच्या डोळ्यांची मुव्हमेंट, हावभाव, बोलायची पद्धत, यावरून समोरच्याशी संबधित गोष्टी जाणून घेतल्या जाऊ शकतात.”
 
धीरेंद्र शास्त्रींचे कार्यक्रम आणि त्यातून लोकांचं भलं करण्याचा दावा यावर सुहानी शाह यांना आक्षेप आहे.
 
त्या म्हणतात, “सनातन धर्म म्हणतो की खरं बोललं पाहिजे. त्यामुळे जर कोणी खोटं बोलत असेल तर हे चूक आहे. हनुमान आपल्या सगळ्यांचे देव आहेत आणि आपल्या सर्वांवर त्यांची कृपा आहे पण धीरेंद्र जर कोणाच्या मनातलं देवाच्या कृपेने अचूक ओळखण्याचा दावा करत असतील तर हे चूक आहे. हा एक जादूचा खेळ आहे आणि याला खेळच म्हटलं पाहिजे. तुम्ही माझे व्हीडिओ पाहिले असतील तर धीरेंद्र करतात त्यापेक्षा कितीतरी पुढच्या गोष्टी आम्ही करतो हे कळेल. ज्याला आम्ही कला म्हणतो त्याला धीरेंद्र चमत्कार म्हणतात.”
 
यूपीएससी परीक्षांचे क्लासेस घेणारे प्राध्यापक डॉ. विकास दिव्यकीर्तिही आपल्या वर्गात लोकांच्या डोक्यात काय चाललं आहे ते ओळखण्याची कलेबद्दल म्हणतात, “मानसशास्त्रात अनेक लोक असे असतात की जे लोकांचे फक्त डोळे पाहून त्यांच्या मनात काय चाललं आहे हे ओळखू शकतात.”
 
आम्ही सुहानीला विचारलं की त्या आम्हाला या खेळ कसा करायचा हे सांगू शकतील का? म्हणजे लोकांनाही कळेलआणि ते स्वतः हे करून पाहू शकतील.
 
सुहानी म्हणतात, “नाही, हे मी सांगू शकत नाही. कारण असं सांगितलं तर जादूच्या खेळांचं रहस्य सगळ्यांसमोर खुलं होईल. मीच नाही, जगभरात अनेक लोक ही कला शिकतात आणि हा खेळ करतात. मी तुम्हाला याचं रहस्य सांगून त्या कलाकारांवर अन्याय करू शकत नाही.”
 
अशा प्रकारचे चमत्कार करण्याचा दावा करणारे धीरेंद्र शास्त्री एकटेच नाहीयेत.
 
मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मात असे अनेक लोक आढळतात. कधी कुराणच्या आयत वाचून तर कधी ‘हालेलुया’ म्हणत लोकांची दुःख शमवण्याचा दावा करणारे अनेक लोक आहेत.
 
सोशल मीडियावर असे अनेक व्हीडिओही आहेत ज्यात विकलांगांना चालताना दाखवलं आहे, व्हीलचेअरमधून उठून पळताना दाखवलं आहे, अंधांची दृष्टी परत आल्याचा दावा आहे.
 
भारतातही मदर तेरेसा यांच्या कथित चमत्कारांवर लोकांनी प्रश्नचिन्ह लावलं आहे.
 
सन 2015 मध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं होतं की, “मदर तेरेसा यांनी लोकांची सेवा केली पण त्याचा उद्देश ज्यांची सेवा केली जातेय त्यांना ख्रिश्चन बनवण्याचा होता.”
 
नुकताच एक मल्याळम चित्रपट ‘ट्रान्स’ रिलीज झाला होता. या चित्रपटात येशू ख्रिस्ताच्या नावावर लोकांचा इलाज करणारे लोक, त्याचं साम्राज्य आणि त्याची काळी बाजू दाखवली गेली होती. आमीर खानचा ‘पीके’ हा चित्रपटही सर्व धर्मांचा बाजार मांडणाऱ्या लोकांना दर्शवत होता.
 
पडद्यावर असे चित्रपट, धर्माचा बाजार आणि त्यामागचं सत्य पुढे आणण्याचे प्रयत्न होत असतील, पण प्रत्यक्षात मात्र लोकांचा विश्वास अशा गुरू आणि बाबांवर वाढत चालला आहे.
Published By -Smita Joshi